Friday, March 27, 2015

नीलपक्षी

सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निष्पन्न काय झाले माहिती नाही, पण एका गुणसुत्रातून दुसऱ्या गुणसूत्रात ही लालसा जीवागणिक पसरत गेली. या अक्षय आनंदाच्या शोधात अनेक जीव काळाचे अन्न ठरले आणि त्यांचे अस्तित्व देखील लोप पावले. तरी येणारा प्रत्येक नवा जीव हा शोध घेत राहिला.
पूर्णत: श्वेतकणाच्या राज्यात प्रवेश करता झालो आहे; शेवटचा लाल ठिपका ही आता मागे चालला असे जाणवताच क्षणभर थबकलो. आधारास्तव एक अधांतरी लटकत असलेला तंतु पकडून थांबलो, आता हा शेवटचा आधार. येथे पर्यंत माझा अनेकवेळा प्रवास झाला आहे, येथून पुढे काय याची पुसट का होईना कल्पना आहे. तोच समोरील शुभ्रवलायांकित पसरलेल्या श्वेत वाळवंटातून खूप आतून आवाज आला "अजून काही पाऊले, मग तुझ्या हाती असेल अक्षय आनंद देण्याऱ्या अमृतमय झर्याचे अमुल्य जल. चार पाऊले!.."

पहिले पाऊल, टाकण्यासाठी मी अधीर झालो व मी येथे पर्यंत पोचलो याचा कुठेतरी हर्ष मनात दाटून आला आणि एक स्मितरेषा मुखावर झळकली. त्याक्षणी ज्या लाल ठिपक्याला पहात मी विसावलो होतो, तो कणाकणानी श्वेत होऊ लागला. शेवटचा रंग देखील आता श्वेतमय झाला होता. ज्या तंतुचा आधार घेऊन मी विसावलो होतो, तो तंतु हातातून अदृश्य झाला होता, आता चोहीबाजूला, दोन्ही टोकांना, वर-खाली शुभ्र आणि फक्त शुभ्र ह्या एकाच रंगाचे अस्तित्त्व होते.

मागे जेव्हा या पायरीवर पोचलो होतो, तेव्हा येथे मला एक नीलपक्षी दिसला होता, क्षणभरच. त्याच्या चोचेत एक रक्तमय लाल असलेला एक तंतु होता.. आणि तो माझ्याकडे आश्वासक पहात अत्यंत वेगाने श्वेत आभाळ छेदत या श्वेतवाळवंटातून बाहेर निघू पहात होता, थोड्या वेळाने तो नीलपक्षी गेला, आणि त्याच वेगाने खाली आला, पण निर्जीव होऊन. मी जेथे उभा होतो अगदी तेथेच पडला, श्वेतकणांच्या ढिगामध्ये! त्याच्या चोचीत तो रक्तमय लाल तंतु नव्हता, त्याच्या चेहरयावर अत्यंत सुखाचे भाव होते... आणि अचानक श्वेतरंगात पुन्हा लाल ठिपके वाढू लागले व माझ्याही नकळत मी मागे मागे ओढला गेलो.

खूप वेळ गेला, पुन्हा एकदा नीलपक्षी येईल आणि परत मला मागे घेऊन जाईल की काय? मी त्याची वाट पाहतो आहे? तो यावा असे वाटत आहे की? तो येऊ नये असे वाटत आहे? थोड्या काळापूर्वी कोणताच प्रश्न मनात नसताना हे नवप्रश्नाचे वादळ अचानक का निर्माण झाले असावे? सर्व जाणिवा ह्या आपल्या स्वनिर्मित असतात, आपण कोणीतरी, कोणासाठी तरी आखून दिलेल्या चौकटीमध्ये स्वत:च बंधिस्त होतो व कालानंतराने स्वत:च ती चौकट तोडू पाहतो तेव्हा असे प्रश्न निर्माण होऊ लागतात. मागे आलेला नीलपक्षी काय, झराजवळ जो कोणी बसला आहे जो मला बोलवत आहे तो काय व मी काय? आम्ही सर्वजण कुठल्याश्या अनामिक आशेने बांधले गेलो आहोत. स्वत:हून मागे फिरण्याची माझी शक्ती देखील नाही आहे, ना मला ती मुभा. नीलपक्षी येईल न येईल हे ती ललाटश्लोक लिहणारी माया जाणो! पण आता पर्याय म्हणून माझ्या हाती आहेच काय पुढे जाणे सोडून?

जसे जसे पुढे जाऊ लागलो, तसे तसे एक एक श्वेतकिरण बाण माझ्या शक्तीहिन, जर्जर शरीरात प्रवेश करू लागले. मस्तकाच्या दारी कोणीतरी पोचले होते. आठवणीचे पदर दूर करत करत कोणीतरी खूप खोलवर माझ्या मनाच्या डोहात प्रवेश करू पहात होते, फक्त जाणिवा होत होत्या, पण ती क्रिया थांबवणे माझ्या शक्तीच्या देखील बाहेर होते. आतील विश्वात चाललेला गरादोळ मी एका क्षणी विसरलो जेव्हा एक निर्वाज्य हसू कानावर आले. या दुर्गम्य अश्या श्वेतवाळवंटात माझ्या शिवाय अजून कोण आहे? हा प्रश्न निर्माण होऊ पर्यंत, माझ्या बाजूला सुवर्णगरुड येऊन बसला.

"बस थोडा वेळ. विश्रांती घे." सुवर्णगरुड अधिकार वाणीने बोलता झाला. "तुझ्या सारखे अनंत जीव येथे पोचतात, मनात आशा घेऊन. आयुष्यभर निरर्थक काहीतरी शोधत. कोणी मुल्यवान खडे शोधत, कोणी मुल्यवान धातू शोधत, कोणी सुख शोधत, कोणी 'तो' शोधत. मानवी जीवनाची ही शोकांकिका म्हणावी का? जन्मल्या क्षणापासून, अगदी गर्भात बीजारोपण झाल्यापासून तुम्ही शोध चक्रात गोल गोल फिरू लागता ते अगदी मृत्यूच्या राज्यात प्रवेशकर्ते होऊन ही तुमचा शोध थांबत नाही." दूरवर नजर गाढीत तो पुन्हा बोलू लागला " हो, या श्वेतवाळवंटात तो झरा आहे. सत्य आहे."

