त्याचा प्रवास सुरु होऊन खूप काळ लोटला होता, अंगावरील एकुलती एक देवदुष्या जीर्ण होऊन कधी मागे राहिली याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती, आता दिगंबर अवस्थेत त्यांचे भ्रमण सुरु होते. त्यांचा निवास हा निसर्ग निर्मित व कधी कधी मोकळ्या असलेल्या एखाद्या झोपडीत किंवा धर्मशाळेत होत असे, पण त्याचा ओढा खरा निसर्गाकडेच राहिला. असाच एक दिवस प्रवास करत करत एका जंगलातून जाताना त्याला वाटले की ही जागा योग्य आहे, आपल्या चिंतन व तप यासाठी. एक मोठा असा वृक्ष ज्याच्या फांद्या अजस्त्र अश्या आपल्या भुजा फैलावून आकाशाला गवसणी घालाव्यात या प्रमाणे पसरल्या होत्या, अश्या त्या वृक्षाची निवड केली व त्याच्या बुंध्याजवळ आपले आसन लावले. तो मिताहारी असला तरी भूक ही शेवटी शारीरिक गरज होती, तेव्हा जवळपासच्या गावात जाऊन भिक्षा घेण्यासाठी फेरी मारत असे, रसस्क्ती नव्हती ना स्वाद इच्छा. जो जे जे आहार देईल तो स्वीकारणे योग्य ते बाजूला ठेवणे व अयोग्य ते निसर्गास परत देणे, भिक्षा न मिळाली तर रिक्तहस्ते परत जाणे हा दिनक्रम चेहऱ्यावरील संतोष व आनंद न ढळू देता चालू असे. अश्याच एक दिवशी भिक्षा घेऊन आपल्या तपस्थळवर तो परत आले. अन्नग्रहण झाले व पुन्हा त्याने आसन लावले व शांतमुद्रेत तपामध्ये लीन झाला.
थोड्याच वेळात, पाला-पाचोळा तुडवत, हातातील फांदी टेकत तो वृद्ध तेथे पोचला व त्याच्या समोर एक जागा पाहून तेथे बसला. थोड्यावेळाने तो वृद्ध बोलता झाला व म्हणाला “मागील वार्तालाप व आजचा दिवस यात काय अंतर निर्माण झाले?” त्यांने हळूवारपणे डोळे उघडले व वृद्धाकडे पहात एक स्मित हास्य केले व म्हणाला “शेवटची आसक्तीकारक वस्तू देखील जीर्ण होऊन विरून गेली. एका प्रश्नातून अनंत प्रश्न उभे राहिले. ईश्वर म्हणजे कोण? हा प्रश्न सध्यातरी मोठा आहे. उत्तर मिळेल असे वाटत आहे.” तो वृद्ध एकदम सावरून बसला व म्हणाला “समजावून सांग. माझ्या माहीतीनूसार, तो ईश्वर म्हणजे निर्माता, त्राता व नष्टकर्ता! त्यानेच हे जग, हे विश्व, सगळे जीव जंतू, हा निसर्ग उभा केला. तोच कर्ता-धर्ता या जगाचा. सर्व शक्तीमान असा तो एकमेव. हे सर्व विश्व त्याने निर्मिले व नष्ट देखील तोच करणार. सुख-दु:ख याचा प्रत्येक जिवाचा वाटा त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या त्या जीवाला भोगण्यास देणे हे देखील त्याचे कार्य.”
त्याने वृद्धाकडे पाहीले व हलकेसे स्मित करत तो म्हणाला ”स्थविर, तुम्ही जो ईश्वर म्हणत आता, तो कर्ता-निर्माता आहे, पण तो सर्वशक्तीमान, एकमेवाद्वितीय असा तो नाही आहे. मी ईश्वर नाकारत नाही आहे. पण त्याचे एकमेव तोच कारणीभूत सर्वासाठी हे नाकारतो आहे. द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव ही चार विश्वे आहेत. तो ईश्वर देखील आपल्याच प्रमाणे गतिमध्ये अडकलेला आहे, चार गति आहेत, देव गति, मानव गति, तिर्यञ्च गति, नरक गति. सर्व जीवाप्रमाणे ईश्वराला देखील या गतिमधून प्रवास करावा लागतो.” वृद्धाने नकारात्मकता दर्शवत आपली मान हलवली व म्हणाला “ज्याने हे निर्माण केले त्यालाच हे भोग कसे काय सहन करावे लागतील? निर्माता कधी आपल्याच निर्माण केलेल्या भवनामध्ये हरवू शकतो?” तो हसला व म्हणाला “ तुमच्या मते जर ईश्वर सर्वशक्तीमान, एकमेवाद्वितीय आहे तर तो गतिमध्ये असणेच शक्य नाही. मग असे का? ठराविक काळाने ब्रम्ह बदलतो, नवा इंद्र, नवे देव येतात, इतर वर नव्हे तर इतर देव देखील त्यांच्या ठरलेल्या काळाने निघून जातात, त्याचे पद जाते व त्या पदावर नवा देव उभा राहतो. शेकडो जप-तप आणि पुण्य केले की इंद्रपद प्राप्ती होते ना?”
वृद्ध चपापला, थोडे सावरून बसला व म्हणाला “ मुनिवर्य, मग ईश्वर देखील आपल्या सारखाच? सुख-दु:ख आणि या विश्वाच्या चक्रात अडकलेला?” त्याने स्मित केले व म्हणाला ”त्यांना थोडे वेगळे ज्ञान मिळाले, ज्यामूळे ते देवत्वाला पोचले. सहा द्रव्याचे ज्ञान जर तुम्हाला झाले तर तुम्ही देखील ईश्वरपदी, जरी नाही पण देवपदी नक्कीच पोचाल. ते सहा द्रव्य आहे, जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काळ. सहा द्रव्य, सात तत्त्वे जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष याचे ज्ञान तुम्हाला त्या पदावर पोचवेल.”
वृद्ध म्हणाला “ देव, आज तुम्ही सम्यग्दर्शन स्वरूप सांगितले, अजून चर्चा अपेक्षित आहे. पण आता निघावयास हवे, ईश्वर यावर अजून प्रश्न. तुमचे मत आणि उत्तरे पुढील भेटीत मिळतील अशी आशा करतो” असे म्हणून वृद्ध बाजूच्या वेलीचा आधार घेत उभा राहिला, व त्याच्याकडे पाहून समाधानाने हसला आणि जाण्यासाठी वळला, तोच तो म्हणाला “ स्व:ताच्या विवेकाने सद्भूत तत्त्वांच्या अस्तित्वावर तुमची आंतरिक श्रद्धा बसली असेल तर, असे म्हणा की तुम्ही सम्यग्दर्शन स्वरूप समजावून घेतले, कारण यालाच सम्यकत्व म्हणता येईल. अजून प्रश्न जसे तुम्हाला आहेत, तसेच माझ्यासमोर देखील आहेत. आता पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी, पुढील प्रवास. भेटू असेच पुन्हा.”
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तेज होते व ओठांवर स्मित!
No comments:
Post a Comment