Sunday, November 16, 2014

एक अडनिड गावाची गोष्ट...

दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं! पहाटे पहाटे गावाला जाग यायची ती बिरोबाच्या मंदिरातील ढोलच्या आवाजाने. गाव वसायच्या आधीपासून बिरोबा येथे येऊन बसलेला, आणि बिरोबाच्या आशिर्वादाने हे गाव वसलं असे गावाची जुनी खोडं सांगायची. विजेचे खांब तालुकाच्या गावात कधीच पोचलेले, पण तारा आल्या नसल्यानं, आणि पाटलाला वेळ नसल्यामुळे गावात अजून वीज पोचलेली नव्हती. म्हणून बिरोबाच्या मंदिरासाठी वाण्यानं दान दिलेला स्पिकरचा भोंगा तसाच निपचिप मान टाकून लटकलेला. पण बिरोबाचा पुजारी रोज पहाटे आरती झाली की चांगला अर्धातास ढोल बडवायचा आणि गावाला जाग यायची. शेताकडे जाणारा, नदीकडे जाणारा-जाणारी प्रत्येक व्यक्ती बिरोबाला नमस्कार करूनच पुढे जात असे. त्यांच्या जगण्यात असाधारण असे महत्त्व या मंदिराचे होते. प्रत्येकाने त्याची आपल्यावर कृपादृष्टी असलीच पाहिजे व ती कृपादृष्टी असण्यासाठी त्याला नमस्कार करणे, प्रसाद चढवणे व वेळोवेळी नवस आणि कौल लावणे गरजेचे होते, कारण गावाचा तो जसा राखणकर्ता होता तसाच तो भल्या-बुरयाचां निर्णय घेणारा जागृत देव देखील होता.
गावाच्या वेशीवर असलेल्या बिरोबाच्या मंदिरातून ढोलचे आवाज आवाज येऊ लागले, आणि नेहमीची मंडळी नियम असल्याप्रमाणे मंदिराकडे जाऊ लागली. एक एक करत मंदिराच्या अंगणात असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमा होऊ लागले. गप्पांचा फड रंगू लागला होता. बिरोबाच्या पुजारी हातात प्रसादाचे ताट घेऊन वडाकडे आला व प्रत्येकाच्या हातात खोबरं ठेऊ लागला. प्रसाद वाटता वाटता पुजारी म्हणाला “पाटील, यंदा देवाची जत्रा एकदम जोरात झाली पाहिजे बरं का!” पाटीलांनी प्रसाद आपल्या कपाळीं लावला व म्हणाले “हो, म्हणजे या, यंदा दणक्यात जत्रा होणार. यंदा देवाच्या क्रिपेने शेतात सोनं पिकले आहे प्रत्येकाच्या. कोणी हात आकडता घेणार नाही, मी शब्द देतो.. काय म्हणता मंडळी?” तेथे बसलेला प्रत्येकजण देवळाकडे तोंड करून दोन्ही हात जोडत म्हणाला “हो, नक्कीच.” पाटलानं आपला हात डोळ्यासमोर धरला व म्हणाला “अरे, तो रम्या हाय का? आवाज द्या रं त्याला.” केश्या जोरात ओरडला “ये, रम्या, इकडे ये. पाटील बोलावत हाईत.” रम्या जवळपास धावत आला व पाटालासमोर हात जोडून म्हणाला “राम राम, पाटील, बोला की” पाटलानं आपल्या खिश्यात हात घातला व पन्नास रुपयाची करकरीत नोट रम्याच्या हातावर ठेवली व म्हणाला “विहारीचा गाळ नीट काढलास नव्हं?” रम्याने ती नोट आपल्या दोन्ही हातात दाबून पाटलाला हात जोडत म्हणाला “होय हो, एकदम तळाचा दगड आणि दगड लक्ख दिसतो बघा.” पाटलाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व पाटील म्हणाला “गड्या, तुझे काम बेसं असतं म्हणून तर तुला सांगितले. पण या पैशाची दारू पिऊ नकोस. पैका जपून ठेव.” रम्या गडबडला, कसं बसं मानेनं हो म्हणत तो निघून गेला व पाटील हताश आवाजात म्हणाला “आपण लई वंगाळ काम केलं, त्याच पापाची फळ आहेत, तरणीताठी पोरं व्यसनाच्या नादी लागली, आपण लई मोठी चूक केली...” मोठी माणसं थरारली, व काहीच न बोलता, एक एक उठून जाऊ लागला व प्रत्येकाची मान खाली होती. पाटलाने बिरोबाला हात जोडले व म्हणाला “देवा, गावासाठी एवढं केलसं, या पापातून गावाला मुक्तीपण दे रे.” आणि पाटील मान खाली घालून चालू लागला.
बिरोबाच्या नावाने भलेमोठं पठार गावाच्या लोकांनी सोडलं होते, तेथे ना कोणी शेती करे, ना खूपच गरज असलेल्या शिवाय त्या देवाच्या जागेत प्रवेश करे. कधी कधी गावची पोरं मात्र, चिंचा, बोरं, कवटी यांच्या नादाने त्या पठारावर मनसोक्त दंगा घालत असत. मग कधी हणम्या त्यांना जोर जोरात शिव्या देत त्यांना पळवून लावत असे. हणम्या, हा गावातलाच, पण त्याची म्हातारी मेली व तो कायमचा बिरोबाचा सेवक झाला. त्याच्यावर देवानं जबाबदारी दिली होती पठार राखायची, पूर्ण गावासमोर देवाला कौल लावला होता, हणम्या देवळात सेवक म्हणून राहणार की पठार संभाळणार, दिला देवानं कौल, तेव्हा पासून तो पठार संभाळतो.