त्याच्याकडे पहात मी म्हणालो "तो, बोलवणारा आवाज तुमचाच होता?" सुवर्णगरुड माझ्याकडे पहात म्हणाला "हो, ते माझे नियित कार्य आहे. पण कोणाला द्यावे कोणाला नाही हे ठरवण्याचा हक्क देखील दैवयोगे माझ्याकडे आहे. येथून काहीच अंतरावर तो झरा आहे. घेऊन जाईन मी तुला तिकडे, पण! त्या आधी तूला काही सांगावे असे वाटले म्हणून मी येथे आलो आहे. तू शेवटचा लाल ठिपका पाहिला आहेस, तो लाल ठिपका तुझी जीवन लालसा होती. तू ज्या आधारे उभा होतास तो तंतु तुझी तुझ्या विश्वाशी जोडणारी नाळ होती, आणि राहता राहिला प्रश्न श्वेत कण यांचा! हे श्वेत आहेत हे तुझे गृहितीक आहे, मुळात आता येथे कोणताच रंग नाही आहे. तू मला देखील सुवर्ण स्वरुपात पाहतो आहेस पण मी अस्तित्वातच नाही आहे. या सर्वांमध्ये तुझा नसलेला मात्र फक्त तुझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा तो नीलपक्षी मात्र खरा आहे, प्रार्थना कर तो नीलपक्षी पुन्हा यावा..."

"का माझा मोहभंग केलास?" मी खिन्न आवाजात बोललो "हे सर्व मला माहिती होते, असे नाही पण असे कदाचित असू शकेल अशी एक शक्यता मी गृहीत धरुन होतो पण त्याच सोबत हे सर्व खोटे असेल व दिसत असलेले सर्व खरे देखील असेल अशी एक आशा देखील मनात होती. तू कोण आहेस माहिती आहे सुवर्णगरुडा? माझ्या स्वप्नाचे मूर्तस्वरुप! तू देखील माझाच कण आहेस. तू जे सत्य सांगत आहेस त्याचे कारण देखील आता मला ज्ञात आहे, मी तेथे, त्या झर्याजवळ पोचल्या क्षणी सर्वात प्रथम तुझे अस्तित्व शून्य होईल. कारण जेथे माझेच अस्तित्व नसेल तेथे माझी स्वप्ने कशी तगतिल? "

सुवर्णगरुड माझ्याकडे पहात स्मितहास्य करत म्हणाला "मला माझ्या अस्तित्वाची चिंता नाही आहे, पण तुझे अस्तित्व संपेल याची भीती आहे. चिरंजीवीत्व असे काही नसते. अमरत्व हा एक असा आरसा आहे जो काळ थांबवतो व आपण स्व बिंब पाहण्यात गुंग होऊन जातो, कालांतराने त्या आरश्याचा पारा उडू लागतो व त्याच सोबत अमरत्वाची नकली पापुद्रे देखील. त्या नंतर पहिल्यांदा होणारे आपले आपल्याला खरे दर्शन एवढे भयावह असते की, आपण स्व इच्छेने मृत्यू मागू लागतो पण तो अधिकार आपण आधीच मोहापायी गमवलेला असतो."

"आता माघारी जाण्यासाठी कुठे दरवाजा? आणि कोठे वाट!" मी थोडा अस्थिर होत, शरीरात ऊर्जा गोळा करत परत बोलता झालो "मी येथे प्रवेशकर्ता झालो तेव्हाच का नाही थांबवलेस मला तू?" सुवर्णगरुड माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहात म्हणाला "मी? मी प्रयत्न केलाच, पण माझ्यासोबत नीलपक्ष्याने देखील प्रयत्न केला पण तू येथे पोचल्याच्या अतीव समाधानात डोळे बंद करून उभा होतास.. तो लाल ठिपका.. असाच श्वेत झालेला तूला दिसला नाही, तर त्या मागे कारण तू नीलपक्ष्याकडे दुर्लक्ष केलेस हे आहे. प्रार्थना कर त्या नीलपक्ष्यास परत येण्याची, त्याच्या शिवाय तुझी येथून मुक्तता नाही...."

मस्तक गरगरत आहे, मी खोलवर कोठेतरी अज्ञात जागी कोसळत आहे, चोहीबाजूला अंधकार वेगाने वाढतो आहे वर शुभ्र आकाश हळुहळु लुप्त होत आहे, माझे डोळे बंद होत आहेत... एका क्षणी जिवाच्या आकांताने मी डोळे उघडले...

वर वितभर श्वेत प्रकाशाचे अस्तित्व दिसत होते, कोणत्याही क्षणी तेथे देखील अंधकार भरुन वाहणार होता, तोच... अत्यंत वेगाने नीलपक्षी पल्याड जाताना दिसला, त्याचे डोळे अश्वासनाने परिपूर्ण होते, धीर देत होते व त्याच्या चोचीत तो रक्तमय तंतु होता. दूर वरुन सुवर्णगरुडाचा क्षीण आवाज आला..."अजून काही क्षण..... तो आला आहे!"

Thursday, January 29, 2015

माझं थोबाड...

" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो." राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर " बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा." थोबाड बघितलं आहे का आरसामध्ये कधी ?" पहिली मुलगी जीला प्रपोज केलं होतं ती (वय लिहायची गरज नाही ;) )" "किती काळवंडला आहे चेहरा माझ्या बाळाचा, कशाला उन्हात खेळतो रे " मोठी माऊशी." तोंडाला काय लावून घेतले आहेस बाळा ? आमचा राजा कुठे आहे ? " रंगपंचमीला ग्रीस कोणी तरी फासल्यामुळे चेहरा / केसं अनोळखी झाला तेव्हा आई म्हणाली."कुठ थोबाड फोडून घेतलं रे " माझा एक मित्र, जेव्हा मी मार खाऊन आलो होतो शाळेतून." अपना फेस देखा है क्या, साला तु पियेगा बियर, मेरे साथ ? " एका बियर पिण्याच्या पैजेच्या वेळी मित्र.

असं आयुष्यभर कोठे ना कुठे नेहमी तोंडाचा, थोबाडाचा माझ्या चेहराच्या उदोउदो होतच असे. कधी शाळेत, कधी हॉस्टेल मध्ये कुठल्यातरी सराने / बाईने वाजवल्यामुळे चेहराचा रंग बदलतच असे त्यात नवीन काही नव्हतंच मला, पण कधी खुप वेळ पंचगंगेत डुबक्या मारल्यामुळे तर रंगपंचमीला डोळ्यात रंग गेल्यामुळे ताबारलेले डोळे व त्यात आमचं चित्रविचित्र थोबाड बघून लहान मुले बघताच रडायला सूरु होतं. कधी काळी सायकल शिकताना पडलो त्यामुळे नाकाच्या सुरवातीलाच एक कच, चांगलाच मोठा, तर अक्काचे पुस्तक फाडले होते म्हणून तीने कानाजवळ आपल्या नखांनी केलेली नक्षी, भले मोठे डोळे व कधी काळी क्रिकेटचा बॉल लागल्यावर सुजलेले व वाकडे झालेले नाक, उजव्या होठावर तिळ , स्वर नलिका दोन इंच बाहेर आल्या सारखी दिसणे ! भुवयावर केसं देवानं जसे वरदान दिले असावे तसे दोन्ही सख्खे जुळे भाऊ असल्यासारखे जुडलेले, म्हणजे आमचं थोबाड. रंग तसा गोराच, जसं १००% पाढं-या रंगात ४०% काळा व ३०% ताबुस रंग मिक्स केल्यावर जसा रंग तयार होईल तसा, पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.

