Sunday, December 28, 2014

माझे महान प्रयोग - २

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.
सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !
माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध ! झाला चहा तयार.. पण माझ्या ह्या मताला लवकरच तडा गेला.. ! भाडं कुठलं घ्यावं ह्यावर दोन मिनिटे चिंतन झाले पण भाजपाच्या चिंतन शिबीराप्रमाणेच काही नक्की न झाल्या मुळे हातात जे आलं ते भांडे उचलले व गॅसवर ठेवले, एक कप शोधला व एक कप पाणी त्या भांड्यात ओतले, मस्त पैकी फ्रिज मधून दुध बाहेर काढले व एक कप प्रमाणे भांड्यात ओतले, थोडीशी शोधाशोध चालू केली साखरे साठी, वरच्या रॅक वरील डब्बा काडताना डब्ब्या बरोबर दोन-तीन ग्लास पण खाली आले, मी कॅच केले असे मला वाटले पण क्षणातच खनखणाट झाला व तीन्ही ग्लास भुईसपाट झाले... हातातला डब्बा किचन च्या ओट्यावर ठेऊन आधी झाडू शोधला व प्लॅस्टिकची सुपली घेऊन धारातिर्थ पडलेले ग्लास चे मोठे तुकडे गोळा केले व डस्टबीन मध्ये त्यांना समाधी दिली. परत माझा मोर्चा चहा कडे वळवला, चहा पुड माझ्या नशीबाने समोरच होती, पण आधी चहा पुड घालावी की आधी साखर ह्या बद्दल निर्णय होत नव्हता त्यामुळे एका हातात एक चमचा साखर व दुस-या हातात एक चमचा चहापुड असे सम प्रमाण त्या दुध-पाणी मध्ये टाकले पण जो कलर निर्माण झाला त्यानुसार मला असे वाटले की चहापुड कमी आहे त्यामुळे मी अजून एक चमचा चहा पावडर टाकली, तोच आठवले की चहापुड जास्त झाली की चहा कडू होतो त्यामुळे मी परत एक चमचा साखर घातली.
सर्व तयारी करुन मी एक कप व काही बिस्किटे काढून ट्रे मध्ये सजवली व विचार केला की अजून एक पाच मिनिटात चहा तयार होईल तो पर्यंत आपण डिश टिव्ही चालू करुन येऊ या. मी टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले, मी स्वतःच हसलो व नॉब फिरवून गॅस चालू केला व लायटर ने खॅट खॅट केले पण गॅस नाही पेटला, आता मात्र मी मला समजेणासे झाले की गॅस का पेटत नाही आहे, मी शेगडी पासून खाली जाणारी नळी पाहील तर मला रेग्युलेटर आठवला, मी सिलेंडर वर असलेला रेगुलेटर पाहिला तर तो सतबीर ने काढून ठेवला होता, मी त्याला मस्त पैकी शिव्या दिल्या दोन तीन.. व तो रेगुलेटर परत सिलेंडर वर जोडला व नॉब चालू करुन गॅस पेटवला.
तोच टिव्ही वर माझे आवडते गाणे, मस्स्ककली मटककली चालू झाले पण बाहेर आलो व टिव्ही वरी गाणे पाहू लागलो तो मला आठवल की चहा. मी पळत आत आलो तर अजून उकळी फुटली नव्हती, मी गॅस समोरच उभे रहावे ह्या निर्णयावर आलो व तेथेच उभा राहिलो चहा कडे बघत. तोच मला आठवलं की कुठे तरी हल्दीराम भुजीया आहे डब्यात, ती पण काढू म्हणून मी मागे वळुन डब्बा शोधू लागलो, डब्बा हाती लागताच मागे काही तरी सुं.. सुं... सुं.. झाले ! चहा ने बंड केला होते व काही चहा उकळी बरोबर भांड्यातून बाहेर शेगडी वर पसरला होता.. मी डोक्याला हात लावला व फटाफट गॅस बंद केला व ह्या गडबडीत ओट्यावर ठेवलेला चहापावडरचा डब्बा खाली कोसळला व मी त्याचे झाकण लावले नव्हते हे सांगण्याची काही गरज नसावीच Wink
७.२५ मिनिटे नंतर
मस्त पै़की स्वतः तयार केलेल्या चहाचा घोट घेत मी टिव्ही पाहत बसलो व काही वेळाने ताणून दिली परत....
