माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं. त्यावेळेस शेजारच्या चरणकर आजींनी सांगितलेलं एकच वाक्य राहूनराहून आठवायचं...”देव सगळीकडे असतो”
’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं...जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात.
कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता. तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र, देखण्या, रेखीव मूर्ती काय, तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात...कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी!
आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर...(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे? लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर...पेशवेकालीन शैलीचा प्रभाव...समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर.
जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर...त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके...सर्व काही सफेद, निष्कलंक...देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील तसंच थंड, शांत वाटतं.
दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे, त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर...एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते...कालाच्या पटासारखीच निरंतर...गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन...विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो...हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द...निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.
भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे...जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण.
उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर...शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही.
आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां?
बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत...मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.
मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.
सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.
*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर क्षमस्व.
*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर क्षमस्व.
No comments:
Post a Comment