असो,

आता थोबाड आठवायचं कारणं म्हणजे, मागील आठवड्यापासून वेळ मिळाला नव्हता व हा आठवडा आजारपणात काढला त्यामुळे थोबाडा कडे बघायला वेळ मिळालाच नाही आज जरा कंटाळा आला होता टिपी करुन म्हनून विचार केला मोकळा वेळ सतकारणी लावावा, त्यासाठी जवळच असलेल्या माझ्या नावडत्या हजामाकडे कडे गेलो व म्हणालो " काट डाल सबकुछ... " तो दचकला व म्हणाला " क्या साहब ? सबकुछ सफाचट ? गंजा होणा है क्या ? " अरे लेका... " नाही यार, थोडा बाल कम कर बाकी दाढी, मुछे सफाचट."तो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला " साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप" लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ.. हा उच्च विचार माझ्या मनात आला होता की बोलावं त्याला पण त्याच्या हातात माझी मुंडी व थोबाड दोन्ही होतंच तसेच एक कात्री व समोर ठेवलेला वस्तरा पण दिसत होता त्यामुळे मी त्याला एकदम संयमाने म्हणालो " बिझनेस मिटिंग मे बिझी था.. तु काटो बाल.. काटो.." 

पंधरा मिनिटामध्ये त्यांने माझी केसं कमी कापली व मेंदुला बोलून बोलून झिनझिन्या जास्त आणल्या, आधीच आजारी त्यात जरा पण विचार केला की गुढगा दुखतो त्यात तो माझं नसलेलं डोकं खात होता भसा भसा.. पण आलीया भोगासी , कर्म. आपल्याच पापाची फळे ह्याच भुतलावर मिळतात असं कुठ तरी वाचलं होतं, त्याचं मुर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर बोलत होतं, राजकारणापासून पाकीस्तान पर्यंत पाकिस्तान पासून हेमामालिनी पर्यंत अर्धा तासात त्याने सबसे तेज चॅनेलला पण लाजवेल ह्या स्पीड मध्ये बातम्या दिल्या, हिचं लग्न झालं, तीचं अफेयर झालं, तो मेला तो जगला. सर्व काही. घरा जवळ आहे व जास्त लाबं मी जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या कडे येण्याची बुध्दी झाली व मी माझ्या बुध्दी वर किव करत बसलो होतो.

फक्त एक तासात त्याने माझे केस कापले व पुढील अर्धातास त्यांने माझी दाढी व मिशी काढायला घेतली ह्यावरुन तुम्हाला त्याचा कामाचा वेग व बोलण्याचा वेग कळालाच असेल. असो, त्यांने तोडावर फसाफसा पाणी मारत माझ्या चेहरा निरखुन पाहात म्हणाला " साब, आप का फेशीयल कर दुं क्या ? चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा" मी त्याच्या कडे डोळे मोठे करुन बघीतले तेव्हा तो गडबडून म्हणाला " नहीं नहीं, आपका रंग तो साफ है ही, फेशीयल से निखर जायेगा, कंपनी गॅरेंटी देती है साब कलर गोरा होने की, बाल भी काले करा लो या गारनियर के यह रंग शेड देख लो जो पसंद हो वही तयार कर देता हूं" त्याच्या कामाचा वेग व बोलण्याचा वेग पाहून मी नकार देण्याचं ठरवलं होतं पण, समोर आरशामध्ये पाहिल्यावर मला माझा लहानपणाचा गोरा रंग आठवला व त्या नजर लावणा-या मुलींच्या नावाने बोटे मोडली व त्याच रागात मी त्याला हो म्हणावे की नाही ह्याचा मी विचार करत होतो तो त्याने काही ही विचार न करता त्याने सरळ माझ्या थोबाडाला कसलीशी क्रिम फासू लागला व दहा एक मिनिटात माझ्या थोबाडावर चांगलाच पांढ-या रंगाचा थर जमा करुन बाहेर गेला मला कळालेच नाही, मी त्याला शोधण्यासाठी , पाहण्याचा वळण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेरुन ओरडला " हिल ना मत साब, क्रिम को सुख ने आराम से सिट पर बैठे रहो." मी जो हुकुम सरकार असं म्हणत चुपचाप बसून राहिलो.

काही मिनिटात तो आता ही क्रिम धुणार व माझा रंग एकदम उजळणार व आपला हरवलेला गोरा रंग सापडणार अशी काही दिवास्वप्ने मला त्या खुर्चीवर बसून पडू लागली ! पंधरा मिनिटाने तो आला व हळुहळु माझ्या चेह-यावरील ती क्रिम काढून लागला, मी एकदम काही तरी मी नवल पाहणार आज ह्या नजरेने समोर अरसामध्ये आपलं थोबाड पाहत होतो, पण कसले काय ०.००१% पण रंग गोरा झाला आहे असं मला तरी वाटलं नाही पण तो लेकाचा म्हणाला " देखा साब, कितना फरक पडा आप अगले हप्ते भी करा ले ना दो चार बार करोगे तो आप का रंग गोरा जरुर होगा. " आता चेह-यावर प्रयोग केलाच होतो आता केसांच्या कडे त्याचे लक्ष होते पण मी त्याच क्षणी भानावर आलो व म्हणालो " बाल कलर मत करना बाद में देखुंगा, जब टाईम होगा तब." त्याचं मन खट्टु झालं पण मी आपल्या निर्णयावर पक्का होतो पण त्याने ठरवलं असावं की अजून काहीतरी प्रयोग करायचाच माझ्या वर त्यासाठी त्याने पुन्हा माझ्या भुवया पाहत म्हणाला" साब, एक काम करता हूं, आप कि भोएं ठिक ठाक करता हूं.. ठीक है" त्याला केसाला कलर करुन नको असे सांगून त्याचं मन मी दुखावलंच होतं... आता चार भुवयावरील केसंच काढतो म्हणत आहे तर काढू दे बापडा हा उच्च विचार करुन मी त्याला बरं कर म्हणलो... थोड्या वेळाने कळालं कि तो माझा उच्च नाही तर हुच्च विचार होता.

त्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता... भयानक त्रास होत होता एक केस जेथून निघे तेथे रक्त आलं की काय असं वाटतं होतो, तो आपलं ते शस्त्र चालवत म्हणाला "साब, अब देख ना आपका चेहरा आप को भी नया दिखेगा" माझ्या डोळ्यात आसवं जमा झाली होती व मी आता सुरवात झालीच आहे ह्याचा कुठे तरी अंत असेल असा विचार करुन त्याचे अत्याचार सहन करत राहिलो, थोड्यावेळाने त्याने आपले शस्त्र म्यान केले व माझं थोबाड परत साफ करत म्हणाला "देखो साब, हो गया कितना आसान था" मी माझ्या भुवया चोळत म्हणालो " बहोत आसान था... कितना हुवा "

खिश्यातून दिलेले अडीचशे रुपये, कोरलेल्या भुवया व माझा न उजळलेलं थोबाड घेऊन मी तेथून बाहेर पडलो. व शिकलेली अक्कल आपल्या मेंदुमध्ये कुठेतरी खुणगाठ बांधावी तशी बाधून स्वतःशीच निर्णय घेतला की आज पासून आपल्या थोबाडावर कुणालाच प्रयोग करुन द्यायचे नाहीत... जे आहे, जसं आहे तसं आपलं !