रम्याला आज पाटलानं पैसे दिले होते, त्यानं पाटलाच्या विहीरीचा गाळ काढून दिला होता, रम्या मजेत होता, खिश्यात पैसा खुळखुळत होता, रम्या मनातल्या मनात म्हणाला “आयला, आज जाता जाता हणम्याला पण तालुक्याला घेऊन जायचे, मस्तपैकी पहिल्या धारेची मनसोक्त प्यायची व उरला पैका तर उद्याच्याला म्हणून सोबत घेऊन यायची. हणम्या जेव्हा जेव्हा दारू मिळाली तेव्हा तेव्हा आपल्याला बोलावून दारू पाजली गड्याने. आज मोका हाय, त्याला पण पाजू.” रम्या झापाझाप रान तुडवत, पठारावर पोचला व टिपेच्या आवाजात ओरडल्या “ अरे, हणम्या, रांडेच्या कुठे आहेस रे!” पठारावर त्याचा आवाज दूरवर पोचला, पण हणम्याची परिचित अशी शिळ काय आली नाही. रम्याला आधीच तालुक्याला जाण्याची घाई झाली होती, तो हणम्याच्या नावाने शिव्या घालत, त्याला शोधू लागला. पठारावर भलं मोठं असलेलं चिंचे झाड, त्या दिशेने रम्या गेला, आणि त्याने पाहिले कि, त्या झाडाच्या बुध्यांलगत हणम्या तोंड वासून जमिनीवर उताणा पडला.. रम्या हणम्याला उन्हांतानात शोधात शोधात चिंचेच्या झाडाजवळ आला आणि..समोर हणम्या हा असा आडवा.. रम्या स्वत:शीच बोलल्यागत म्हणाला “च्यामायला, रांडेच्याला दारू कुठून मिळाली? आणि मिळाली तर मला का नाही पाजली? भोसडीच्याच्या गांडीला लै माज आला आहे आजकाल..” असे म्हणत रम्या त्याच्या जवळ जाऊन बसला आणि त्याला हलवत म्हणाला “ये हणम्या, रांडेच्या तुला कुणी दिली रं दारू?” पण हणम्याने काही उत्तर दिले नाही. रम्याने हणम्याला निरखून पाहिले.. आणि दचकून एकदम उभा राहिला. हणम्याचे डोळे उघडेच होते, वर चिंचेच्या झाडावर एक टक बघत असल्यागत! हिंमत करून रम्याने त्याच्या नाकाजवळ बोटं नेलं, काहीच हालचाल जाणवली नाही, तेव्हा त्याने जोरात बोंब मारली... “हणम्याssssssssss! अरा अरा देवा हे असं कसं झालं... त्यांनीच त्यांनीच मारला हणम्याला!!!” असे म्हणत तो गावकडे तोंड करून बोंबलत पळू लागला. धापा टाकत कसाबसा वेशीजवळ पोचल्या पोचल्या हणम्या जोरात ओरडला “चोराच्या भूतानी हणम्याचा पण जीव घेतला!” आणि रम्या धापकन जमिनीवर कोसळला.
गावातली चार-पाच तरणी पोरं धावत धावत पठारावरील चिंचेच्या झाडाखाली पोचली व, हणम्याला उचलून बिरोबाच्या मंदिरासमोरील पारावर त्याला झोपवला. वैदूबुवा धावत पोचले व त्यांनी हणम्याचा हात हातात घेतला व थोड्या वेळानं म्हणाले “हाय, थोडा जित्ता हाय यो. अरं कोणती पळत जावा आणि माझा घरातून माझं औषधाचे गाठोळ घेऊन या रं!” तडकाफडकी दोन पोरं वैदूबुवाच्या घराकडे पळाली. इकडे वैदूबुवा कधी हणम्याचे तळहात चोळत होते, तर कधी छाती. गेलेली पोरं लगेच पळत आली व त्यांनी गाठोळ वैदूबुवाच्या हाती दिले. वैदूबुवा लगेच २-३ पाला एकत्र करून त्याचा रस काढू लागले आणि रम्याने खूप वेळ मनात दाबून ठेवलेला प्रश्न वैदूबुवाला विचारला “वैदूबुवा, हणम्यानं दारू पिली हाय काय?” वैदूबुवाने रम्याकडे पाहिले व म्हणाला “नाय, पण पाटलाला बोलवा. लगेच या म्हणावं.” रम्या जागच्या जागी थिजला होता व तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो म्हणाला “म्हणजे, चोरांच्या भुतांनी.......” तोच वैदूबुवा परत ओरडले, “अरे जा, आधी पाटलाला बोलवा.” तसा रम्या पळाला, पाटलांच्या घराकडे. वैदूबुवाच्या चमत्कारानं हणम्याचा गेलेला श्वास जसा काय परत आला होता, पण हणम्याला दातखिळी बसली होती. वैदूबुवाने अनंत प्रयत्न करून कसाबसा त्याला शुद्धीत आणला आणि जवळपासं आखं गाव एकदम बोललं “हणम्या, मर्दा झालं काय होतं?”
