अनेकांना वाटत असते प्रश्नात उत्तरे किंवा उत्तरात प्रश्न दडलेला असतो. पण असे काही नसते. अनेक वेळा प्रश्न हे नुसतेच प्रश्न असतात व अनेकदा उत्तरे ही निव्वळ उत्तरे. पण मानवी स्वभाव असा असतो ना तो नसलेल्या गोष्टीकडे देखील टक लावून पाहात बसेल व नसलेल्या गोष्टीत देखील नसलेलीच गोष्ट शोधून तुमच्याशी वाद घालत बसेल. आता बघा पहाटे पहाटे १०.३० आईने मला आवाज दिला व म्हणाली "मी बाहेर चालले आहे जात आहे. जरा गेसवर भात लावला आहे त्याकडे लक्ष दे!" असे म्हणून ती निघून गेली.
मी किचन मध्ये गेलो तर एका मोठ्या पातेल्यात भात शिजायला ठेवलेला दिसला पण त्याच्याकडे लक्ष दे म्हणजे नेमकं काय करायचे असते का प्रश्न समोर उभा राहिला. मी त्या प्रश्नाला म्हणालो," अरे उभा का आहेस.. बस बस! आता तूच उत्तर दे पाहू, लक्ष दे म्हणजे नेमकं काय करायचे असते?" प्रश्न एकदम बावचाळला, दचकला व माझ्याकडे आजी मी ब्रम्ह पाहिले सारखी बावळट नजर माझ्यावर रोखून तो मला म्हणाला "तुम्हाला काही वाटते की नाही, प्रश्न आहे मी. मी का उत्तर देऊ? तुमचे उत्तर तुम्हीच शोधा." कुठून येतात या भूतलावर असा विचित्र असा लुक देऊन प्रश्न चुळबुळ करत तेथेच बसून राहिला. शेवटी मलाच काहीतरी करावे लागेल व या यक्ष प्रश्नातून स्वत:ची सुटका करून घेतली पाहिजे यावर माझे व प्रश्नाचे नकळतच एकमत झाले.
मी त्या पातेल्यात डोकावून पाहिले, वाफा येत होत्या, पाणी उकळत होते, बुडबुडे फुटत होते आणि भात आत खदाखदा हसत होता. मी शेवटी निरागसपणे ठरवले आपण या भातालाच विचारू, मी त्याला म्हणालो "कसा आहेस? आम्ही बाहेर थंडीत कुडकुडत बसलो आहोत, तू आपला मज्जेत.. उकळत बसला आहेस... ऑ.. ऑ.. मज्जा आहे बुवा. बरं एक सांग तुझ्याकडे 'लक्ष दे' म्हणजे मी नेमकं काय करणे अपेक्षित आहे बाबा? तुला तरी माहिती आहे का? " क्षणभर उकळत्या भाताला पण ठसक्का लागला व डोळे पांढरे करून तो माझ्याकडे डोळे रोखून पाहू लागला व थोडी खोलवर वाफ घेऊन म्हणाला "अरे महामानवा! प्रश्नातच उत्तर आहे रे." असे म्हणून भसाभसा वाफा सोडू लागला.
मी प्रश्नाकडे वळत म्हणालो "हे प्रश्ना..." मागे वळून पाहिले तर प्रश्न थरथर कापत उभा होता. मी त्याची ही गंभीर अवस्था पाहून त्याला पुन्हा विचारले "काय झालं रे? असा का थरथरत उभा आहेस.. जसा मी उभा असतो जेव्हा आई मी चुका केल्यावर पातेले ते झाडू मिळेल ते शस्त्र घेऊन माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत असते तसा? " प्रश्न अजून जोर जोरात थरथरत म्हणाला "देवा, देवाने तुम्हाला नाक दिले आहे ना? " असे कोड्यातील शब्द माझ्या अंगावर टाकून प्रश्न उभ्या उभ्या करपून गेला!!!!
आता आई उभी आहे, पातेले ते झाडू मिळेल ते शस्त्र घेऊन माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत!
@लेखनकिडासंपूर्ण!
No comments:
Post a Comment