हा विचार करुन आपल्या घराकडे चाललो तर एक मित्र भेटला व म्हणाला " क्या हाल है, अच्छे दिख रहे हो, दाढी-मुछ कटवाई बढिया किया, एक काम कर ना जो तुम्हारा डॉक्टर दोस्त है ना, उसको बोल तेरी तेढीं नाक व सींधा कर दे! एकदम हिरो लगेगा भाई तु " माझ्या चेहराचा बदललेला रंग व मी माझं पायतान हात घेण्यासाठी खाली वाकलो.... हे पाहताच तो सुसाट सटकला तेथून !


माझं थोबाड समाप्त !(19-9-2009) 

Saturday, January 10, 2015

प्रवास ! - हरिद्वार

तु केव्हा शांत एकाजागी बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो? हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात, कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे. खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव. पण मी संगणकापासून वेगळा झालो, की मला निसर्ग हवा असतो! मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग आपला सैयाद्री किंवा  दूरवरचा सरळ हिमालय.. नाहीतर खडतर सुख राजस्थान.. नाही तर सुदूर पसरलेला हवाहवासा दक्षिण भारत.. नव्या वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या कुशीत गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने.

दिल्लीला असताना कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडला नाही,  घरातून मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस ? तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड... एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे "ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे". मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना? ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.

कुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदीमध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगासाठी एक वेगळी खास भावना आहे, जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण प्रवासाची, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जीवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो. त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा. एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.

धडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सरळ घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब! हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच अनुभव तुमच्या शरीराला आंदोलित करतो, व पहिल्या स्पर्शानंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही.  मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.

हर की पौडींचा घाट म्हणजे गंगादर्शन नाही. खरं गंगादर्शनचा अनुभव जर तुम्हाला घायचा असेल, तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल. काही एक किलोमीटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल, अश्या जागी. का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे. हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी, कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर अनेकवेळा एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार?

तयारी? कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची थोडी लांब दोरी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस! एकदा प्रवास सुरु झाला की मनात एकचं पक्के करायचे पाऊलवाटा फसव्या असतात, त्यावर खूप अवलंबून राहणे धोकादायक देखील ठरू शकते.  सर्वबाजूने नजरेला दिसत असलेली एकादी गोष्ट उदा. एखादे मोठे उंच झाड, एकदा डोंगरमाथा  हे मार्गदर्शक म्हणून निवडायचे व नदीची साथ न सोडता प्रवास सुरु करायचा... हर हर गंगे!

(क्रमश:)

Friday, January 9, 2015

प्रश्न ?

अनेकांना वाटत असते प्रश्नात उत्तरे किंवा उत्तरात प्रश्न दडलेला असतो. पण असे काही नसते. अनेक वेळा प्रश्न हे नुसतेच प्रश्न असतात व अनेकदा उत्तरे ही निव्वळ उत्तरे. पण मानवी स्वभाव असा असतो ना तो नसलेल्या गोष्टीकडे देखील टक लावून पाहात बसेल व नसलेल्या गोष्टीत देखील नसलेलीच गोष्ट शोधून तुमच्याशी वाद घालत बसेल. आता बघा पहाटे पहाटे १०.३० आईने मला आवाज दिला व म्हणाली "मी बाहेर चालले आहे जात आहे. जरा गेसवर भात लावला आहे त्याकडे लक्ष दे!" असे म्हणून ती निघून गेली.
मी किचन मध्ये गेलो तर एका मोठ्या पातेल्यात भात शिजायला ठेवलेला दिसला पण त्याच्याकडे लक्ष दे म्हणजे नेमकं काय करायचे असते का प्रश्न समोर उभा राहिला. मी त्या प्रश्नाला म्हणालो," अरे उभा का आहेस.. बस बस! आता तूच उत्तर दे पाहू, लक्ष दे म्हणजे नेमकं काय करायचे असते?" प्रश्न एकदम बावचाळला, दचकला व माझ्याकडे आजी मी ब्रम्ह पाहिले सारखी बावळट नजर माझ्यावर रोखून तो मला म्हणाला "तुम्हाला काही वाटते की नाही, प्रश्न आहे मी. मी का उत्तर देऊ? तुमचे उत्तर तुम्हीच शोधा." कुठून येतात या भूतलावर असा विचित्र असा लुक देऊन प्रश्न चुळबुळ करत तेथेच बसून राहिला. शेवटी मलाच काहीतरी करावे लागेल व या यक्ष प्रश्नातून स्वत:ची सुटका करून घेतली पाहिजे यावर माझे व प्रश्नाचे नकळतच एकमत झाले.
मी त्या पातेल्यात डोकावून पाहिले, वाफा येत होत्या, पाणी उकळत होते, बुडबुडे फुटत होते आणि भात आत खदाखदा हसत होता. मी शेवटी निरागसपणे ठरवले आपण या भातालाच विचारू, मी त्याला म्हणालो "कसा आहेस? आम्ही बाहेर थंडीत कुडकुडत बसलो आहोत, तू आपला मज्जेत.. उकळत बसला आहेस... ऑ.. ऑ.. मज्जा आहे बुवा. बरं एक सांग तुझ्याकडे 'लक्ष दे' म्हणजे मी नेमकं काय करणे अपेक्षित आहे बाबा? तुला तरी माहिती आहे का? " क्षणभर उकळत्या भाताला पण ठसक्का लागला व डोळे पांढरे करून तो माझ्याकडे डोळे रोखून पाहू लागला व थोडी खोलवर वाफ घेऊन म्हणाला "अरे महामानवा! प्रश्नातच उत्तर आहे रे." असे म्हणून भसाभसा वाफा सोडू लागला.
मी प्रश्नाकडे वळत म्हणालो "हे प्रश्ना..." मागे वळून पाहिले तर प्रश्न थरथर कापत उभा होता. मी त्याची ही गंभीर अवस्था पाहून त्याला पुन्हा विचारले "काय झालं रे? असा का थरथरत उभा आहेस.. जसा मी उभा असतो जेव्हा आई मी चुका केल्यावर पातेले ते झाडू मिळेल ते शस्त्र घेऊन माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत असते तसा? " प्रश्न अजून जोर जोरात थरथरत म्हणाला "देवा, देवाने तुम्हाला नाक दिले आहे ना? " असे कोड्यातील शब्द माझ्या अंगावर टाकून प्रश्न उभ्या उभ्या करपून गेला!!!!
आता आई उभी आहे, पातेले ते झाडू मिळेल ते शस्त्र घेऊन माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत!
@लेखनकिडासंपूर्ण!

