इसावअज्जा मला शेतात घेऊन जेव्हा जात असे तेव्हा खरी मज्जा येत असे. मी विचारलेल्या एक आणि एक प्रश्नाला खरी-खोटी जशी समजतील तशी इसावअज्जा उत्तर देत असे. मग पेरु हिरवाच का? प्रश्नाचे उत्तर पानांचा रंग लागतो ना म्हणून हिरवा. विहीर गोल का? तांबे, पेले, वाट्या, घागरीची तोंड गोल असतात म्हणून विहीरीचे तोंड गोल. नाना प्रश्न ना ना उत्तरे.
आजोबांच्या दुरवर परसलेल्या उसाच्या वाडीत एका कोपर्यात एक कौलारु बैठ घर. मातीच्या भिंती, दोन खोल्या. त्यावेळी लाईट नसायची आमच्याकडे. लाईट फक्त शेताला पाणी द्यायचे असायचे तेव्हाच येते असं इसावअज्जा सांगायचा. आतल्या खोलीत काहीबाही सामान भरुन ठेवलेले असायचे. मला त्या खोलीची खुप उत्सुकता लागून राहलेली असे, कारण आत हजारो गोष्टी भरुन ठेवलेल्या होत्या व त्या सगळ्या मला हव्या होत्या. त्यात जूने पणतीचे दिवे होते, कंदिल होते, वेगवेगळी अवजारे होती व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वरच्या मोठ्या तुळईवरच्या खिळ्यावर काही पतंग लटकलेले होते. इसावअज्जा माझे भले किती लाड करत असे पण त्या खोलीकडे मला जाऊ देत नसे. मी मागे ते देत असे पण ते पतंग देत नसे. तरी मी खुष होतो, इसावअज्जा माझा फुगलेला चेहरा व मला ती खोली का पाहू देत नाही या रागामुळे लाल झालेला नाकाचा शेंडा पाहून लगेच खास लपवून ठेवलेले लाल पेरु विळत्यावर कापून माझ्या समोर धरत असे. त्याला माहीती होते एकवेळ मी आंबा नको म्हणेन रागात पण लाल पेरुला कधीच नाही म्हणणार नाही.
त्या घराच्या बाहेरच्या खोलीत मात्र मला मनसोक्त दंगा घालण्याचा मुभा होता, ज्वारीची पोती आणि पोती भरलेल्या त्या खोलीत काय नव्हते? पोत्यांची घसरगुंडी होती, दगडी दोन दोन जाती होती, भली मोठी वजन तांगडी होती व सगळ्यात महत्वाचे तेथे मोठा, खूप मोठा म्हणजे मी व माझ्या सगळया बहिणी त्यात बसतील असा एक मोठा लाकडी झोपाळा होता. मी त्यावर पुर्ण झोपलो तरी दोन्ही बाजुला व उजवीकडे डावीकडे खूप म्हणजे खूप जागा राहत असे. मी माझे दोन्ही हात, दोन्ही पाय फैलावून त्यावर झोपलो तरी त्यावर तरीही खूप जागा राहत असे.
इसावअज्जा समोर लाकडी आराम खुर्चीवर बसून कडदोर्याला बांधलेली चंची काढून, त्यातून पान, चूना, तंबाखु व कात काढून माझा चाललेला दंगा बघत, गालातल्या गालात हसत पान तयार करून घेत. जर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले की मी पानासाठी हट्ट धरणार हे त्यांना माहीती असायचे मग ते हळून एक कोवळे इटुकले पानं काढत व पान करण्याची सगळी साग्रसंगीत अवलंबून ते चुन्याच्या जागी पाणी लावलेले, तंबाखुच्या जागी चार बडिसोफाच्या गोळ्या घातलेले पान मला देत. मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघू, मी बाहेर पडण्यासाठी पुढे झालो की इसावअज्जा प्रत्येक भिंतीवर प्रदक्षिणा घालताना जसा हात भिंतीवर ठेऊन चालतात तसे चालत घराच्या चारी कोपर्यातून दरवाजाकडे येत असे. तो पर्यंत मी समोर असलेल्या मातीच्या ढिगार्यावर हुडदंग चालू केलेला असे व इसावअज्जा माझ्यावर डाफरत म्हणे "कन्नगं मन्न होईत नोडू (डोळ्यात माती गेली बघ!)" असे म्हणून डोळे धोतराने पुसत असे. मग ते न बोलता पुढे पुढे निघत व मी त्यांच्या मागे मागे.
