तो आपल्या ध्यानामध्ये मग्न होता, तटाच्या त्याबाजूला असलेला तो साधू आता याच्यासमोर उभा राहून याला निरखत होता. त्याने हळूच आपले डोळे उघडले व समोर उभ्या असलेल्या साधूकडे स्मितनेत्रांनी पाहिले व म्हणाला “या मुनिवर्य. आपले स्वागत आहे.”
साधूने त्याच्याकडे पाहिले व आपल्या पांढऱ्या शुभ्र दाढीवरून हात फिरवत तो म्हणाला “मला आपल्या सोबत चर्चा करावयाची आहे. ईश्वर, धर्म आणि मुक्ती विषयी.” असे म्हणून ते समोर असलेल्या खडकावर बसले. त्यांने साधूकडे पाहिले व हात जोडत म्हणाला “अवश्य, फक्त काही क्षण द्या, आपण चर्चा सुरु करू.” त्याने आपले पद्मासन सोडले व उभा राहत, साधू ज्या खडाकावर बसला होता त्याच्या समोर जाऊन बसले व म्हणाला “सुरु करू”
साधूने पहिला प्रश्न विचाराला. “तुमचा धर्म कोणता व तुम्ही कोणाची आराधना करत आहात येथे?”
त्याने साधूकडे पाहिले व मंद स्मित करत उत्तर देण्यास सुरुवात केली “माझा धर्म मी अजून शोधतो आहे. धर्म हे असे तत्त्वज्ञान असावे की आत्मास निरंतर सुखाचा मार्ग दाखवेल व या लोकात समता, शांती व समृद्धी व परलोकात सर्वोच्च आनंद कसा मिळवावा याचे मार्गदर्शन अनुयायींना देत राहील. मी माझ्या तील माझ्या आत्माची आराधना करतो आहे. कारण हा आत्माच सर्वकाही आहे, माझ्या पाप-पुण्याचे जे संचीत जमा होणार आहे त्याला कारणीभूत हा माझा आत्माच आहे, म्हणून मी त्याला सर्वोच्च मानतो. म्हणून सर्वात आधी त्याचे ज्ञान, आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा यत्न करतो आहे. आत्मा हा अनंत ज्ञानाचा, सुखाचा व विराट शक्तीसामर्थ्यचा शक्तीस्त्रोत आहे. सुखदु:खचा निर्मिता तोच, उपभोग घेणाराही तोच व यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारा देखील तोच. आत्मज्ञान म्हणजे मोक्षद्वार आहे. म्हणून मी त्याची आराधना करतो आहे.”
साधू त्याच्या या उत्तराने थोडा विचलित झाला व म्हणाला “तू ईश्वराची आराधना नाही करत? मग हे तप करून तुला काय मिळणार? ना इहलोकी सुख ना परलोकी सुख. मग हे तप का? घरी बसून सुद्धा तू स्व: आत्माचा शोध घेऊ शकत होतास.”
तो थोडा गंभीर झाला व साधूकडे पहात म्हणाला “तप म्हणजे इच्छा, आकांशा यांचा निरोध करणे, यश, कीर्ती, प्रतिष्ठा आणि इहलोक-परलोक मध्ये सुखाची अपेक्षा ठेऊन तप करू नये. तप हे केवळ आणि केवळ आत्मशुद्धीसाठीच केले जावे, या मताचा मी आहे.”
साधू उठून उभा राहिला व आकाशाकडे तोंड करून दूरवर कोठेतरी पाहात विचार करू लागला, थोड्यावेळाने तो म्हणाला “ तुझ्या तपाचे प्रकार किती आहेत?”
तो तसाच बसून होता व आपल्या उजव्या हाताची दोन बोटे दाखवत म्हणाला “दोन, तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.”
साधू सस्मित होत, म्हणाला “आता फक्त एवढे सांग ईश्वराबद्दल तुझे काय विचार आहेत?”
तो उभा राहिला व निर्भेळपणे आपल्या आसपास पसरलेल्या निसर्गावर आपली नजर फिरवत तो बोलू लागला
“ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही. आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही."
तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!”
No comments:
Post a Comment