Sunday, December 28, 2014

माझे महान प्रयोग - २

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.
सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !
माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध ! झाला चहा तयार.. पण माझ्या ह्या मताला लवकरच तडा गेला.. ! भाडं कुठलं घ्यावं ह्यावर दोन मिनिटे चिंतन झाले पण भाजपाच्या चिंतन शिबीराप्रमाणेच काही नक्की न झाल्या मुळे हातात जे आलं ते भांडे उचलले व गॅसवर ठेवले, एक कप शोधला व एक कप पाणी त्या भांड्यात ओतले, मस्त पैकी फ्रिज मधून दुध बाहेर काढले व एक कप प्रमाणे भांड्यात ओतले, थोडीशी शोधाशोध चालू केली साखरे साठी, वरच्या रॅक वरील डब्बा काडताना डब्ब्या बरोबर दोन-तीन ग्लास पण खाली आले, मी कॅच केले असे मला वाटले पण क्षणातच खनखणाट झाला व तीन्ही ग्लास भुईसपाट झाले... हातातला डब्बा किचन च्या ओट्यावर ठेऊन आधी झाडू शोधला व प्लॅस्टिकची सुपली घेऊन धारातिर्थ पडलेले ग्लास चे मोठे तुकडे गोळा केले व डस्टबीन मध्ये त्यांना समाधी दिली. परत माझा मोर्चा चहा कडे वळवला, चहा पुड माझ्या नशीबाने समोरच होती, पण आधी चहा पुड घालावी की आधी साखर ह्या बद्दल निर्णय होत नव्हता त्यामुळे एका हातात एक चमचा साखर व दुस-या हातात एक चमचा चहापुड असे सम प्रमाण त्या दुध-पाणी मध्ये टाकले पण जो कलर निर्माण झाला त्यानुसार मला असे वाटले की चहापुड कमी आहे त्यामुळे मी अजून एक चमचा चहा पावडर टाकली, तोच आठवले की चहापुड जास्त झाली की चहा कडू होतो त्यामुळे मी परत एक चमचा साखर घातली.
सर्व तयारी करुन मी एक कप व काही बिस्किटे काढून ट्रे मध्ये सजवली व विचार केला की अजून एक पाच मिनिटात चहा तयार होईल तो पर्यंत आपण डिश टिव्ही चालू करुन येऊ या. मी टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले, मी स्वतःच हसलो व नॉब फिरवून गॅस चालू केला व लायटर ने खॅट खॅट केले पण गॅस नाही पेटला, आता मात्र मी मला समजेणासे झाले की गॅस का पेटत नाही आहे, मी शेगडी पासून खाली जाणारी नळी पाहील तर मला रेग्युलेटर आठवला, मी सिलेंडर वर असलेला रेगुलेटर पाहिला तर तो सतबीर ने काढून ठेवला होता, मी त्याला मस्त पैकी शिव्या दिल्या दोन तीन.. व तो रेगुलेटर परत सिलेंडर वर जोडला व नॉब चालू करुन गॅस पेटवला.
तोच टिव्ही वर माझे आवडते गाणे, मस्स्ककली मटककली चालू झाले पण बाहेर आलो व टिव्ही वरी गाणे पाहू लागलो तो मला आठवल की चहा. मी पळत आत आलो तर अजून उकळी फुटली नव्हती, मी गॅस समोरच उभे रहावे ह्या निर्णयावर आलो व तेथेच उभा राहिलो चहा कडे बघत. तोच मला आठवलं की कुठे तरी हल्दीराम भुजीया आहे डब्यात, ती पण काढू म्हणून मी मागे वळुन डब्बा शोधू लागलो, डब्बा हाती लागताच मागे काही तरी सुं.. सुं... सुं.. झाले ! चहा ने बंड केला होते व काही चहा उकळी बरोबर भांड्यातून बाहेर शेगडी वर पसरला होता.. मी डोक्याला हात लावला व फटाफट गॅस बंद केला व ह्या गडबडीत ओट्यावर ठेवलेला चहापावडरचा डब्बा खाली कोसळला व मी त्याचे झाकण लावले नव्हते हे सांगण्याची काही गरज नसावीच Wink
७.२५ मिनिटे नंतर
मस्त पै़की स्वतः तयार केलेल्या चहाचा घोट घेत मी टिव्ही पाहत बसलो व काही वेळाने ताणून दिली परत....
९.२५ मिनिटे नंतर
मिपा उघडला, माझ्या व्यतिरिक्त नवीन लेखन इत्यादी शोधले काही सापडले नाही Wink सरळ पाककृती विभागात क्लिकलो वमटार-पालक पराठे हा जरा त्यातल्या त्यात सोपा प्रकार निवडा, जेवणासाठी. व कुणाची ही मदत घ्यायची नाही हे ठरवले.
सोपंच आहे, मटार २ वाट्या, पालक २ वाट्या,आल १ पेरा एवढं,लसुण ४ पाकळ्या, मिरची /तिखट आवडीनुसार,मीठ चविनुसार
कणिक अंदाजे, तांदुळाचे पिठ ४ चमचे, पिठ मळुन घेण्यासाठी तेल , पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. बस्स ! जास्त कटकट नाही.. की झंझट नाही.. हा विचार करुन मी हेच करायचं ठरवले.
आधी फ्रिज मध्ये / किचन मध्ये काय काय सामान आहे व नाही आहे ह्याची लिस्ट तयार केली.
मटार - हाजीर.
पालक - हाजीर.
आलं - गैर हाजीर.
लसुण - हाजीर
मीरच्या - हाजीर (लाल / हिरव्या / शिमल्या मिर्च वाल्या पण हाजीर)
तांदुळाचे पिठ - गैर हाजीर
तेल - हाजीर
प्लास्टीक पिशवी :? - सहा पिशव्या हाजीर ( हे कश्याला हा प्रश्न )
म्हणजे आलं व पिठ ह्यांची जुळणा करायला हवी, कॉलीनीतल्या दुकान वाल्याला फोन केला.
मी " आलं है ? "
तो " आलं ?"
मी " स्वारी, अदरक है ? "
तो " है"
मी " १०० गॅम "
तो " आगे "
मी " चावल का आटा है ?"
तो " क्या.. नही है."
मी " तो बस अदरक भेज दे, एफ-३१ में"
तो " क्या साब, मजाक कर रहे हो, १०० ग्रॅम अदरक के लिए किसे भेजू"
त्याच्या ह्या नख-यामुळे मला एका आल्याच्या तुकड्यासाठी दोन साबुण व शॅप्मु विनाकारण घ्यावा लागला.
१०.०५ मिनिटे नंतर