९.२५ मिनिटे नंतर
मिपा उघडला, माझ्या व्यतिरिक्त नवीन लेखन इत्यादी शोधले काही सापडले नाही Wink सरळ पाककृती विभागात क्लिकलो वमटार-पालक पराठे हा जरा त्यातल्या त्यात सोपा प्रकार निवडा, जेवणासाठी. व कुणाची ही मदत घ्यायची नाही हे ठरवले.
सोपंच आहे, मटार २ वाट्या, पालक २ वाट्या,आल १ पेरा एवढं,लसुण ४ पाकळ्या, मिरची /तिखट आवडीनुसार,मीठ चविनुसार
कणिक अंदाजे, तांदुळाचे पिठ ४ चमचे, पिठ मळुन घेण्यासाठी तेल , पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. बस्स ! जास्त कटकट नाही.. की झंझट नाही.. हा विचार करुन मी हेच करायचं ठरवले.
आधी फ्रिज मध्ये / किचन मध्ये काय काय सामान आहे व नाही आहे ह्याची लिस्ट तयार केली.
मटार - हाजीर.
पालक - हाजीर.
आलं - गैर हाजीर.
लसुण - हाजीर
मीरच्या - हाजीर (लाल / हिरव्या / शिमल्या मिर्च वाल्या पण हाजीर)
तांदुळाचे पिठ - गैर हाजीर
तेल - हाजीर
प्लास्टीक पिशवी :? - सहा पिशव्या हाजीर ( हे कश्याला हा प्रश्न )
म्हणजे आलं व पिठ ह्यांची जुळणा करायला हवी, कॉलीनीतल्या दुकान वाल्याला फोन केला.
मी " आलं है ? "
तो " आलं ?"
मी " स्वारी, अदरक है ? "
तो " है"
मी " १०० गॅम "
तो " आगे "
मी " चावल का आटा है ?"
तो " क्या.. नही है."
मी " तो बस अदरक भेज दे, एफ-३१ में"
तो " क्या साब, मजाक कर रहे हो, १०० ग्रॅम अदरक के लिए किसे भेजू"
त्याच्या ह्या नख-यामुळे मला एका आल्याच्या तुकड्यासाठी दोन साबुण व शॅप्मु विनाकारण घ्यावा लागला.
१०.०५ मिनिटे नंतर
आलं झालं, पिठाचं काय करायचं ? शेवटी डोक्यात आयडीयाची कल्पनेने भरारी घेतली व किचन मध्ये जाऊन तांदळाचा शोध चालू केला, तांदुळ मिळाले पण माझा धक्का लागून चार अंडी ठेवलेला बाऊल खाली पडला व त्याच्या बरोबर अंडी पण.... ! झालं पुन्हा पुसणे साफ सफाई करुन मी, तांदुळ व मिक्सर समोरासमोर बसलो. तांदुळ मिक्सर मध्ये घातले व मिक्सर चालू केला... घर घर घर... चांगले दहा मिनिटे फिरवले व ढक्कण उघडून बघितले तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे झाले होते पण पिठ काय तयार झाले नाही, शेवटी मी मिक्सरचे मॅन्युअल शोधण्याचा प्रयत्न केला व ते बॉक्स मध्येच सापडले. त्यात लिहल्यानुसार मी त्याच्या ब्लेडस बदलल्या व पुन्हा मिक्सी चालू करुन तांदळाचे पिठ निर्माण केले. त्याला ३० % कोणी ही पिठ म्हनून शकेल येवढे ते बारिक जरुर झाले Wink
एक स्टेप पुर्ण केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर दिसू लागला होता.
आता बस तयारी चालू करायची व पराठे तयार !
पाणी उकळायला ठेवले व त्यात मटार + पालक घड्याळ लावून आठ मिनिटे उकळली, व नंतर मिक्सि मध्ये सर्व आयटम जे हाजीर होते त्यांना १० मिनिटे फिरवले.. मस्त पैकी त्याचे पण पिठासारखे बारिक बारिक तुकडे झाले... ब्लेड चेंज करायला विसरलो होतो. तरी हरकत नाही ह्यामुळे काही फरक पडणार नाही हा उच्च विचार करुन मी ते सर्व मिश्रण एका भांड्यात ओतले. व तयार मिश्रणात तांदळाचे पिठ घातले पण किती घालावे ह्यावर गाडी अडली पण मीच अंदाजे सर्व पिठ त्यात ओतले, आता कणिक हा काय आयटम आहे हे डोके खाजवले तरी शेवट पर्यंत मला उमजले नाही त्यामुळे तो आयटमी मी फालतू चा समजला व त्याला लिस्ट मधून बाहेर केला.
