Friday, October 31, 2014

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

 म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.
श्रावणबेळगोळचा ज्ञात इतिहास हा शकवर्ष 8०० ते ११०० च्या कालावधीतील आहे. गंग राजे राचमल्ल (४ थे) यांच्या कालावधीत शक्यतो शकवर्ष ९५० च्या पुढे-मागे या गोमटेश्वराच्या मुर्तीचे निर्माण केले गेले. ही मुर्ती ५७ फूट उंचीची आहे व ती एका अखंड पाषाणातून बनवली गेलेली आहे. श्री चामुंडराय हे गंग राजे राचमल्ल (४) यांचे सेनापती होते, त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती. गोम्मटराय हे श्रीचामुंडराय यांचेच नाव म्हणून या मुर्तीला गोमटेश्वर असे नाव पडले. मुळ मुर्ती ही बाहुबली यांची आहे ( बाहुबली = सम्राट भरतचा लहान भाऊ).
मुर्ती एवढी उंच असल्या कारणाने या मंदिराला फक्त तटबंदी आहे, छत नाही. तटबंदीच्या दोन्ही बाजूला सभापंडप, मुनींच्या राहण्याची व्यवस्था आहे. या पुर्ण विंध्यगिरी पर्वतावर अनेक शिलालेख आहे, व त्या शिलालेखांची पुर्णपणे नीट काळजी घेतली जात आहे.
सिध्दर बस्ती
मुख्यमुर्ती स्थानाच्या बाहेर असलेल्या सर्व पाषाणातून निर्माण केलेल्या गृहांना/ मंडपांना सिध्दर बस्ती असे म्हटले जाते. ज्याचे निर्माण शकवर्ष १७००-१८०० मध्ये केले गेले. या सर्वभागात अनेक शिलालेख असून त्यावर मंदिरासंबधी माहिती, निर्माते व दानासंबधी उल्लेख केलेला आहे.
गुल्लेकायी - अज्जी मंडप
पांच गोलाकार स्तंभ, एक शिलालेख व एका अज्जीची साडी नेसलेली मुर्ती. असलेला हा मंडप अनेक दंतकथेमुळे प्रसिध्द आहे, चामुंडराय यांचा घमंड तोडण्यासाठी देवी पद्मावती तेथे अज्जीच्या रूपात गेली होती ही सर्वात प्रसिध्द दंतकथा आहे. हा मंडप शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेला असून याचे स्तंभ मात्र शकवर्ष १२०० च्या काळातील आहेत.
विंध्यगिरी पर्वतावर त्रिकुट बस्ती (ओदेगल बस्ती) म्हणून एकमात्र त्रिमंदिर आहे. पुर्वीच्याकाळी तळघर बांधण्यासाठी कणाश्म शिला नावाच्या दगडाचा विषेशतः वापर केला जात असे त्याच दगडातून हे मंदिर उभारले गेले आहे. शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेले हे गोलाकार स्तंभ असलेले मंदिर बाहेरून जरी साधे वाटले तरी विषेश दगडांच्या वापरामुळे व याच्या अतंर्गत रचनेमुळे विशिष्ठ ठरते. आता तीन गर्भगृह असून प्रत्येक गर्भगृहात स्तरितशिला (संगमरवर) चा वापरून करून अत्यंत सुरेख व रेखीव अश्या तीर्थंकरांच्या मुर्त्या आहेत.
त्यागदं स्तंभ
कलात्मक सौंदर्याचे अनुपम उदाहरण असलेला त्यागदं स्तंभाचे ऐतिहासिक दृष्ट्यादेखील अनन्य साधारण महत्त्व आहे. एक छोटा मंडप व त्यामध्ये मध्यभागी हा स्तंभ आहे. याचे निर्माण शकवर्ष ९५०-१००० मध्ये केले गेले असून या वापर श्री चामुंडराय दान-धर्म करण्यासाठी करत (तेथे उभे राहून दे डोळे बंद करून दान देत असत). व शेवटी शेवटी त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान येथे उभे राहूनच केले व सन्यास घेतला. स्तंभावर लतावेली यांचे सुरेख रेखाटन केले असून पुर्ण स्तंभ रेखीव आहे.
विंध्यगिरी पर्वतावरून दिसणारा सुर्यास्त.