आलं झालं, पिठाचं काय करायचं ? शेवटी डोक्यात आयडीयाची कल्पनेने भरारी घेतली व किचन मध्ये जाऊन तांदळाचा शोध चालू केला, तांदुळ मिळाले पण माझा धक्का लागून चार अंडी ठेवलेला बाऊल खाली पडला व त्याच्या बरोबर अंडी पण.... ! झालं पुन्हा पुसणे साफ सफाई करुन मी, तांदुळ व मिक्सर समोरासमोर बसलो. तांदुळ मिक्सर मध्ये घातले व मिक्सर चालू केला... घर घर घर... चांगले दहा मिनिटे फिरवले व ढक्कण उघडून बघितले तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे झाले होते पण पिठ काय तयार झाले नाही, शेवटी मी मिक्सरचे मॅन्युअल शोधण्याचा प्रयत्न केला व ते बॉक्स मध्येच सापडले. त्यात लिहल्यानुसार मी त्याच्या ब्लेडस बदलल्या व पुन्हा मिक्सी चालू करुन तांदळाचे पिठ निर्माण केले. त्याला ३० % कोणी ही पिठ म्हनून शकेल येवढे ते बारिक जरुर झाले Wink
एक स्टेप पुर्ण केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर दिसू लागला होता.
आता बस तयारी चालू करायची व पराठे तयार !
पाणी उकळायला ठेवले व त्यात मटार + पालक घड्याळ लावून आठ मिनिटे उकळली, व नंतर मिक्सि मध्ये सर्व आयटम जे हाजीर होते त्यांना १० मिनिटे फिरवले.. मस्त पैकी त्याचे पण पिठासारखे बारिक बारिक तुकडे झाले... ब्लेड चेंज करायला विसरलो होतो. तरी हरकत नाही ह्यामुळे काही फरक पडणार नाही हा उच्च विचार करुन मी ते सर्व मिश्रण एका भांड्यात ओतले. व तयार मिश्रणात तांदळाचे पिठ घातले पण किती घालावे ह्यावर गाडी अडली पण मीच अंदाजे सर्व पिठ त्यात ओतले, आता कणिक हा काय आयटम आहे हे डोके खाजवले तरी शेवट पर्यंत मला उमजले नाही त्यामुळे तो आयटमी मी फालतू चा समजला व त्याला लिस्ट मधून बाहेर केला.
पाककृती लेखिकेने / लेखकाने सैलसर मळून घ्या असं लिहले आहे पण सैलसर मळणे म्हणजे काय हे मला उमजले नाही त्यामुळे मी सैलसर चा अर्थ पाणी जास्त पिठ कमी असा घेतला व त्यानुसार मळायला सुरवात केली माझ्या हिशोबाने पाणी जास्त होते पण हळू हळू मळताना पिठ जास्त मजबुत होऊ लागले व पाणी गायब, म्हणून परत पाणी घातले तर ह्यावेळी पाणी जरा जास्तच पडले म्हणून परत जरा पिठ घातले असे करत करत जे दळलेले पिठ होते ते सर्वं संपले.. पण थोडेसे सॉस सारखे पातळ पिठ मळून तयार झाले, ज्याचा रंग हिरवा दिसत होता.
आता प्लास्टिकच्या पिशवीची जुळणा करुन मी ते मिश्रण त्यावर थापले... (थापल्या पेक्षा पसरवले हे योग्य वाटत आहे) गॅस चालू केला, तवा त्यावर ठेवला व पाच एक मिनिटाने तवा गरम झाल्या वर मी ते मिश्रण तव्यावर ठेवले... तोच ती प्लॅस्टिकची फिशवी भसाभास आजूने जळू लागली व एक सहन न होऊ शकणारा दुर्गंध किचन मध्ये पसरला.. मला लक्ष्यात आले की आपण चुकलो आहोत.. मी लगेच गॅस बंद केला एक ग्लास पाणी तव्यावर ओतला, तव्याचा हाल पाहण्या लायक झाला होता, वरचे पराठा मिश्रण खाली पडले व प्लास्टिक सगळे तव्याला चिटकले... मी निराशेने तो तवा बाजूला ठेवला व दुसरा नवीन नॉन्स्टिकचा तवा परत गॅस वर ठेवला... आता मला तेल का हवे ते कळाले.
मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले व त्याला उचलून तव्यावर उलटा केला पण सर्व मिश्रण लोळागोळा होऊन एकाच जागी पडले... मी हळुच उलाथण्याने ते मिश्रण सर्व तव्याभर पसरवले व माझ्या डोक्यात आयडीया चमकली... की पुढील वेळी आपण सरळ तव्याला तेल लावू व त्यावर मिश्रण पसरवू !
मी माझा पहिला स्वनिर्मित पराठा तव्यातून बाहेर काढला व त्याला एका प्लेट मध्ये ठेवला, व दुस-याची तयारी करु लागलो, दुसरा सरळ तव्यावरच पसरवला व तो पकण्याची वाट पाहू लागलो तोच बाजूला प्लेट मध्ये असलेला पराठा मला खुणवत होता.. टेस्ट कर टेस्ट कर पण मी स्वतःला संयमीत करुन उभाच राहीलो पण काही क्षणात संयम सुटला व मी सरळ त्या पराठ्याचा एक
तुकडा तोडून तोंडात टाकला... अरे वा ! मस्त चव. पण जरा कच्चां राहिला असावा असे वाटले पराठा, मी जरा निरखुन पाहीले तर मी पराठा तव्यावर फिरवलाच नव्हता.
१०.४५ मिनिटे नंतर
दोन-तीन पराठे करपल्यामुळे... जळल्यामुळे.. खराब झाले पण त्यानंतरचे दहा-बारा पराठे एकदम व्यवस्थीत झाले, जरा टेस्ट विचित्र होता.. पण ठिक स्वतः तयार केलेल्या आयटम ला का नावे ठेवा.. काही नाही जरा मिठ घालायला विसरलो होतो.. हिरवी कि लाल मिर्च ह्या नादात दोन्ही मिर्च घातली होती त्यामुळे तिखट जाळ झाला होता पराठा पण टेस्टी होता बॉस ! मी जोर लावून दोन पराठे कसे बसे खल्ले ! व किचनचा दरवाजा बंद करुन मस्त पैकी दोन ग्लास मोसंबी ज्युस घेतला व गप्प संगणक चालू करुन मिपा-मिपा खेळू लागलो Wink
चार अंडी, दोन-तीन काचेचे फुटलेले ग्लास, मिक्सर + मिक्सरची सर्व भांडी व ब्लेड्स , सर्व किचन भर पसरलेले सामान, खाली काढून ठेवलेले डब्बे व डझनाने धुण्याची भांडी एक प्लास्टिक जळून चिटकलेला तवा व दहा एक मटार-पालक पराठे चे पराठे मी सतबीर साठी सोडून त्याच्या येण्याची वाट बघू लागलो !
संध्याकाळी ०५.१० मिनिटे नंतर
"हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " - एका पायावर नाचत सतबीर किचन मधून बाहेर येताना मला दिसला व मी लगेच मागच्या दाराने.... बागे कडे सटकलो !
रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर
पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !
***************************************************
* आता सध्या कानाला खडा लावला आहे.. नो प्रयोग @ किचन ! ना बाबा ना !

