Sunday, December 14, 2014

“पडणे” एक कला

दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी पडणे एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे,  तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की पडणे या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.
काही लोक केळाच्या सालीवरून घसरून पडतात व मी पडलो असे तोंड वर करून सांगतात, अहो पण हे पडणे नाही आहे, हे चुकून केळाच्या सालीने तुमच्या पायाखाली यावे व तुम्ही पडावे एवढी साधी घटना आहे. पडणे एक कला आहे, एक आर्ट आहे. अनेक जण तर उभ्या उभ्या पडतात, का म्हणे तर चक्कर आली. अहो, दिवसभर व्यवस्थीत पाणी ढोसले असते, पोटाला मुठभर अन्न दिले असते तर काय बिशाद तुम्ही चक्कर येऊन पडाल?

पडणे म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही २०-२५ च्या वेगाने धावत जिना उतरत आहात व पाच एक जिने उतरल्यावर तुम्ही एका मोक्याच्या क्षणी उडाण करता व पुढे जिन्यावर पायाचा स्पर्श न होऊ देता तुम्ही शरीराच्या मदतीने बरोबर तळ मजल्यावर येता व लगेच हात झटकत उभे राहून मला काय झाले नाही, असे नाकातून आलेले रक्त शर्टाच्या उजव्या बाहीने फुसत सांगू शकलात म्हणजे तुम्ही योग्य रीतीने पडलात. अनेकदा आपण पडलो हे इतरांना सांगता यावे म्हणून काही महाभाग ठेचकाळले असले तरी किती, जोरात मी पडलो! असे बिनधास्त खोटे बोलून जातात, पण अश्या लोकांच्या मुळे आमच्या सारख्या सतत अभ्यास करून पडणारया लोकांच्यावर मान खाली घालण्याची वेळ येते हे त्यांना कळत नाही. पडण्याचे दुसरे सुंदर उदाहरण म्हणजे वाहन चालवताना पडणे (या विषयावर मी माझा पिय-चडी प्रबंध सादर केला आहे) वाहन चालवताना पडण्याचे अनेक प्रकार आहेत पण नेहमी ज्याचा आनंद घ्यावा म्हणजे वाहन घसरणे!
वाहनावरून घसरून पडणे आणि वाहनासहित घसरून पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महाभाग आम्ही पाहिले आहेत जे वाहनावर बसतानाच पडले. मी त्यांच्याबद्दल लिहित नाही आहे, मी वाहनासहित जे पडतात अश्या थोर लोकांच्याबद्दल सांगत आहे.  तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) गाडी योग्य जागी आली म्हणजे काहीतरी गाढवपणा करावा, उदा. उगाच पुढील ब्रेक मारणे, समोर रस्तावर खडी दिसत असली तरी वेग वाढवणे, समोरचा खड्डा आपल्याकडे पाहून खदाखदा हसतो आहे व आपण त्याला टाळू शकत नाही हे माहिती असून देखील टाळण्याचा प्रयत्न करणे, एकादी सुंदरी बाजूने जात असेल तर तिचा चेहरा पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करणे, तीव्र उतार असेल तर झिगझ्याग पद्धतीने उगाच गाडीचा वेग वाढवत जाणे.. इत्यादी इत्यादी.  आता यातील कोणताही एक गाढवपणा केला कि तुम्ही सहजपणे पडू शकता. लगेच पडता येत नाही, थोडा अभ्यास करावा लागतो, पण जमेल. अजून एक वाहनाची दोन्ही चाके वर झाली व तुम्हाला कोणी थोबाडावर पाणी मारून उठवले म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पडला नाहीत हे समजून घ्या व पुढील वेळी दक्ष रहा.
जेव्हा आपण वाहनावरून पडत असू, तेव्हा शरीराचा धरणी सोबत होणारा प्रत्येक स्पर्श आणि स्पर्श तुम्हाला जाणवलाच पाहिले, जेव्हा धरणीमाते चरणी  तुमचे डोके तुम्ही ३-४ दा ठेवाल तर तो सुखद स्पर्श तुमच्या आंतरमनात नाहीतर किमान खोपडीवर कोरला जायलाच हवा. पडताना आपले पाय, आपले हात, आपली उरलेली सर्व हाडे कुठे कुठे आहेत याचा अंदाज तुम्हाला असायलाच हवा जेणे करून नंतर डॉक्टरने एखादे हाड गायब केले तर तुम्हाला समजू शकेल. याचे जिवंत उदा. मीच आहे, मी एक उच्च कोटीची पडण्याची कला दाखवली होती, पायातील हाड बाहेर आलेले मी याची देही-याची डोळे पाहिले होते पण नंतर डॉक्टरने बील दिले कि पायाचे हाड सापडले नाही म्हणून रॉड घातला. तर आपल्या सर्व हाडांची दक्षता घ्या आणि हो, तुम्ही पडलेले आहात, बरं तुम्ही एकटे पडलेले नाही आहात, तुमचे वाहन.. ह्या ह्या ह्या..  विसरला काय राव!!!!  तर ते वाहन एकतर तुमच्या पुढून घसरत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण ते मागू घसरत येत असेल तरी काळजी करू नका, जे घडणार ते घडणार.  मग थोड्यावेळाने सर्वकाही थांबेल,  म्हणजे तुम्ही, तुमचे वाहन, मागचे ट्राफिक! घाबरून जायचे नाही, सावकाश हसत हसत उठायचे, हसणे मस्ट आहे, कारण तुमचे नाक तुटले असेल, किंवा बत्तीस पैकी काही शिल्लेदार तोंड सोडून गेले असतील, गालावर कुठे लागले असेल तर लगेच जाणवते. मग हळूच पाय हालवून पहा, पाय घालला, म्हणे तुम्ही हालवल्यावर हालला तर ओके, पण आपोआप लुडकला असेल तर जयपूर फुट स्वस्त झाले आहेत काळजी नसावी. पाय सलामत असतील तर हात हालवून पहा, मग मान, मग पार्श्वभाग..  दुखत तर सर्वत्र असेल पण कळ येत असतील तर तुम्ही पुन्हा पडण्यास सज्ज आहात.. याची मी खात्री देतो.


·         नेहमी डोक्यावर हेल्मेटची सवय ठेवा, मी अनेक वेळा त्याचमुळे वाचलो आहे. आणि वाहन काळजीने, काळजीपूर्वक चालवा  (आता मीच ३ दिवसापूर्वी पडलो, लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच जागेवर अजून जोरात पडण्याचा पराक्रम केला आहे, शक्यतो हे विश्वरेकोर्ड माझ्या नावानेच लागेल. तरी घ्या मनावर आणि सुरक्षित रहा!)



No comments:

Post a Comment