Thursday, October 30, 2014

वर्धमान ते महावीर - भाग २

त्याचा प्रवास सुरु होऊन खूप काळ लोटला होता, अंगावरील एकुलती एक देवदुष्या जीर्ण होऊन कधी मागे राहिली याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती, आता दिगंबर अवस्थेत त्यांचे भ्रमण सुरु होते. त्यांचा निवास हा निसर्ग निर्मित व कधी कधी मोकळ्या असलेल्या एखाद्या झोपडीत किंवा धर्मशाळेत होत असे, पण त्याचा ओढा खरा निसर्गाकडेच राहिला. असाच एक दिवस प्रवास करत करत एका जंगलातून जाताना त्याला वाटले की ही जागा योग्य आहे, आपल्या चिंतन व तप यासाठी. एक मोठा असा वृक्ष ज्याच्या फांद्या अजस्त्र अश्या आपल्या भुजा फैलावून आकाशाला गवसणी घालाव्यात या प्रमाणे पसरल्या होत्या, अश्या त्या वृक्षाची निवड केली व त्याच्या बुंध्याजवळ आपले आसन लावले. तो मिताहारी असला तरी भूक ही शेवटी शारीरिक गरज होती, तेव्हा जवळपासच्या गावात जाऊन भिक्षा घेण्यासाठी फेरी मारत असे, रसस्क्ती नव्हती ना स्वाद इच्छा. जो जे जे आहार देईल तो स्वीकारणे योग्य ते बाजूला ठेवणे व अयोग्य ते निसर्गास परत देणे, भिक्षा न मिळाली तर रिक्तहस्ते परत जाणे हा दिनक्रम चेहऱ्यावरील संतोष व आनंद न ढळू देता चालू असे. अश्याच एक दिवशी भिक्षा घेऊन आपल्या तपस्थळवर तो परत आले. अन्नग्रहण झाले व पुन्हा त्याने आसन लावले व शांतमुद्रेत तपामध्ये लीन झाला.
थोड्याच वेळात, पाला-पाचोळा तुडवत, हातातील फांदी टेकत तो वृद्ध तेथे पोचला व त्याच्या समोर एक जागा पाहून तेथे बसला. थोड्यावेळाने तो वृद्ध बोलता झाला व म्हणाला “मागील वार्तालाप व आजचा दिवस यात काय अंतर निर्माण झाले?” त्यांने हळूवारपणे डोळे उघडले व वृद्धाकडे पहात एक स्मित हास्य केले व म्हणाला “शेवटची आसक्तीकारक वस्तू देखील जीर्ण होऊन विरून गेली. एका प्रश्नातून अनंत प्रश्न उभे राहिले. ईश्वर म्हणजे कोण? हा प्रश्न सध्यातरी मोठा आहे. उत्तर मिळेल असे वाटत आहे.” तो वृद्ध एकदम सावरून बसला व म्हणाला “समजावून सांग. माझ्या माहीतीनूसार, तो ईश्वर म्हणजे निर्माता, त्राता व नष्टकर्ता! त्यानेच हे जग, हे विश्व, सगळे जीव जंतू, हा निसर्ग उभा केला. तोच कर्ता-धर्ता या जगाचा. सर्व शक्तीमान असा तो एकमेव. हे सर्व विश्व त्याने निर्मिले व नष्ट देखील तोच करणार. सुख-दु:ख याचा प्रत्येक जिवाचा वाटा त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या त्या जीवाला भोगण्यास देणे हे देखील त्याचे कार्य.”
त्याने वृद्धाकडे पाहीले व हलकेसे स्मित करत तो म्हणाला ”स्थविर, तुम्ही जो ईश्वर म्हणत आता, तो कर्ता-निर्माता आहे, पण तो सर्वशक्तीमान, एकमेवाद्वितीय असा तो नाही आहे. मी ईश्वर नाकारत नाही आहे. पण त्याचे एकमेव तोच कारणीभूत सर्वासाठी हे नाकारतो आहे. द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव ही चार विश्वे आहेत. तो ईश्वर देखील आपल्याच प्रमाणे गतिमध्ये अडकलेला आहे, चार गति आहेत, देव गति, मानव गति, तिर्यञ्च गति, नरक गति. सर्व जीवाप्रमाणे ईश्वराला देखील या गतिमधून प्रवास करावा लागतो.” वृद्धाने नकारात्मकता दर्शवत आपली मान हलवली व म्हणाला “ज्याने हे निर्माण केले त्यालाच हे भोग कसे काय सहन करावे लागतील? निर्माता कधी आपल्याच निर्माण केलेल्या भवनामध्ये हरवू शकतो?” तो हसला व म्हणाला “ तुमच्या मते जर ईश्वर सर्वशक्तीमान, एकमेवाद्वितीय आहे तर तो गतिमध्ये असणेच शक्य नाही. मग असे का? ठराविक काळाने ब्रम्ह बदलतो, नवा इंद्र, नवे देव येतात, इतर वर नव्हे तर इतर देव देखील त्यांच्या ठरलेल्या काळाने निघून जातात, त्याचे पद जाते व त्या पदावर नवा देव उभा राहतो. शेकडो जप-तप आणि पुण्य केले की इंद्रपद प्राप्ती होते ना?”
वृद्ध चपापला, थोडे सावरून बसला व म्हणाला “ मुनिवर्य, मग ईश्वर देखील आपल्या सारखाच? सुख-दु:ख आणि या विश्वाच्या चक्रात अडकलेला?” त्याने स्मित केले व म्हणाला ”त्यांना थोडे वेगळे ज्ञान मिळाले, ज्यामूळे ते देवत्वाला पोचले. सहा द्रव्याचे ज्ञान जर तुम्हाला झाले तर तुम्ही देखील ईश्वरपदी, जरी नाही पण देवपदी नक्कीच पोचाल. ते सहा द्रव्य आहे, जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काळ. सहा द्रव्य, सात तत्त्वे जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष याचे ज्ञान तुम्हाला त्या पदावर पोचवेल.”
वृद्ध म्हणाला “ देव, आज तुम्ही सम्यग्दर्शन स्वरूप सांगितले, अजून चर्चा अपेक्षित आहे. पण आता निघावयास हवे, ईश्वर यावर अजून प्रश्न. तुमचे मत आणि उत्तरे पुढील भेटीत मिळतील अशी आशा करतो” असे म्हणून वृद्ध बाजूच्या वेलीचा आधार घेत उभा राहिला, व त्याच्याकडे पाहून समाधानाने हसला आणि जाण्यासाठी वळला, तोच तो म्हणाला “ स्व:ताच्या विवेकाने सद्भूत तत्त्वांच्या अस्तित्वावर तुमची आंतरिक श्रद्धा बसली असेल तर, असे म्हणा की तुम्ही सम्यग्दर्शन स्वरूप समजावून घेतले, कारण यालाच सम्यकत्व म्हणता येईल. अजून प्रश्न जसे तुम्हाला आहेत, तसेच माझ्यासमोर देखील आहेत. आता पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी, पुढील प्रवास. भेटू असेच पुन्हा.”
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तेज होते व ओठांवर स्मित!