Monday, December 22, 2014

मामाचे गाव (आत्या आज्जी)

सुट्टीमध्ये आमच्या खूप गमती-जमती चालत असे. वाड्याच्या थोड्याच अंतरावर खाली एक ओढा वाहत असे, भर उन्हाळ्यात फक्त डबक्यात पाणी भरलेले असे व सवर्त्र वाळूचे साम्राज्य पसरलेले. दोन फुट खड्डा जरी हाताने खणला तरी ओलसर वाळू हाताला लागत असे. ओढ्याचा एक मोठा भाग आम्हाला दिसायचा पण जेथून ओढा सुरु होत असे तेथे घनदाट झाडी असल्यामुळे पाणी कोठून येथे हा प्रश्न आमच्या समोर नियमित असायचा. पावसाळ्यात तुडुंब भरलेला ओढा उन्हाळ्यात डबक्यात कसा मावतो याचे उत्तर शोधण्याचे आम्ही आमच्या परीने अनेक प्रयत्न करायचो. मावस बहीणी एकापेक्षा एक शक्कल लढवायच्या, कोणी म्हणायचे वरच्या बाजूला एक राक्षस राहतो तो सगळे पाणी पिऊन टाकतो, कोणी म्हणायचे देव रुसतो म्हणून पाणी बंद करतो. प्रत्येक बहिणीकडे एक ना एक कारण नक्की असायचे सांगण्यासारखे! पण एक दिवस संन्मती म्हणाली की आत्या आजीने पाणी बंद केले आहे, आमचा सर्वांचा एकजात विश्वास बसला व आम्ही सगळे एकसुरात म्हणालो हो हो! तीच असेल पाणी बंद करणारी. वाड्यातील विहीरीच्या मोटाजवळ उभे राहून कोणी किती बालटी पाणी अंघोळीसाठी घेतले व त्याचा हिशोब मांडणारी व्यक्तीच ओढ्याचे पाणी बंद करु शकते यावर आमचा पक्का विश्वास बसला.
ईसावअज्जा च्या तावडीत सापडणारी मुले भल्या पहाटे शेतातील विहीरीवर अंघोळीला जात व राहिलेल्या मुली व घरातील प्रत्येक व्यक्ती वाड्यावरील विहीरीतून पाणी घेऊन अंघोळ करे. पिण्याच्या पाण्याची विहीर असल्यामुळे त्या विहीरीत उतरण्यावर प्रत्येकालाच बंदी होती. आजोबा पण वयोमानानूसार शेतातील विहीर पोहायला जाणे बंद केल्यावर याच विहीरीतील एक-दोन बालटी पाणी घेऊन अंघोळ आवरायचे, कधीमधी आजोबानां जर तिसर्‍या बालटीचा मोह झालाच तर आत्या आज्जी त्यांना पण ओरडायची. आत्या आज्जी कोण ती पाणी घेतं हे पाहण्यासाठी जातीने त्या विहीरीवर पहाटे पासून उभी असायची, आई म्हणते ती उभी असते पण पाटीला आलेल्या वळणामुळे ती आम्हाला कायम वाकलेली दिसायची. उरल्या-सुरल्या पांढर्‍या शुभ्र केसांची जुडी मागे घेतलेली, पुढे असलेले उरलेले दोन दात कायम ती हसत असल्यासारखे दिसत असायचे. मोठा मामा नेहमी म्हणायचा " हीला पांढरी साडी घालून रस्तावर जर रात्री उभी केली तर किमान ३-४ लोक मयत होतील" व खदाखदा हसायचा. तो हसला की घरातले सगळे हसायचे. मग आजोबा हातातील काठी जोरात वाजवायचे व म्हणायचे " ती होती म्हणून तुम्ही सगळे आहात विसरु नका!"
आत्या आज्जीचे सगलेच काही वेगळे होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना आम्ही घाबरायचो ते आजोबा देखील तिला घाबरायचे. काही महत्त्वाचे निर्णय जरी आजोबा घेत असले तरी, आराम खुर्चीवर बसल्या बसल्या आत्या आज्जीला हाताने बोलवायचे व ती जवळ आली की निर्णय सांगून तिला विचारायचे "अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?" मग आत्या आतून खोलवर घळीतुन आलेल्या आवाजात म्हणायची " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!" ही अशी म्हणत असे खरी पण एकादा निर्णय तीला आजोबा सोडून दुसरीकडून समजला रे समजला की हिचा तोंडचा पट्टा चालू होत असे, "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी" इत्यादी इत्यादी. मग घरात जो कोणी येईल जाईल त्याला हे रडगाणे ऐकवायचे. कोणीच मिळाले नाही तर मला किंवा माझ्या बहिणीपैकी कोणाला तरी पकडून दिवसभर तेच तेच सांगत राहयचे हा तिचा स्वभाव. वर जर आजोबा, मामा समजवण्यासाठी गेले तर अगदी लहानपणापासून माझेच कसे वाईट घडले, दुष्काळात तीचे कसे हाल झाले, तीच्या वडिलांनी (आमचे पंजोबा) कसे विहीरीतील पाणी दिले नाही हे रडगाणे चालू होत असे. मध्येच कोणीतरी बाई नकटा आवाज काढून म्हणत असे की "अच्छा, म्हणजे त्याचा बदला म्हणून बाल्टी मोजून पाणी देतेस तर.." हा टोमणा नेहमी प्रमाणे लहान मावशीनेच दिला असायचा, पण आत्या आज्जी चवताळून उठे व मला थोडेफार कन्नड समजते ते कन्नड सोडून अत्यंत कर्शक आवाजात इतके काही बोलत राहयची की शेवटी आजोबा पुढे होऊन तीचे पाय धरायचे.
तिचा राग तिचा त्रागा हळू हळू निवळत असे व ती शेवटी आपल्या खोलीचे दार धाड करून बंद करत असे. थोडावेळ आत राहिल्यावर ती गुपचुपपणे दरवाजा उघडायची व तीचा खास कडी-कुलुप असलेला पितळी डब्बा घेऊन बाहेर येत असे व पहिली हाक मला मारे "राज्या बा इकडे" मी धावतच जात असे, कारण त्या पितळी डब्बात असलेला माझा आवडता तुपातील बेसनचा लाडू सगळ्यात आधी मलाच मिळणार हे मला माहीत असे. डब्ब्यातील दोन लाडू काढून आज्जी माझ्या हातात देत असे व लटक्या रागाने मला सांगायची " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"

>"अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?"
अक्का, हा विचार आहे, तुझे काय मत आहे?
>> " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!"
"आप्पा, तु विचार कर, चांगले वाईट बघ. म्हणजे निर्णय तुच घे, मी कोण नाही/होय म्हणायला? हे सगळे तुझेच आहे!"
>>> "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी"
"मी कोण, तुम्ही का याल मला विचारायला, मरु पर्यंत तरी विचारा, म्हणजे देवाला हात जोडते, मी घरात रहाते, जेवण करुन जेऊ घालता, उपकार करताय"
>> " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"
जा, आप्पाला एक दे, आणि तु एक घे.