पाककृती लेखिकेने / लेखकाने सैलसर मळून घ्या असं लिहले आहे पण सैलसर मळणे म्हणजे काय हे मला उमजले नाही त्यामुळे मी सैलसर चा अर्थ पाणी जास्त पिठ कमी असा घेतला व त्यानुसार मळायला सुरवात केली माझ्या हिशोबाने पाणी जास्त होते पण हळू हळू मळताना पिठ जास्त मजबुत होऊ लागले व पाणी गायब, म्हणून परत पाणी घातले तर ह्यावेळी पाणी जरा जास्तच पडले म्हणून परत जरा पिठ घातले असे करत करत जे दळलेले पिठ होते ते सर्वं संपले.. पण थोडेसे सॉस सारखे पातळ पिठ मळून तयार झाले, ज्याचा रंग हिरवा दिसत होता.
आता प्लास्टिकच्या पिशवीची जुळणा करुन मी ते मिश्रण त्यावर थापले... (थापल्या पेक्षा पसरवले हे योग्य वाटत आहे) गॅस चालू केला, तवा त्यावर ठेवला व पाच एक मिनिटाने तवा गरम झाल्या वर मी ते मिश्रण तव्यावर ठेवले... तोच ती प्लॅस्टिकची फिशवी भसाभास आजूने जळू लागली व एक सहन न होऊ शकणारा दुर्गंध किचन मध्ये पसरला.. मला लक्ष्यात आले की आपण चुकलो आहोत.. मी लगेच गॅस बंद केला एक ग्लास पाणी तव्यावर ओतला, तव्याचा हाल पाहण्या लायक झाला होता, वरचे पराठा मिश्रण खाली पडले व प्लास्टिक सगळे तव्याला चिटकले... मी निराशेने तो तवा बाजूला ठेवला व दुसरा नवीन नॉन्स्टिकचा तवा परत गॅस वर ठेवला... आता मला तेल का हवे ते कळाले.
मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले व त्याला उचलून तव्यावर उलटा केला पण सर्व मिश्रण लोळागोळा होऊन एकाच जागी पडले... मी हळुच उलाथण्याने ते मिश्रण सर्व तव्याभर पसरवले व माझ्या डोक्यात आयडीया चमकली... की पुढील वेळी आपण सरळ तव्याला तेल लावू व त्यावर मिश्रण पसरवू !
मी माझा पहिला स्वनिर्मित पराठा तव्यातून बाहेर काढला व त्याला एका प्लेट मध्ये ठेवला, व दुस-याची तयारी करु लागलो, दुसरा सरळ तव्यावरच पसरवला व तो पकण्याची वाट पाहू लागलो तोच बाजूला प्लेट मध्ये असलेला पराठा मला खुणवत होता.. टेस्ट कर टेस्ट कर पण मी स्वतःला संयमीत करुन उभाच राहीलो पण काही क्षणात संयम सुटला व मी सरळ त्या पराठ्याचा एक
तुकडा तोडून तोंडात टाकला... अरे वा ! मस्त चव. पण जरा कच्चां राहिला असावा असे वाटले पराठा, मी जरा निरखुन पाहीले तर मी पराठा तव्यावर फिरवलाच नव्हता.
१०.४५ मिनिटे नंतर
दोन-तीन पराठे करपल्यामुळे... जळल्यामुळे.. खराब झाले पण त्यानंतरचे दहा-बारा पराठे एकदम व्यवस्थीत झाले, जरा टेस्ट विचित्र होता.. पण ठिक स्वतः तयार केलेल्या आयटम ला का नावे ठेवा.. काही नाही जरा मिठ घालायला विसरलो होतो.. हिरवी कि लाल मिर्च ह्या नादात दोन्ही मिर्च घातली होती त्यामुळे तिखट जाळ झाला होता पराठा पण टेस्टी होता बॉस ! मी जोर लावून दोन पराठे कसे बसे खल्ले ! व किचनचा दरवाजा बंद करुन मस्त पैकी दोन ग्लास मोसंबी ज्युस घेतला व गप्प संगणक चालू करुन मिपा-मिपा खेळू लागलो Wink
चार अंडी, दोन-तीन काचेचे फुटलेले ग्लास, मिक्सर + मिक्सरची सर्व भांडी व ब्लेड्स , सर्व किचन भर पसरलेले सामान, खाली काढून ठेवलेले डब्बे व डझनाने धुण्याची भांडी एक प्लास्टिक जळून चिटकलेला तवा व दहा एक मटार-पालक पराठे चे पराठे मी सतबीर साठी सोडून त्याच्या येण्याची वाट बघू लागलो !