रम्या पाटलाला घेऊन मंदिराच्या आवारात आला, आणि पाटील ओरडले “अरे, त्याला हवा लागू द्या, व्हा बाजूला.” तसा हणम्याच्या भोवती जमलेला जमाव झरकन बाजूला झाला. पाटील पारावर बसत म्हणाले “वैदूबुवा, आता काय परिस्थती? दारू पिली असेल फोद्रीच्याने. देवाचं काम करतो तरी. लाखवेळा बोललो, गड्या देवाचं काम करतोस तू, कश्याला देवाचा कोप होईल असलं वागतोस ऑ.” पण हणम्या पाठोपाठ वैदूबुवा पण मान हलवत म्हणाले “पाटील, यानं दारू नाही पिली. काय झालं आता तोच सांगेल.” हणम्या अजून भेदरला होता, पारावर आडवाच होता, आणि थोड्यावेळाने त्याच्या तोंडातून असप्ष्टसा असे म्हणाला “मी बदला घेणारं, तुमच्या गावचा मी बदला घेणारं” असं म्हणून हणम्या परत शुद्ध हरपून बेशुद्ध झाला. पण जवळ बसलेल्या पाटलाला मात्र पूर्ण समजलं, तो काय म्हणाला ते. मानेच्या मागून थंड घामाचा ओघळ पाटलाच्या पाठीपर्यंत पोचलेला पाटलाला जाणवला व हातापायाला त्याच्या कंप सुटला. कसाबसा धीर गोळा करत पाटील दबक्या आवाजात म्हणाला “आज, सांजच्याला आपण येथे एक बैठक करू. घरटी किमान एकतरी माणूस इथं पाहिजेच पाहिजे. बायका, पोरं घेऊन येऊ नका.” असे म्हणत, पाटील कपाळावर आलेला घामाचा ओघळ झटकत, पटकन उठला, व ताडताड मंदिराकडे गेला, आणि बिरोबासमोर साष्टांग नमस्कार घातला.
दुपार टळायच्या वक्ताला, हणम्या शुद्धीत आला होता. हणम्याने डोळं किलकिलं करून पाहिलं तर आजूबाजूला पुजारी, वैदूबुवा, रम्या, पाटील बसलेले त्याला दिसले तसं त्यानं रम्याचा हात हातात घेतं म्हणाला “रम्या, मर्दा, आपलं काय खरं नाय. ते आपल्याला बी मारणार, अगदी तसंच.” असं बोलून त्यानं हंबरडा फोडला. हणम्याला छातीशी धरून रम्यापण मुसमुसू लागला, तोच पुजारीने बिरोबाचा अंगारा हणम्याच्या कपाळावर चोळला व म्हणाला “शांत हो, शांत हो. आता निवांतपणे सांग काय झाले, काय पाहिलेस तू? हणम्या. तुला कळतय ना मी काय विचारतो आहे ते?” असं म्हणत पुजारी कुठलेसे मंत्र पुटपुटु लागले. हणम्याने पाटलाचे पाय धरले व म्हणाला “पाटील, वाचवा. ते जीव घेणारं माझा.” पाटलाच्या पोटात विहिरीएवढा मोठा खड्डा पडला व पाटील कसाबसा बोलला... “अरं, मर्दासारखा मर्द तू. आणि असा बाईसारखा रडतो आहेस? धीर धर काढू काय तरी मार्ग. मी सांजच्याला गावाला बोलावलं हाय इथं. मार्ग काढू आपण. पण आधी तू सांग काय झालं चिंचेच्या झाडाखाली?” चिंचेच्या झाडाचे नाव कानावर पडतातच हणम्याने डोळं गरारा फिरवले आणि तो परत बेशुद्ध पडला.
*
बिरोबा मंदिरासमोरील पारावर पाटील, पुजारी, वैदूबुवा बसलेले होते, शेजारी हणम्या अजून अर्धवट शुद्धीत आडवा होता, रम्या त्याच्या शेजारी बसला होता व सर्वांच्यासमोर गावातील झाडून सारी पुरुष मंडळी बसली होती, शून्यात नजर लावून. पाटलाने घसा खाकरला व अपरिचित अश्या घोघऱ्या आवाजात म्हणाला “मंडळी, गेल्या काही महिन्यात जे काही घडले, याचा आपल्याला खूप त्रास झाला. गावातील तरणीताठी अशी पाच पोरं गेली, तीन गर्भार बायका गेल्या, आज हणम्याचा जीव जाता जाता राहिला. हणम्या तर देवाचा सेवक. पण त्याला देखील ते सोडत नाही आहेत. यावर काय तरी उपाय गेला पाहिजे. नाही तर गावाचं अस्तित्वच धोक्यात येईल.” तोच गर्दीतून एक म्हातारा पण खणखणीत आवाज आला “पण विडीचे चटके देऊ म्हणत पुढे येणारा हाच, हाच तो हणम्या होता. केलेल्या पापाची फळं आपल्या सगळ्यांना येथेच भोगायची आहेत पाटील..” असे म्हणत तो म्हातारा खदाखदा हसू लागला.. आपले हसू आवारत, तो म्हणाला “मी म्हणालो होतो तेव्हा पण, काय बी करा, पण अशी अभद्र शिक्षा नगा करू त्या पोरांना. माझा काशी तर त्या दिवशी गावात पण नव्हता, पण हकनाक गावाच्या पापाचं फळ म्हणून पहिला बळी त्याचाच गेला. झाडावरून पडायचे काय त्याचे वय होते? मरायचे काय त्याचे वय होते?” असं म्हणून हसता हसता तो म्हातारा घाय मोकळून रडू लागला. तोच अजून एक पोरसवदा आवाज आला “अरे खोता, पेटवा पेटवा म्हणून तूच आधी बोंबलला होतास. इसरलासा?” हळू हळू आवाज वाढू लागले, प्रत्येकजण दुसरा कसा दोषी हेच सांगत होता. ढिल्या अंगाने बसलेला पाटील, हे सगळं पाहून पारंच ढेपाळला. पुजारीकडे हताश नजरेने पहात त्याने, आता तुम्हीच बघा असा इशारा केला... पुजारी उठला व जोरात ओरडला “गप्पा, बिरोबाची शपत हाय, पाटीलाचे बोलणं होऊ पर्यंत मध्ये जो तोंड उघडेल तो