Sunday, December 14, 2014

“पडणे” एक कला

दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी पडणे एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे,  तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की पडणे या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.
काही लोक केळाच्या सालीवरून घसरून पडतात व मी पडलो असे तोंड वर करून सांगतात, अहो पण हे पडणे नाही आहे, हे चुकून केळाच्या सालीने तुमच्या पायाखाली यावे व तुम्ही पडावे एवढी साधी घटना आहे. पडणे एक कला आहे, एक आर्ट आहे. अनेक जण तर उभ्या उभ्या पडतात, का म्हणे तर चक्कर आली. अहो, दिवसभर व्यवस्थीत पाणी ढोसले असते, पोटाला मुठभर अन्न दिले असते तर काय बिशाद तुम्ही चक्कर येऊन पडाल?

पडणे म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही २०-२५ च्या वेगाने धावत जिना उतरत आहात व पाच एक जिने उतरल्यावर तुम्ही एका मोक्याच्या क्षणी उडाण करता व पुढे जिन्यावर पायाचा स्पर्श न होऊ देता तुम्ही शरीराच्या मदतीने बरोबर तळ मजल्यावर येता व लगेच हात झटकत उभे राहून मला काय झाले नाही, असे नाकातून आलेले रक्त शर्टाच्या उजव्या बाहीने फुसत सांगू शकलात म्हणजे तुम्ही योग्य रीतीने पडलात. अनेकदा आपण पडलो हे इतरांना सांगता यावे म्हणून काही महाभाग ठेचकाळले असले तरी किती, जोरात मी पडलो! असे बिनधास्त खोटे बोलून जातात, पण अश्या लोकांच्या मुळे आमच्या सारख्या सतत अभ्यास करून पडणारया लोकांच्यावर मान खाली घालण्याची वेळ येते हे त्यांना कळत नाही. पडण्याचे दुसरे सुंदर उदाहरण म्हणजे वाहन चालवताना पडणे (या विषयावर मी माझा पिय-चडी प्रबंध सादर केला आहे) वाहन चालवताना पडण्याचे अनेक प्रकार आहेत पण नेहमी ज्याचा आनंद घ्यावा म्हणजे वाहन घसरणे!
वाहनावरून घसरून पडणे आणि वाहनासहित घसरून पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महाभाग आम्ही पाहिले आहेत जे वाहनावर बसतानाच पडले. मी त्यांच्याबद्दल लिहित नाही आहे, मी वाहनासहित जे पडतात अश्या थोर लोकांच्याबद्दल सांगत आहे.  तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) गाडी योग्य जागी आली म्हणजे काहीतरी गाढवपणा करावा, उदा. उगाच पुढील ब्रेक मारणे, समोर रस्तावर खडी दिसत असली तरी वेग वाढवणे, समोरचा खड्डा आपल्याकडे पाहून खदाखदा हसतो आहे व आपण त्याला टाळू शकत नाही हे माहिती असून देखील टाळण्याचा प्रयत्न करणे, एकादी सुंदरी बाजूने जात असेल तर तिचा चेहरा पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करणे, तीव्र उतार असेल तर झिगझ्याग पद्धतीने उगाच गाडीचा वेग वाढवत जाणे.. इत्यादी इत्यादी.  आता यातील कोणताही एक गाढवपणा केला कि तुम्ही सहजपणे पडू शकता. लगेच पडता येत नाही, थोडा अभ्यास करावा लागतो, पण जमेल. अजून एक वाहनाची दोन्ही चाके वर झाली व तुम्हाला कोणी थोबाडावर पाणी मारून उठवले म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पडला नाहीत हे समजून घ्या व पुढील वेळी दक्ष रहा.
जेव्हा आपण वाहनावरून पडत असू, तेव्हा शरीराचा धरणी सोबत होणारा प्रत्येक स्पर्श आणि स्पर्श तुम्हाला जाणवलाच पाहिले, जेव्हा धरणीमाते चरणी  तुमचे डोके तुम्ही ३-४ दा ठेवाल तर तो सुखद स्पर्श तुमच्या आंतरमनात नाहीतर किमान खोपडीवर कोरला जायलाच हवा. पडताना आपले पाय, आपले हात, आपली उरलेली सर्व हाडे कुठे कुठे आहेत याचा अंदाज तुम्हाला असायलाच हवा जेणे करून नंतर डॉक्टरने एखादे हाड गायब केले तर तुम्हाला समजू शकेल. याचे जिवंत उदा. मीच आहे, मी एक उच्च कोटीची पडण्याची कला दाखवली होती, पायातील हाड बाहेर आलेले मी याची देही-याची डोळे पाहिले होते पण नंतर डॉक्टरने बील दिले कि पायाचे हाड सापडले नाही म्हणून रॉड घातला. तर आपल्या सर्व हाडांची दक्षता घ्या आणि हो, तुम्ही पडलेले आहात, बरं तुम्ही एकटे पडलेले नाही आहात, तुमचे वाहन.. ह्या ह्या ह्या..  विसरला काय राव!!!!  तर ते वाहन एकतर तुमच्या पुढून घसरत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण ते मागू घसरत येत असेल तरी काळजी करू नका, जे घडणार ते घडणार.  मग थोड्यावेळाने सर्वकाही थांबेल,  म्हणजे तुम्ही, तुमचे वाहन, मागचे ट्राफिक! घाबरून जायचे नाही, सावकाश हसत हसत उठायचे, हसणे मस्ट आहे, कारण तुमचे नाक तुटले असेल, किंवा बत्तीस पैकी काही शिल्लेदार तोंड सोडून गेले असतील, गालावर कुठे लागले असेल तर लगेच जाणवते. मग हळूच पाय हालवून पहा, पाय घालला, म्हणे तुम्ही हालवल्यावर हालला तर ओके, पण आपोआप लुडकला असेल तर जयपूर फुट स्वस्त झाले आहेत काळजी नसावी. पाय सलामत असतील तर हात हालवून पहा, मग मान, मग पार्श्वभाग..  दुखत तर सर्वत्र असेल पण कळ येत असतील तर तुम्ही पुन्हा पडण्यास सज्ज आहात.. याची मी खात्री देतो.


·         नेहमी डोक्यावर हेल्मेटची सवय ठेवा, मी अनेक वेळा त्याचमुळे वाचलो आहे. आणि वाहन काळजीने, काळजीपूर्वक चालवा  (आता मीच ३ दिवसापूर्वी पडलो, लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच जागेवर अजून जोरात पडण्याचा पराक्रम केला आहे, शक्यतो हे विश्वरेकोर्ड माझ्या नावानेच लागेल. तरी घ्या मनावर आणि सुरक्षित रहा!)