सुट्टीमध्ये आमच्या खूप गमती-जमती चालत असे. वाड्याच्या थोड्याच अंतरावर खाली एक ओढा वाहत असे, भर उन्हाळ्यात फक्त डबक्यात पाणी भरलेले असे व सवर्त्र वाळूचे साम्राज्य पसरलेले. दोन फुट खड्डा जरी हाताने खणला तरी ओलसर वाळू हाताला लागत असे. ओढ्याचा एक मोठा भाग आम्हाला दिसायचा पण जेथून ओढा सुरु होत असे तेथे घनदाट झाडी असल्यामुळे पाणी कोठून येथे हा प्रश्न आमच्या समोर नियमित असायचा. पावसाळ्यात तुडुंब भरलेला ओढा उन्हाळ्यात डबक्यात कसा मावतो याचे उत्तर शोधण्याचे आम्ही आमच्या परीने अनेक प्रयत्न करायचो. मावस बहीणी एकापेक्षा एक शक्कल लढवायच्या, कोणी म्हणायचे वरच्या बाजूला एक राक्षस राहतो तो सगळे पाणी पिऊन टाकतो, कोणी म्हणायचे देव रुसतो म्हणून पाणी बंद करतो. प्रत्येक बहिणीकडे एक ना एक कारण नक्की असायचे सांगण्यासारखे! पण एक दिवस संन्मती म्हणाली की आत्या आजीने पाणी बंद केले आहे, आमचा सर्वांचा एकजात विश्वास बसला व आम्ही सगळे एकसुरात म्हणालो हो हो! तीच असेल पाणी बंद करणारी. वाड्यातील विहीरीच्या मोटाजवळ उभे राहून कोणी किती बालटी पाणी अंघोळीसाठी घेतले व त्याचा हिशोब मांडणारी व्यक्तीच ओढ्याचे पाणी बंद करु शकते यावर आमचा पक्का विश्वास बसला.
ईसावअज्जा च्या तावडीत सापडणारी मुले भल्या पहाटे शेतातील विहीरीवर अंघोळीला जात व राहिलेल्या मुली व घरातील प्रत्येक व्यक्ती वाड्यावरील विहीरीतून पाणी घेऊन अंघोळ करे. पिण्याच्या पाण्याची विहीर असल्यामुळे त्या विहीरीत उतरण्यावर प्रत्येकालाच बंदी होती. आजोबा पण वयोमानानूसार शेतातील विहीर पोहायला जाणे बंद केल्यावर याच विहीरीतील एक-दोन बालटी पाणी घेऊन अंघोळ आवरायचे, कधीमधी आजोबानां जर तिसर्या बालटीचा मोह झालाच तर आत्या आज्जी त्यांना पण ओरडायची. आत्या आज्जी कोण ती पाणी घेतं हे पाहण्यासाठी जातीने त्या विहीरीवर पहाटे पासून उभी असायची, आई म्हणते ती उभी असते पण पाटीला आलेल्या वळणामुळे ती आम्हाला कायम वाकलेली दिसायची. उरल्या-सुरल्या पांढर्या शुभ्र केसांची जुडी मागे घेतलेली, पुढे असलेले उरलेले दोन दात कायम ती हसत असल्यासारखे दिसत असायचे. मोठा मामा नेहमी म्हणायचा " हीला पांढरी साडी घालून रस्तावर जर रात्री उभी केली तर किमान ३-४ लोक मयत होतील" व खदाखदा हसायचा. तो हसला की घरातले सगळे हसायचे. मग आजोबा हातातील काठी जोरात वाजवायचे व म्हणायचे " ती होती म्हणून तुम्ही सगळे आहात विसरु नका!"
आत्या आज्जीचे सगलेच काही वेगळे होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना आम्ही घाबरायचो ते आजोबा देखील तिला घाबरायचे. काही महत्त्वाचे निर्णय जरी आजोबा घेत असले तरी, आराम खुर्चीवर बसल्या बसल्या आत्या आज्जीला हाताने बोलवायचे व ती जवळ आली की निर्णय सांगून तिला विचारायचे "अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?" मग आत्या आतून खोलवर घळीतुन आलेल्या आवाजात म्हणायची " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!" ही अशी म्हणत असे खरी पण एकादा निर्णय तीला आजोबा सोडून दुसरीकडून समजला रे समजला की हिचा तोंडचा पट्टा चालू होत असे, "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी" इत्यादी इत्यादी. मग घरात जो कोणी येईल जाईल त्याला हे रडगाणे ऐकवायचे. कोणीच मिळाले नाही तर मला किंवा माझ्या बहिणीपैकी कोणाला तरी पकडून दिवसभर तेच तेच सांगत राहयचे हा तिचा स्वभाव. वर जर आजोबा, मामा समजवण्यासाठी गेले तर अगदी लहानपणापासून माझेच कसे वाईट घडले, दुष्काळात तीचे कसे हाल झाले, तीच्या वडिलांनी (आमचे पंजोबा) कसे विहीरीतील पाणी दिले नाही हे रडगाणे चालू होत असे. मध्येच कोणीतरी बाई नकटा आवाज काढून म्हणत असे की "अच्छा, म्हणजे त्याचा बदला म्हणून बाल्टी मोजून पाणी देतेस तर.." हा टोमणा नेहमी प्रमाणे लहान मावशीनेच दिला असायचा, पण आत्या आज्जी चवताळून उठे व मला थोडेफार कन्नड समजते ते कन्नड सोडून अत्यंत कर्शक आवाजात इतके काही बोलत राहयची की शेवटी आजोबा पुढे होऊन तीचे पाय धरायचे.
तिचा राग तिचा त्रागा हळू हळू निवळत असे व ती शेवटी आपल्या खोलीचे दार धाड करून बंद करत असे. थोडावेळ आत राहिल्यावर ती गुपचुपपणे दरवाजा उघडायची व तीचा खास कडी-कुलुप असलेला पितळी डब्बा घेऊन बाहेर येत असे व पहिली हाक मला मारे "राज्या बा इकडे" मी धावतच जात असे, कारण त्या पितळी डब्बात असलेला माझा आवडता तुपातील बेसनचा लाडू सगळ्यात आधी मलाच मिळणार हे मला माहीत असे. डब्ब्यातील दोन लाडू काढून आज्जी माझ्या हातात देत असे व लटक्या रागाने मला सांगायची " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"
>"अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?"
अक्का, हा विचार आहे, तुझे काय मत आहे?
>> " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!"
"आप्पा, तु विचार कर, चांगले वाईट बघ. म्हणजे निर्णय तुच घे, मी कोण नाही/होय म्हणायला? हे सगळे तुझेच आहे!"
>>> "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी"
"मी कोण, तुम्ही का याल मला विचारायला, मरु पर्यंत तरी विचारा, म्हणजे देवाला हात जोडते, मी घरात रहाते, जेवण करुन जेऊ घालता, उपकार करताय"
>> " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"
जा, आप्पाला एक दे, आणि तु एक घे.
No comments:
Post a Comment