Friday, October 24, 2014

वर्धमान ते महावीर (१)

सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले... आईने प्रेमाने दिलेली मोतीजडित काननकुंडले अजून आपल्या जागी होती. त्याने हळूवारपणे ती काढली, दोन्ही हाताच्या ओंजळी काननकुंडले चमकत होती व त्याच्या डोळ्यासमोर भव्य राजप्रसादातील आईसोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी दाटून येत होत्या, राजवैभव, सुस्वरूप पत्नी, एक गोंडस मुलगी.. सर्व काही मागे सोडून नव्याने एक आत्मशोध प्रवास. क्षणभरच.. त्याने ती काननकुंडले देखील बाजूला असलेल्या रत्नांवर अर्ध्य द्यावे या प्रकारे सोडून दिले..
तो पुन्हा निर्विकार झाला होता, स्व:च्या शोधासाठी सुखाचा त्याग हा करावा लागतोच. तसा ही राजभवनात होता तेव्हा तरी तो कोठे तेथे होता? तेथे होते ते फक्त त्याचे शरीर. ध्यान, चिंतन व मनन मध्ये सदा मग्न असलेला राजकुमार. आई वडिलांची इच्छा म्हणून लग्न केले, आईला वचन दिले होते म्हणून तो किमान ३० वर्ष तरी राहिला त्या राजप्रासादात. जर वचन दिले नसते तर खूप आधीच त्याने गृहत्याग केला असता, जेव्हा त्याच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला तेव्हाच. त्याला स्पष्टपणे तो दिवस आठवत होता. एका यज्ञशाळेत यज्ञ चालू होता. यज्ञात आहुती दिली जात होती, तूप, दही, दुध.. आणि त्याच प्रमाणे पक्षी-प्राण्यांचे ही. त्या मूक पशूचे आक्रंदन आणि आकाश व्यापणारे त्यांचे दुख. कोण प्रसन्न होत असेल अश्या उष्णरक्ताच्या अभिषेकाने? कोण प्रसन्न होऊन आशिष प्रदान करणार होते क्रूर हिंसेने बरबटलेले यज्ञ आहुती घेऊन? प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते, साचेबद्ध उत्तरे आणि तीच तीच कारणे. पण त्याचे कोमलमन या हिंसेने थरारून गेले होते. स्वत:च्या क्षणिक सुखासाठी एका जीवाचा बळी? हा प्रश्न मनात वादळ बनून घोंगावत होता. दिवसामागून दिवस गेले. बालमनाला पडलेला प्रश्न तारुण्याच्या उबरठ्यावर अजून प्रकर्षाने जाणवू लागला होता. रोजच्या ध्यानातून व चिंतनातून आत्मशोधाची आस निर्माण होत होती. हिंसेपासून सुरु झालेला चिंतनाचा प्रवास आता आत्मशोध व मोक्ष प्राप्ती मार्गावर आला होता. अतीव सुखाच्या सागरातून बाहेर येऊन कष्टप्रद साधनेच्या कांटेरी रस्तावर अत्यंत कठीण असा प्रवास, सुरु कोठून व याचा शेवट कोठे या प्रश्नांची उत्तरे त्याला देखील माहिती होती का?
आज सर्वत्र एक प्रकारची खिन्नता पसरली होती पण फक्त याच्या मनात चैतन्य व शांतता होती. सर्व गोष्टींचा त्याग करून झाला होता, राहिले होते ते खांद्यावर शुभ्र देवदुष्याचा पट. सर्व पाश बाजूला करून तो चालू लागला. निर्वाकार, शांत पाउले टाकत त्यांने जंगलात प्रवेश केला, मागे त्याच्या नावाचा जयजयकार झाला, पण शरीरावरील अलंकारांप्रमाणे त्याने जणू नावाचा देखील त्याग केला होता... तो चालत राहिला, खांद्यावरी शुभ्र देवदुष्या वाऱ्याने फडफडत होती.