मुक्का होईल. कायमचा!” गप्प करून समोरचा जमाव शांत झाला व पाटील पुन्हा बोलू लागला “बघा, जे झालं ते झालं, आज एकमेकाला टोचून काय मिळणार. पण समोर उभं असलेलं संकट दूर कसं करायचं याचा इचार नको का करायला?” समोरचा जमाव चुळबुळ करू लागला, ते ध्यानात आल्यावर पाटलानं पुजारयाकडे एक नजर टाकली व पुजारी पटकन उठाला व म्हणाला “बिरोबाची शपथ मागे घेतो, पण वंगाळ काय बोलायचे नाही, मुद्दाचे बोला फक्तं!” असे म्हणून पुजाऱ्याने बिरोबाकडे तोंड करून हात जोडले. गावातला सगळ्यात म्हातारा असा सुतारआज्जा उभा राहिला व सगळ्यांकडे नजर फिरवत शांतपणे म्हणाला “बघा पाटील, मी सांगतो तुम्ही जावा तालुक्याला. शोधा कोणीतरी मांत्रिक-तांत्रिक. इशय आता तुमच्या बी हातात नाय ना या बिरोबाच्या. त्यांनी मरताना बिरोबाचीच शपथ घेतली होती, आठवतंय ना?” असं म्हणत तो म्हातारा थरथरत बसला, पण गावाच्या प्रत्येक माणसांच्या कानावर ते शब्द पडू लागले “मी चोर नाय, पण या बिरोबाची शपथ, मी गावाचं वाटोळं करेन, इथं मशान असेलं मशान, घरटी एक माणूस मारेन मी!” एक एक करत सगळे गप्पं गुमान उठू लागले, पाटील थिजल्यागत तेथेच बसून होता, पुजारी अगतिकतेने कुठलेसे मंत्र पुटपुटू लागला व वैदूबुवा आता काय हे प्रश्न चिन्ह चेहरयावर घेऊन पाटलाकडे आशेने पाहू लागले, पाटील थोड्या वेळात बोलला “मी जातो उद्या, तालुक्याला.” हताशपणे प्रत्येकजण उठला पण जाताना, चिमूटभर बिरोबाचा अंगारा न विसरता प्रत्येकजण सोबत घेऊन जात होता. थोड्यावेळात तेथे भयाण शांतता पसरली व निवांत बेशुद्ध असलेल्या हणम्याचा राखणदार मित्र रम्या, बिरोबाचा अंगारा हातात घेऊन दूरवर दिसत असलेल्या पठारावरील चिंचेच्या झाडाचे टोक पाहत तसाच बसून होता.
पुजारी पाहटच्या पहिल्या वक्ताला, मंदिराकडे निघाला होता, मंदिराकडे पोचल्या पोचल्या त्याने पारावर नजर मारली तर, रम्या हणम्या शेजारी बसून होता, पुजारीने मंदिरातून आवाज दिला “रम्या, जा पोर, घरी जाऊन आवरून ये. मी पोचलो हाय मंदिरात.” थोडा वेळ उत्तराची वाट पहात पुजारी जागेवर थबकला पण रम्याकडून काहीच उत्तर आले नाही. पुजाऱ्याने मंदिराचे आंगण झाडले व सहज नजर पारावर टाकली तर रम्या अजून तसाच बसला होता. पुजारीने हातातील खराटा टाकला व हळू हळू पाराकडे जाऊ लागला व जाता जाता तो रम्याला आवाज देत होता “अरे, रम्या, रम्या?... रम्या बसल्या बसल्या झोपलास काय रे? हणम्या? कशी आहे रं तुझी तब्येत?” पण उत्तर कोणीच देत नव्हते. पुजारी पाराजवळ पोचला व त्याने रम्याला हाथ लावला तसा रम्या, धाडकन आडवा पडला. पुजार्याला काही सुचायच्या आत त्याची नजर हणम्याकडे गेली, तर हणम्याचे डोळे पांढरे झालेले. त्याच वेळी त्याने रम्याकडे पाहिले तर रम्याचे डोळे सताड उघडे होते, व चेहऱ्यावर भयंकर काहीतरी दिसल्याचे भाव... पुजारी धावत पळत ढोलजवळ पोचला व वाटेल तसा जमेल तसा दोन्ही हाताने ढोल वाजवू लागला. नादमय ढोलच्या स्वराची सवय असलेले गाव अश्या विचित्र ढोलच्या नादाने धडपडत जागे झाले व जो तो बिरोबाच्या मंदिराकडे धावू लागला, तालुक्याला जायचे म्हणून लवकर उठलेला पाटील सुद्धा!
*
हणम्या आणि रम्याची चिता धडाडत पेटली होती, अगतिकतेने सारं गाव त्या चितेकडे डोळे सताड उघडे टाकून पाहत होते. बळीवर बळी ते घेत होते, पण आधी गावाच्या वेशीभायेर असलेलं भय आता गावाच्या जागृत बिरोबाच्या मंदिरापर्यंत पोचलं होते, म्हणजे आता त्यांचा वावर गावभर होता? असला प्रश्न चेहरयावर घेऊन प्रत्येकाचे डोळे त्या दोन चिता पहात होत्या. पाटलाच्या मनात वादळ उठलं होते, तो समोर जळत असलेली चिता पाहून सैरभैर झाला होता व पुजारयाचा हात हातात धरून तो जोरात ओरडला “असा देवानं कौल का दिला?????” धडधड जळत असलेली चिता बघायचे सोडून पूर्ण गाव आता पाटील व पुजारीकडे पाहू लागले व प्रत्येकाच्या नजरा हाच प्रश्न पुजाऱ्याला विचारात होत्या. पुजाऱ्याने लोकांच्या नजरा ताडल्या व पटकन तो पाटलाला म्हणाला “वेळ नका दडवू, तुम्ही निघा. पोचा तालुक्याला, आणि बोलावून घेऊन या धर्माबाबाला, आता तोच यातून मार्ग काढेल. जावा तुम्ही. निघाच.” जमावातून पण काही अस्पष्ट पण अगतिक असे आवाज आले की “पाटील, जावा लवकर. नाहीतर उद्या कोणाची चिता येथे.....” पाटील खांदे पाडून मागे वळला व पाय ओढत ओढत तो तालुक्याच्या दिशेला निघाला.