तुळतुळीत डोक्याचे, खुप उंच असलेले, नेहमी धोतर नेसणारे, सदरा न घालता फक्त पंचा खांद्यावर बाळगणारे हे इसावअज्जा म्हणे गांधीजींचे भक्त होते पण ते असे पुढे पुढे चालत असले की त्यांच्या हलणार्या सावलीतून त्यांच्या मागे मागे जाण्यात मला खूप आनंद मिळत असे. ते जरा खुषीत असले की स्तोत्र इत्यादी म्हणत रमत-गमत चालायचे व मी ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी त्यांच्या मागे-पुढे पळापळ करायचो. आमची ही दांडीयात्रा घरी पोहचू पर्यंत संध्याकाळ झालेली असायची. अंधार पडायच्या आत इसावअज्जा पडवीतील दिवे लावण्याच्या कामी लागायचा व मी आज काय मज्जा केली हे सांगायला माजघराकडे पळायचो.
असेच एकदा आम्ही शेतातून परत आल्यावर कट्यावरील आपल्या वेताच्या आराम खुर्चीत डुलत बसलेल्या आजोबांनी इसावअज्जाला आपल्याकडे बोलवले. इसावअज्जा व आजोबा खूप वेळ बोलत बसले, मी खाऊ खाऊन आलो तरी ते बोलत होते, मी वर जाऊन आक्काशी भांडून आलो तरी बोलत होते, जेवणासाठी पंगत बसली तरी ते बोलत होते. रोज पंगतीत होणारा थोडाफार हास्य विनोद थांबला होता, सगळे मोठे गंभीर चेहर्याने जेवत होते व आम्ही लहान मंडळी बावरुन गप्प मऊ भात गिळत होतो. अचानक फुटलेल्या एका हुंदक्यामुळे मी बावरुन इकडे तिकडे पाहिले मोठी मामी, सन्न मामी, सदलगा मामी, लहान माऊशी, मोठी माऊशी, बेळगावची काकी व एकोंडीची काकी तोंडात पदर घेऊन रडत होत्या व सोबत जेवत होत्या. शेजारी बसलेली आई हुंदके देत होती व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होती. मोठी लोक भुतकाळात गेली होती व लहान मंडळी मोठ्यांचा हा वेगळाच अवतार पाहून डोळ्यात आलेले पाणी थोपवून एकमेकांच्याकडे पाहत आधी कोण रडण्याची सुरवात करतो हे पहात होती.
"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल." आजोबा थोडे जोरातच बोलले. भरल्या ताटात हात धूऊन माझ्याकडे भरल्या डोळ्याने बघत इसावअज्जा पंगतीतून उठले. पंगत संपली. काय झाले? हा प्रश्न चिन्ह चेहर्यावर घेऊन बालचूम अंगणात जेथे झोपायचे होते त्या त्या जागेवर जाऊन बसले. दुसर्या मजल्याच्या गॅलरीमध्ये आजोबा दोन्ही हात मागे बांधून करारी चेहर्याने शतपावली करत होते, स्वयंपाक घरातून भांड्याच्या आवाजासोबतच खुसफुस चाललेली कळत होती पण समजत मात्र काहीच नव्हते. मात्र रात्री झोपण्याच्या वेळेस उलगडा झाला.. तो मोठे मामा व एकोंडीच्या काकीच्या बोलण्यातून.
चुलीत भडकलेली आग, त्यात इसावअज्जा च्या बायकोने घेतलेला पेट व त्या गोंधळात आपल्याच तान्हा मुलाला पाळण्यातून काढण्याच्या तीचा प्रयत्न.. सगळेच संपलेले होते. शेतावर असलेले इसावअज्जा व कामगार तेथे पोहचू पर्यंत कोळसा झालेला होता दोघांचा.. पेटल्या घराची आग सगळ्यांनी मिळून विजवली पण इसावअज्जा चे ते पेटलेले घर काय त्यांच्या मनातून विजले नाही. माजघराच्या दोन पाऊले समोर असलेल्या विहीरीत जर पेटलेल्या बायकोने उडी मारली असती तर सगळे नीट झाले असते असे इसावअज्जाला नेहमी वाटतं असे. पण त्यांच्या बायकोला पोहता येत नव्हतं!
या गोष्टीला अनेक वर्ष झाली, जखमावर खपली चढली, शेतातलं घर सोडून आमच्या आजोबांच्या घरी इसावअज्जा राहण्यासाठी आला कायमचा, त्या वर्षी जन्मलेल्या मुलीच्या पोटी अनेक वर्षानी मुलगा झाला. दोन्ही आजोळ मुलींनी फुलले असताना कोणाच्या ध्यानीमनी नसतात ना! सगळेच आनंदले पण सर्वात जास्त आनंद कोणाला झाला तर इसावअज्जाला कारण त्याच्या त्या तान्हामुलाच्या उजव्या ओठावर पण म्हणे तीळ होता...
क्रमशः
No comments:
Post a Comment