मनात चिंतन चालू होते. या जगातील सर्व धर्मांचे मूळ काय? ईश्वर म्हणजे कोण? ही सृष्टी, हे जग याचा नियंत्रक कोण? आत्मा म्हणजे काय? आपला मुळ हेतू काय? तत्त्वज्ञानाचा शोध घ्यावा की आधी स्वत्वाचा शोध? सर्वत्र पसरलेल्या हिंसेचे मूळ काय? प्रश्न अनेक होते, वाट आता बिकट होत होती. सूर्य मावळला होता. तो एका वृक्षाजवळ जाऊन थांबला. उंच असा तो वृक्ष आकाशाला आव्हान देत वर वर चालला आहे की काय असा भास होत होता. शक्यतो असंख्य पक्ष्यांचा आसरा असेल, त्या डेरेदार वृक्षावर अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत असतील. सुमधुर असा मंजुळ स्वर नभात पसरला होता, समोर निर्मळ तलाव होता, त्याचे गूढनिळे पाणी दूरवर पसरलेले होते. त्याने येथेच ध्यानधारणा करण्याचे निश्चित केले.
त्या वृक्षाच्या खाली त्याने पद्मासन धारण केले व डोळे मिटून ज्ञान शोधण्याचा प्रवास सुरु केला. दिवस, महिने वाऱ्याने पाचोळा उडावा असे निघून गेले. अखंड ध्यान मग्न राहून, असंख्य कष्टाला सामोरे जात साधना चालू होती. जंगलातील पशूंचा उपद्रव नित्य होता पण, छोट्या छोट्या गोष्टीतून, निसर्गाच्या वागण्यातून त्याला ज्ञान मिळत होते, तो सर्वाचे शांत मनाने रसग्रहण करत होता, त्याला माहिती होते ज्ञानाचा मार्ग कठीण जरी असला तरी अप्राप्य नक्कीच नाही आहे, त्याची वाटचाल चालूच होती.
एक दिवस अज्ञात व्यक्तीच्या प्रश्नाने त्याचे ध्यान भंग झाले, त्याने डोळे उघडले तर समोर, एक वृद्ध फांदीचा आधार घेऊन त्याच्या समोर उभा होता. पांढर्याशुभ्र जटानी त्याचे मस्तिष्क सुशोभित झाले होते व चेहऱ्यावरील तेज त्याच्या विद्वेतेची साक्ष देत होते. त्याने समोर असलेल्या खडकाच्या दिशेने हात केला, तो वयोवृद्ध स्मित करत त्या खडकावर बसला. काही क्षण डोळे मिटून तो वृद्ध पुन्हा प्रश्नकर्ता झाला “किती समजले?” त्याने उजव्या हाताची दुसरी तर्जनी वर करत उत्तर दिले “एक” वृद्ध हसला व म्हणाला “म्हणजे सुरवात आहे, अजून खूप दूरवरचा तुझा प्रवास बाकी आहे.” त्याने स्मित केले व आपले डोळे मिटून घेतले. वृद्ध परत बोलला “तू कोण? नर की मादा”. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचे तेज पसरले व तो म्हणाला “मादा.” वृद्ध ढगासारखा हसला, हसता हसता त्याला ठसका लागला, हसणे थांबवून तो वृद्ध म्हणाला “मग दान देताय ना? मी आता याचक आहे. तुम्ही द्याल ते घ्याला उत्सुक आहे.”