चार तास चालून पाटील तालुक्याला पोचला होता, धर्माबाबाची झोपडी शोधायला त्याला जास्त त्रास नाही झाला पण धर्माबाबा झोपडीत नव्हता. काय करायचे हा विचार करत पाटलानं गंजीफ्रोकात हात घालून विडीचे बंडल काढलं आणि एक विडी पेटवली. तासाभरानं धर्माबाबा त्याला येताना दिसला व रिकामं झालेले बिडीचे बंडल त्याने दूरवर फेकत दोन्ही हात जोडून उभा राहिला व धर्माबाबा समोर येतं त्याच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला “पापी!” तसा पाटील चमकला व त्याने धर्माबाबासमोर लोटांगण घातले व म्हणाला “बाबा, वाचावा!” धर्माबाबाने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि आधी आपल्या धुनीत तूप ओतलं! जसं तूप आगीवर पडलं तसं जोरात भडका उडाला व त्या तांबडया भडक उजेडात धर्माबाबाचा चेहरा अजूनच भयंकारी दिसू लागला. पाटील कसाबसा स्वत:ला सावरत धर्माबाबाच्या झोपडीत शिरला व धर्माबाबासमोर हात झोडून, मान खाली घालून बसला. तोच धर्माबाबा कडाडला “तुम्ही, निष्पाप लोकांचा जीव घेतला, अघोरी, अघोरी पद्धतीने. बोल खरं आहे की नाही?” पाटलानं फक्त मान डोलावली ती होकारार्थी कि नकारार्थी हे पण त्याच्या ध्यानात आले नाही, पण पाटलाच्या घश्यातून विरळ असा आवाज आला व तो म्हणाला “बाबा, वाचावा. चूक झाली.” धर्माबाबाने नकारार्थी जोरजोरात मान हलवली व तो म्हणाला “तुझ्या मागोमाग ते पण येथे पोचले आहेत, ते बघ तुझ्या मागेच ते उभे आहेत... मला दिसत आहेत. त्यांना न्याय पाहिजे व तुला बचाव. सांग कोणाच्या मागे मी जाऊ सांग...” असे म्हणत धर्माबाबाने आगीत काहीतरी टाकले व पुन्हा समोरील धुनीतून जोरदार ज्वाळा उफाळून वर आल्या. पाटील दिसत नसलेल्या त्यांना व बाबाला उद्देशून एकत्रच म्हणाला “आम्ही चुकलो, आमची चूक झाली, गैरसमज होता हो.. आम्हाला माफ करा पण या चक्रातून आम्हाला काढा. मी, माझं गाव गुन्हेगार आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा? सात तरणी पोरं, आणि दोन गर्भार स्त्रियांचा जीव गेला आहे, अजून किती बळी??? “ आणि पाटील घाय मोकलून रडू लागला, तोच धर्माबाबा त्याला दरडावत म्हणाला “ ते म्हणत आहेत, त्यावेळी तुझी का वाचा बसली होती, पाटील? तू का आम्हाला वाचवले नाहीस? आता आम्ही आमची शपथ पूर्ण करणारच. उद्याच तुझ्या पोरांची बारी हाय, लई जीव हाय नव्हं तुझा पोरावर?” आपल्या पोराचं नाव आल्या आल्या पाटील जमिनीवर कोसळला व ओरडला “धर्माबाबा, वाचावा माझ्या पोराला...” धर्माबाबाने समोरच्या धुनीत पुन्हा काही तरी टाकले व उफाळलेली ज्वाळा शांत शांत होत, धुनीवर पसरली व धर्माबाबाचा हलकासा आवाज आला, “पाटील, हे सगळं हाताबाहेर गेलं आहे. मी येतो तुमच्यासोबत गावात. पण माझी व्यवस्था मी सांगतो तशीच झाली पाहिजे, मी यातून तोडगा काढेनच असे नाही, या प्रयत्नात माझापण जीव जाईल कदाचित. पण मी जो मार्ग सांगेन तो तुम्ही कराच. महत्त्वाची गोष्ट, सर्वात प्रथम गावच्या वेशीच्या अलीकडेच मला पूर्ण सत्य माहिती हवे आहे, नेमकं काय घडलं, गावासोबत आणि त्यांच्या सोबत!” धर्माबाबाने धुनीवर हात फिरवत इकडे तिकडे बघत एक वाक्य उच्चारले “हे, बघा मी चाललो आहे त्या गावात. मला नेमकं कळू द्या. काय झालं. तो वर तुम्ही शांत रहा .तुम्हाला काय बळी हवा तो तुम्ही घेतला आहेच.. अगदी ताजा ताजा तुम्ही घेतला आहे, दोन दोन बळी. आता काही दिवस शांत बसा. मला माझे काम करू द्या, किमान काही नाहीतर मी तुम्हाला तरी मुक्त करेन, याचे वचन देतो.” त्या छोट्याश्या झोपडीत हलकंसे जोरात वारं वाहिले व एक अस्पष्ट असा आवाज धर्माबाबाच्या कानावर आला “आम्हाला, मुक्ती नको आहे, आम्हाला बळी हवा आहे.... ज्यांनी आम्हाला येथे पोचवले त्यांना सोबत घेऊन जाणार आहोत आम्ही.. पण तुम्ही प्रयत्न करणार तर करा आम्ही मध्ये नाही येणार, पण आमचे लक्ष वेशीवर आहे” धर्माबाबा पण क्षणभर थरारला पण, अगतिक पडलेल्या पाटीलाच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला “पाटील, अजून खूप भोगायचे आहे. थारयावर या. मन निष्टुर करा. आता आपण निघू. जाताना मला सर्व काही सांगा अगदी एक एक गोष्ट! नेमकं काय घडले?”