त्याने आपले डोळे उघडले, सूर्य अस्त होण्यास अजून कालावधी होता, सर्वत्र एक निरव व प्रसन्न अशी शांतता पसरली होती, आणि तो संथ आवाजात बोलू लागला “भय! या विश्वातील प्रत्येक जीवाला भय आहे. कारणवस्तू निश्चित वेगळी असू शकते. पण भाव एकच असतो, तो भयाचा. मृत्यूचे भय, आपल्या अस्तित्वहीन होण्याचे भय. आपल्या प्रजातीच्या अस्तित्वाचे भय. आपल्या जमवलेल्या संपतीच्या ऱ्हासाचे भय. आपल्या प्रियजन व्यक्तीशी होणारी संभाव्य ताटातूटीचे भय. आपल्या संचित पापाचे भय, आपल्या मर्यादेबाहेरील निसर्गाचे भय... भय हे सर्वत्र व्यापले आहे. सर्वांना क्षणिक मुक्ती हवी असते ती भयापासून. भयापासून मुक्ती कशी मिळेल? निर्भय होऊन. पण निर्भय होणे एवढे सोपे आहे का? क्षणभूंगूर अश्या जीवनाच्या अस्तित्वाचाच जेथे प्रश्न आहे तेथे निर्भय कसे व्हावे? निर्भय होता येते, जर अभय मिळाले तर. भयापेक्षा ही जास्त शक्ती अभय मध्ये आहे. शक्तिशाली जीवाने जर शक्तिहीन जीवाला अभय दिले तर तो भय मुक्त होऊ शकतो. पण शक्तिशाली कुठल्या कारणाने अभय देईल? जर शक्तिशाली जीव जर सर्वांना समभाव नजरेने पाहत असेल आणि त्याच्या मनात करुणाभाव असेल तर, हे सहज शक्य आहे.” तो थांबला, आणि त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहू लागला. वृद्धाने आपले थरथरत असलेले दोन्ही हात पुढे केले व म्हणाला “उदाहरणार्थ?” त्याने समोर पाहिले, व वृद्धाला देखील तिकडे पाहण्यासाठी हातानेच सांगितले. समोरच्या पाणवठ्यावर एक सुंदर हरीण पाणी पीत होते, त्याच सुमारास एक वाघ तेथे पाणी पिण्यास आला. पण त्याने हरीणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून पाणी पिण्यास सुरवात केली. ज्याच्या फक्त अस्तित्वामुळे चंचल हरीण अस्वस्थ होऊन ती जागा सोडून आपले चौखूर उधळत जंगलात नाहीशी होणे अपेक्षित होते तेथे ते हरीण त्या वाघाशेजारी पाणी पीत होते. भय-अभय चे जिवंत चित्र समोर उभे होते.
वृद्ध हसला याच्याकडे पाहत म्हणाला “या क्षणी शक्यतो त्या वाघाचे पोट एवढे भरलेले असू शकते की त्याला शिकारीची आवश्यकता नाही आहे आणि तसे ही निसर्गात मानव सोडून दुसरा कुठलाही जीव आपले पोट भरले असताना निरर्थक शिकार करत नाही. राहता राहींला तुझा भय-अभयचा मुद्दा! क्रूरतेने आणि ठायीठायी विषमतेने भरलेल्या या विश्वात अभय देणारे असे कोणी असणे हाच पहिला शंकेचा मुद्दा आहे.”
तो अजून ही ते पाणवठ्यावरचे दृश्य पाहत होता. तिकडे पाहत तो म्हणाला “असे अभय देणारे तत्त्वज्ञान निर्माण करणे आणि असा समाज निर्मिती हे उद्दिष्ट नजरे समोर आहे माझ्या.” वृद्ध उत्तराने संतुष्ट नव्हता झाला. पण पश्चिमेच्या डोंगरांनी सूर्याला आपल्यापाठी कधीच लपवले होते. रम्य संधीप्रकाश आता लुप्त होऊ पाहत होता व समोर निशा सर्व चराचराला आपल्या कवेत घेण्यास उत्सुक झाली होती. तिकडे पाहत वृद्ध म्हणाला “भय, सार्वत्रिक आहे. तू म्हणतो आहेस ते एका अर्थाने बरोबर देखील आहे. पूर्ण अंधार्‍याजागी पेटलेली एक पणती देखील आपल्याला अभय देते. आपले अस्तित्व अजून काही काळ राहणार आहे याची खात्री देते.” तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते. त्याचे ओठ हलकेसे स्मित करत आहेत असा भास एकाद्याला त्याच्याकडे पाहताना नक्कीच झाला असता.

Saturday, October 18, 2014

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.
चेहर्‍यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो Wink पण सजावट यक्षिणी सारखी आहे.
मंदिराचे आतून छत.
मंदिराचे आतून छत.





Wednesday, October 8, 2014

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३

बेल्लुर.

मंदिराचे प्रवेशद्वार
द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला. अत्यंत भरभराटीच्या काळात बेल्लुर व द्वारसमुद्र मध्ये शेकडो मंदिरांची उभारणी केली गेली, शिल्पकलेला राजमान्यता होतीच पण त्याच्या सौंदर्यामुळे जनमान्यता देखील लवकरच मिळत गेली.

अर्जून
आताच्या काळात मुख्य मंदिरे व वस्तूसंग्रहातील अनेक शिलालेख, मुर्ती व त्या काळातील संपन्नतेचे पुरावे सोडले तर बेल्लुर / द्वारसमुद्र फक्त एका साम्राज्याच्या काही अंश शिल्लक राहिले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने प्रचंड काम या दोन मंदिरावर केलेले आहे. एकेकाळी पुर्ण नष्ट व विद्रुप केलेली ही मंदिरे भारतीय पुरातत्व विभागाने जसेच्या तसे पुर्ण अभ्यास करून उभे केले व त्यामुळे आपल्याला होयसाळ साम्राज्याच्या काही खाणाखुणा स्वतःच्या डोळ्यानी पाहता येतात हे आपले भाग्य.
मुख्य मंदिर
बेल्लुर मंदिराची रचना दक्षीणेत प्रसिध्द असलेल्या शिल्प प्रकारात आहे म्हणजेच विमान प्रकारात. प्रशस्थ पटांगण, उत्तुंग असे प्रवेशद्वारावरील शिखर, मुख्य मंदिर व त्याला सलग्न अशी उजवी/डावी कडे तेवढीच भारदस्त मंदिरे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर नजरेत भरतात ते दोन स्तंभ. ३०-४० फुटी उचं व एका अखंड शिळेतून निर्माण केलेले हे स्तंभ कुठल्याही आधारावीना उभे आहेत. ( आपल्याकडील मंदिरात जसे दगडी दिपमाळ दिसते तसेच दक्षीणे कडील मंदिरामध्ये असे स्तंभ दिसतात, याचे धार्मिक कारण माहिती नाही आहे, पण एखाद्या मोठ्या विजयाची आठवण रहावी म्हणून असे मोठ मोठे स्तंभ त्याकाळात उभे केले जात व त्यावर राजाने मिळवलेल्या विजयाची गाथा लिहली जात असे) मंदिराच्या दोन्ही बाजूला धर्मशाळा सदृष्य तात्पुरती राहण्याची सोय ( हा प्रकार याच काळात सर्वमान्य झालेला दिसतो आहे, कारण अश्या प्रकारची सोय द्वारसमुद्रला होती असे शिलालेखाच्या माहिती वरून समजते तशीच सोय, श्रवणबेलगोळ, हंप्पी व दक्षिणेतील अनेक मंदिरात दिसते तसेच आपल्या जवळच्या महालक्ष्मी मंदिरात देखील त्या प्रकारची सोय होती पण कालांतराने त्या तात्पुरत्या निवार्‍याचे छोट्या छोट्या मंदिरात रुपांतर बडव्यांनी केले.)