धर्माबाबानं गरजेचे सामान बांधले व तो पाटलाच्या मागे मागे चालू लागला व पाटील त्याला काय घडलं हे सांगू लागला. “धर्माबाबा, मागच्या दिवाळीची गोष्ट आहे, थंडी हळूहळू पसरत होती, पिकपाण्यानं सगळं गाव आनंदात होते, पण जे आज पर्यंत गावात कधी घडलं नव्हतं असे काहीसं घडलं. आधी आम्ही किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष केलं पण, सुताराच्या घरी एका रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी सुताराची सगळी हत्यारं पळवली, नंतर चोरी देसाईवाण्याच्या घरात झाली, नंतर परत चोरी चंद्रा सोनारयाच्या घरात झाली, झाडून घरात होतं नव्हतं ते, चोरून नेलं. गावाचचं गहाण असलेलं सोनं पण चोरीला गेलं तरी गाव शांत होतं, पण एक दिवशी चोरांनी बिरोबाच्या मंदिरावर डल्ला मारला. त्या दिवशी पोर्णिमा होती, गाव शांत झोपलं असताना अचानक खन्न करून घंटीचा आवाज झाला तो आज बिरोबाच्या मंदिरातील घंटीचा होता, एक एक करत आसपासची लोकं जागी झाली, आणि वेशीबाहेर पाठीवर ओझं घेऊन पळत असलेली काही आकृत्या दिसल्यावर गावभर कल्ला झाला, अनेक मशाली पेटल्या... आणि एक मोठा आवाज सगळा परिसरभर पसरला “अरं चोरांनी बिरोबांला पण लुटला!” छोट्या-मोठ्या चोऱ्यांनी त्रस्त असलेल्या गावाच्या मनावर यापेक्षा मोठा घाव दुसरा कुठला असणार? जो बिरोबा गावाचे रक्षण करतो त्याच बिरोबाला लुटला होता त्या चोरांनी.” पाटील क्षणभर थबकला व समोर दूरवर बोट दाखवत म्हणाला “ते बघा धर्माबाबा, बिरोबाचे पठार आणि ते ते.. चिंचेचे झाड... “ धर्माबाबाने तिकडे पाहिले व तो थबकलाच व म्हणाला “पाटील गाव राहू दे, आधी आपण त्या चिंचेच्या झाडाकडे जाऊ या.” पाटलाच्या अंगाचा थरकाप उडाला व तो घाबरत म्हणाला “तिकडे? नको, धर्माबाबा, आधी आपण गावात जाऊ या.... तिकडे ते असतील.”
धर्माबाबा गावाच्या वेशीवर पोचला व एकदम बसकण मारून तो म्हणाला “आधी गावं बांधावं लागेल मला, आधी वेश बांधावी लागेल मला. पाटील, तुम्ही येथेच थांबा व गावातला कोणीतरी बोलवा व येताना त्याला सांगा बिरोबाचा अंगारा अगदी मिळेल तेवढा घेऊन ये!” पाटलाने जीवाच्या आकांताने आवाज दिला “रम्या...........” तोच जीभ चावत पाटीलाने परत आवाज दिला “चिंट्या, लवकर इकडे ये, येतानं बिरोबाचा अंगारा भेटेल तेवढा गोळा करून ये, चिंट्याsssssssssss! मंदिराच्या शेजारी असलेल्या झोपडीतून चिंट्या कसाबसा धावत निघाला व मंदिरातून अंगारा गोळा करून तो पाटलाकडे धावत पोचला व समोर अगतिक पाटील व जमिनीवर बसलेला धर्माबाबा पाहून त्याचा उरला-सुरला धीर देखील सुटला व तो पाटलाच्या मागे थरथरत उभा राहिला व पाटलाने कशीबशी त्याच्या हातातून बिरोबाच्या धुनीतील राख काढून धर्माबाबाच्या समोर ठेवली. ती राख आपल्या हातात धरून धर्माबाबा बोलला, “पाटील, पुढे काय झालं?” असं म्हणत त्यांने हातावरील अंगारावर फुंकर मारली व परत बोलला, पाटील जास्त वेळ नाही, आपल्याकडे आता, ते आत गावात आहे..” पाटलानं आवंढळ गिळला व पूर्ण जोर लावत तो पुन्हा बोलू लागला.