स्तंभ

तात्पुरते निवास्थान
बेल्लुरची मंदिरे देखील द्वारसमुद्रामधील मंदिरासारखी शिल्पकलेचा खजीना आपल्या अंगावर घेऊन उभे आहेत. चन्नकेशवाचे (कृष्ण) मुख्य मंदिर व डाव्या बाजूला असलेले मंदिर बंद आहे तर उजव्या बाजूचे रंगनायकी मंदिर. गोलाकार व लेअर पध्दतीचे नक्षीकाम असलेले स्तंभ, प्रशस्थ असा पाषाण मंडप, त्यानंतर विषेश कक्ष व मग गाभारा अशी संरचना असलेली ही तिन्ही मंदिरे आतून व बाहेरून अत्यंत रेखीव व सुरेख अश्या शिल्पांनी मढवलेली आहेत. जगप्रसिध्द आरश्यात आपले रूप निहारणारी नर्तिका हे शिल्प देखील येथेच आहे तसेच गरूडेश्वराची पुर्णाकृती मुर्ती देखील येथील वैशिष्ट आहे. मंदिर परिसरामध्ये जलकुंड व ४ विहीरी आहेत त्यापैकी जलकुंड उपयोगी राहिलेले नाही आहेत तर चार पैकी २ विहीरी अजून ही वापरत येतात, देवाच्या अभिषेकाच्या वेळी तेथीलच पाणी वापरले जाते.

चबुतरा / मंडप ???

स्तंभ

मंदिराचे बाह्य स्वरूप
मंदिराच्या पटांगणामध्येच पुष्करणी पध्दतीने येथे एक उत्तर दिशेला थोडे छोटे असे कल्याणी नावाचे कुंड / चौकोण विहीर / तळे आहे. ११७५ मध्ये याचे निर्माण केले गेले, उत्तर व दक्षिण दिशेला असलेली दोन प्रवेशद्वारे आहेत व प्रवेशद्वार दोन्ही हत्तीचे सुरेख शिल्प व तेथून पुढे मध्यभागी निमुळती होत जाणार्‍या चौकोणी पायर्‍या अशी रचना आहे. वरून पाहताना या तळ्याची वैशिष्टपुर्ण बांधणी लक्ष्यात येते. काही शतकापुर्वी बेल्लुर हे धार्मिक स्थळ म्हणून पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले होते व तेथे रथयात्रा व इतर धार्मिक उत्सव याचे प्रस्थ वाढले होते तीच पध्दत अजून ही सुरू आहे त्यामुळे आहोरात्र येथे भाविकांचे येणे जाणे सुरू असते त्यातूनच अस्वच्छता निर्माण होऊ लागली व एकेकाळी आपल्या गोड व रुचकर अश्या पाण्यासाठी प्रसिध्द असलेली कल्याणी शेवटी लोकांसाठी बंद करण्यात आली आता फक्त बाहेरून दर्शन घेता येते, कधी एकेकाळी निळसर असलेले वाहते पाणी आता हिरवेगार पडलेले आहे.

कल्याणी जलकुंड

जलकुंड

गरुडदेव
ज्या दिवशी आम्ही बेल्लुरला गेलो तो दिवस तेथील धार्मिक जत्रेचा होता व रथयात्रेची सुरवात होण्याच्या वेळीच तेथे पोहचल्यामुळे हजारो लोकांच्या गर्दीने आमचे स्वागत केले व गर्दीमध्ये मनसोक्तपणे फिरता येत नाही व हवे ते पाहता येत नाही. त्यामुळे बेल्लुरचा प्रवास लवकर संपवून आम्ही आमच्या प्रवासातील तिसरे टोक म्हणजेच श्रवणबेलगोळ च्या दिशेने वाटचाल चालू केली.