“त्यांनी आमचे दैवत बिरोबाचे मंदिर लुटले होते, अंधारात कोण कोठे पळालं याचा सुगाव लागला नाही, पण तिकडे दूरवर बिरोबाच्या पठारावर कोणीतरी आहे असा भास झाला व सगळे गाव धावत तिकडे पळाले. पठारावर चिंचेच्या झाडाजवळ ती तीन लोक वस्तीला आलेली दिसली. त्यांच्याकडे चूल होती, दोनचार भांडी होती, त्यांना आम्ही इचारले ‘कोण तुम्ही’, तर म्हणाले आम्ही प्रवासी आहोत, तालुक्याला निघालो होतो, रात्र झाली म्हणून इथं डेरा टाकला, सकाळी निघू... असे ते म्हणाले, पण हणम्याला जोर चढला होता, तो बोंबलला, आधी त्यांचा तपास करा, साले कुतरडे, रांडेचे चोरासारखे दिसतात, आधीच गाव पिसाळलेले होते, आणि तपासात त्यांच्याकडे मुठभर सोनं सापडलं. ते सांगत होते, तालुक्याला चाललो आहोत. देवाची मूर्ती करायला.. त्यांच्या गावाच्या देवाची मूर्ती. पण तोच काशीची बायको ओरडली, अगं बाई... हे तर अगदी आमच्या सासूबाईच्या गंठणासारखं दिसतं आहे, आणि क्षणात उद्रेक झाला!” पाटील क्षणभर थबकला व पुन्हा मागे वळून चिंचेच्या झाडाकडे पहात म्हणाला “हे सर्व तेथे, त्या झाडाखाली घडलं होतं. गावातील प्रत्येक आणि प्रत्येकजण चिढलेला होता. त्यांनी त्या पोरांना चिंचेच्या झाडाभोवती बांधले, त्यात हणम्या, रम्यासारखी बाकीची अनेकजण होती, ज्यांनी आधी शिव्याचा भडीमार केला, पण ती पोरं तेच सांगत होती, जे त्यांनी आधी सांगितले, पण गावावर जसं गारुड झालं होते, सगळेच पिसाळले होते, तोच हणम्या पेटती बिडी घेऊन त्यांच्या जवळ गेला व म्हणाला, अरे, रांडेच्यानो, बिरोबाला लुटता.. असे म्हणत त्याने पहिला चटका एकाला दिला तो कळवळला व जोरात ओरडला, सोडा आम्हाला, आम्ही नाही केली चोरी कुठे, आमच्या गावात माणूस पाठवा. आमच्या गावात विचारा सोनं कोणाचं आहे आमच्याकडे. पण त्यांच्याकडे बोलण्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते, हणम्याच्या पेटलेल्या बिडीला वातीसारखा वापर होऊन अनेक बिड्या पेटल्या होत्या, त्या पोरांच्या अंगावर नको तेथे, बिड्याचे डाग दिले जात होते, बिडीच्या चटक्याचे एक वैशिष्ठ असते, त्वचेवर बिडी वीजवली तर ती अंगार आताच सोडते, आणि तीळतीळ मरणासारखा एक एक तुकडा ज्याच्या शरीरात ती बिडी घुसली आहे, त्याला क्षणाक्षणाला शेकडो मृत्यू सारखा असह्य त्रास देत असते. हे घडत असतानाचं सुतारानं जळतं लाकूड आणलं आणि त्या मुलांच्या मांडीवर चटके द्यायला सुरवात केली, ती पोरं किंचाळत होती, ओरडत होती, पण तो उन्माद गावाचा टोकाला पोचला होता, खोताच्या म्हातारयाने त्या पोरांच्या अंगावरील कपडे फाडले व थरथरत्या आवाजात तो म्हणाला, प्रत्येक घरातून एक जळतं लाकूड आलंच पाहिजे..., एक एक करत अनेक घरातून जळतं असलेल्या लाकडांचे ढीग जमा होतं गेले, ती पोरं जीवाच्या आकांताने ओरडत होती, बिरोबाची शपथ, आम्ही नाही केली चोरी..... पण कोणापर्यत तो आवाज पोचलाच नाही...” धर्माबाबाने रागाने पाहिले, आणि पाटील घाबरत म्हणाला “शेवटचं काम माझा मुलानं केलं त्याने घरातील, ताज्या तुपाची बरणी त्यांच्यावर फोडली!” धर्माबाबानं डोळे मिटले व एवढेच म्हणाला “पुढे” पाटलाने कसाबसा श्वास घेतला व म्हणाला “त्यातील एक जळताना, रागाने म्हणाला ‘मी चोर नाय, पण बिरोबाची शपथ, मी गावाचं वाटोळं करेन, इथं मशान असेलं मशान, घरटी एक माणूस मारेन मी!’ धर्माबाबा हेच घडलं” असं म्हणून पाटील जमिनीत नजर गाडून दगडासारखा निशब्द झाला.
धर्माबाबानं बिरोबाचा मुठभर अंगारा एक मोठ्या घाघरभर पाण्यात टाकला व आपल्याकडील कसलीशी राख पण त्याने त्या घाघरीत टाकली व चिंट्याच्या हातात देत म्हणाला, “जा! गावाच्या चारीबाजुला हे पाणी शिंपडून ये, जा लवकर.” चिंट्या घागर घेऊन पटापट पाणी शिंपडत गेला. धर्माबाबा पाटीलाला म्हणाला “पाटील, धीर धरा. आज रातच्याला पूजा करेन मी, महारुद्राची..” धर्माबाबानं आपलं साहित्य बिरोबाच्या पठारावर त्याच चिंचेच्या झाडाखाली मांडले, तात्पुरता निर्माण केलेला अग्नीकुंड धगधगत होता, धर्माबाबा जोर जोरात महारुद्राला आव्हान करत होता, तोच विकटहास्य धर्माबाबाच्या कानावर आपले तसे धर्माबाबानं आपलं डोळे उघडले.. समोर ती तीन पोरांची भूतं बसली होती व ती धर्माबाबाकडे बघून हसत होती. त्यातील एक म्हणाला “धर्माबाबा, तू काय बी कर, घेतलेली माझी शपथ मी पूर्ण करणारच. गावातील घरटी एक माणूस मरणारच.” असं म्हणून तो धर्माबाबाकडे रागानं बघू लागला, तोच दुसरा म्हणाला “धर्माबाबा, जिवंत असताना बिडीचे चटके, ते पण थोबाडापासून पायाच्या बोटापर्यंत सगळीकडे कधी खल्ले हायत का? जिवंत जळताना होणारी तडफड कधी अनुभवली हाय तुम्ही? आमचा बदला आम्हाला घेऊ द्या, आम्ही तुम्हाला काय बी करणार नाही..” धर्माबाबा शहारला होता, पण कसंबसं धीर गोळा करून धर्माबाबा बोलला “पोरांनो, तुमच्यासोबत लई वंगाळ घडलं, तुमचा हक्कपण हाय बदला घेण्याचा. पण ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला जिवंत जाळले, त्यांना तुम्ही धडा शिकवला आहेच कि, बाकीच्यांना जीवदान द्या एवढंच माझं मागणे. तुम्हाला कैद करून बाटलीत ठेवण्यापेक्षा तुम्हाला मुक्ती मिळावी म्हणून मी पूजा करेन, बिरोबाची शपथ!” तिसरा जोरात ओरडला “नाय, कधीच नाय!” धर्माबाबा हताश पहात बसला, समोरून ते कधी व कुठे गेले याचा पत्ताच धर्माबाबाला लागला नाही. संध्याकाळ सरून केव्हाच रात्र झाली होती. त्या निरव पठारावर, शांत असलेल्या चिंचेच्या झाडाखाली विजत आलेल्या अग्नीकुंडासमोर धर्माबाबा समाधी लावून बसला होता व ती तीन भूतं, चिंचेच्या झाडाच्या एक भल्या मोठ्या फांदीवर बसून टक लावून धर्माबाबा काय करतो हे पाहत होते. एकाचे डोळे चकाकले, तो सरळ धर्माबाबासमोर गेला....
सकाळच्या पारी पाटील, लगबगीने धर्माबाबाकडे आला व धर्माबाबासमोर हात जोडून बसला. धर्माबाबानं डोळे उघडले व पाटीलांकडे डोळे रोखत धर्माबाबा एका बाटलीकडे बोट दाखवत म्हणाला “त्यांना बाधून टाकलं हाय, आणि त्यांनी गावाला अभयदान द्यायचं मान्य केलं हाय. त्यांच्यासाठी गावात बिरोबा मंदिरात एक पूजा घालायची येत्या अमावश्येला. म्हणजे परवा रातच्याला. गावातील झाडून सगळी माणसं हजर हवीत. आजच गावात बातमी द्या, सगळ्यांना. पूजा झाल्यावर यांना मुक्ती मिळेल, सगळ्यांनी प्रार्थना करायची हाय.” पाटील भलताच आनंदाला, त्यानं जमिनीवर लोटांगण घातलं व धर्माबाबाचे पाय धरून म्हणाला “तुम्ही मला, माझ्या गावाला वाचवलं, आम्ही जन्मभर तुमचं हे उपकार नाई विसरणार.” असं म्हणून पाटील धावतच गावाकडे निघाला, त्याच्या पाटमोऱ्या आकृत्तीकडे पहात धर्माबाबा तेथेच बसून राहिला, व चिंचेच्या झाडाच्या त्या भल्यामोठ्या फांदीवर आपली नजर टेकवून, एवढंच म्हणाला “बिरोबा, जशी तुझी इच्छा!”
बिरोबाच्या मंदिराजवळ संध्याकाळ होताच गाव जमू लागले, आज आमावस, धर्माबाबा पूजेच्या लगबगीत होता व गावाचा पुजारी त्याला मदत करत होता. पूर्ती रात्र पडताच, धर्माबाबानं पूजेला सुरवात केली. पारावर पाटील आणि त्याच्या शेजारी त्याचं भेदरलेलं पोरगं बसलं होते, २४-२५ वर्षाचा गडी, भिजल्या मांजरासारखा अंग चोरून बसला होता, हळूच जमेल तस्म इकडे तिकडे पाहत होता, जरा जरी पानांची सळसळ कानावर आली कि दचकून उठायचा आणि परत बापाचा हात घट धरून बसायचा. इकडे धर्माबाबाची पूजा शिगेला पोचली तशी धर्माबाबानं, पाटलाला आणि त्याच्या पोराला पूजेजवळ बोलावलं. ते जवळ येऊन बसताच धर्माबाबा जोरात गावाला उद्देशून म्हणाला “हे बघा, गावच्या हातून लै मोठं पाप घडलं, आणि अनर्थ झाला, निषाप पोरांचा हकनाक जीव तुम्ही घेतला, त्यांनी त्याचा बदला पण घेतला, आज त्यांनी तुम्हाला क्षमा केली, आता तुम्ही सर्वांनी मोकळ्या मनानं त्यांच्याकडे क्षमा मागा व क्षमा दिल्याबद्दल त्यांचे आणि बिरोबाचे आभार माना.” असं म्हणताच सारं गाव उभं राहिलं आणि त्यांनी डोळे मिटले व हात जोडले! कोणाच्यातरी किंचाळन्यानं सर्वांचे डोळे खाडकन उघडले तर.. पाटील, पूजेच्या अग्नीकुंडावर उलटा लटकत होता, आणि जीवाच्या आकांतानं ओरडत होता “सोडा मला, सोडा मला, मी चुकलो..” धर्माबाबा कडाडला “पाटला, आता तरी काय ते खरं बोल, नाही तर ही पोरं सोडतील तुला आगीत. ती सुटतील, पण तू मुंजा होऊन कायमचा त्या चिंचेच्या झाडाला लटकशील..” पाटील जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करत होता पण, आता ते त्याला शक्य नव्हते. शेवटी रडत रडत पाटील म्हणाला “धर्माबाबा वाचवा मला, मी सांगतो सगळं खरं. गावात चोऱ्या आणि बिरोबाचं मंदिर आम्हीच लुटलं होतं, मी रम्या आणि हणम्याची मदत घेऊन. सगळं सोनं माझ्या शेतातील विहिरीत दडवून ठेवलं आहे.” सगळं गाव आधी हवेत उलटा लटकलेला पाटील बघून दंग होते, पण त्याचा कबुलीजबाब आला तसा, गावाचा राग उफाळून आला व एक सुरात अनेक आवाज आले “पाटलानं बिरोबाला लुटला??? मारा त्याला.. जाळा त्याला!!!!” आणि जमाव पाटलाकडे धावून येऊ लागला तोच... धर्माबाबाने आवाज दिला “थांबा, त्यांचा सूड त्यांना घेऊ द्या. मी त्यांना तसे वचन दिले हाय, आणि त्या बदलात मी गावासाठी अभयदान घेतलं हाय.” धर्माबाबानं लटकलेल्या पाटलाकडे पाहिले व म्हणाला “पाटील, आता जाब बिरोबाला द्या.” लटकलेला पाटील धाडकन अग्नीकुंडात पडला..

No comments:

Post a Comment