संध्याकाळी ०५.१० मिनिटे नंतर
"हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " - एका पायावर नाचत सतबीर किचन मधून बाहेर येताना मला दिसला व मी लगेच मागच्या दाराने.... बागे कडे सटकलो !
रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर
पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !
***************************************************
* आता सध्या कानाला खडा लावला आहे.. नो प्रयोग @ किचन ! ना बाबा ना !

Monday, December 22, 2014

मामाचे गाव (आत्या आज्जी)

सुट्टीमध्ये आमच्या खूप गमती-जमती चालत असे. वाड्याच्या थोड्याच अंतरावर खाली एक ओढा वाहत असे, भर उन्हाळ्यात फक्त डबक्यात पाणी भरलेले असे व सवर्त्र वाळूचे साम्राज्य पसरलेले. दोन फुट खड्डा जरी हाताने खणला तरी ओलसर वाळू हाताला लागत असे. ओढ्याचा एक मोठा भाग आम्हाला दिसायचा पण जेथून ओढा सुरु होत असे तेथे घनदाट झाडी असल्यामुळे पाणी कोठून येथे हा प्रश्न आमच्या समोर नियमित असायचा. पावसाळ्यात तुडुंब भरलेला ओढा उन्हाळ्यात डबक्यात कसा मावतो याचे उत्तर शोधण्याचे आम्ही आमच्या परीने अनेक प्रयत्न करायचो. मावस बहीणी एकापेक्षा एक शक्कल लढवायच्या, कोणी म्हणायचे वरच्या बाजूला एक राक्षस राहतो तो सगळे पाणी पिऊन टाकतो, कोणी म्हणायचे देव रुसतो म्हणून पाणी बंद करतो. प्रत्येक बहिणीकडे एक ना एक कारण नक्की असायचे सांगण्यासारखे! पण एक दिवस संन्मती म्हणाली की आत्या आजीने पाणी बंद केले आहे, आमचा सर्वांचा एकजात विश्वास बसला व आम्ही सगळे एकसुरात म्हणालो हो हो! तीच असेल पाणी बंद करणारी. वाड्यातील विहीरीच्या मोटाजवळ उभे राहून कोणी किती बालटी पाणी अंघोळीसाठी घेतले व त्याचा हिशोब मांडणारी व्यक्तीच ओढ्याचे पाणी बंद करु शकते यावर आमचा पक्का विश्वास बसला.
ईसावअज्जा च्या तावडीत सापडणारी मुले भल्या पहाटे शेतातील विहीरीवर अंघोळीला जात व राहिलेल्या मुली व घरातील प्रत्येक व्यक्ती वाड्यावरील विहीरीतून पाणी घेऊन अंघोळ करे. पिण्याच्या पाण्याची विहीर असल्यामुळे त्या विहीरीत उतरण्यावर प्रत्येकालाच बंदी होती. आजोबा पण वयोमानानूसार शेतातील विहीर पोहायला जाणे बंद केल्यावर याच विहीरीतील एक-दोन बालटी पाणी घेऊन अंघोळ आवरायचे, कधीमधी आजोबानां जर तिसर्‍या बालटीचा मोह झालाच तर आत्या आज्जी त्यांना पण ओरडायची. आत्या आज्जी कोण ती पाणी घेतं हे पाहण्यासाठी जातीने त्या विहीरीवर पहाटे पासून उभी असायची, आई म्हणते ती उभी असते पण पाटीला आलेल्या वळणामुळे ती आम्हाला कायम वाकलेली दिसायची. उरल्या-सुरल्या पांढर्‍या शुभ्र केसांची जुडी मागे घेतलेली, पुढे असलेले उरलेले दोन दात कायम ती हसत असल्यासारखे दिसत असायचे. मोठा मामा नेहमी म्हणायचा " हीला पांढरी साडी घालून रस्तावर जर रात्री उभी केली तर किमान ३-४ लोक मयत होतील" व खदाखदा हसायचा. तो हसला की घरातले सगळे हसायचे. मग आजोबा हातातील काठी जोरात वाजवायचे व म्हणायचे " ती होती म्हणून तुम्ही सगळे आहात विसरु नका!"
आत्या आज्जीचे सगलेच काही वेगळे होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना आम्ही घाबरायचो ते आजोबा देखील तिला घाबरायचे. काही महत्त्वाचे निर्णय जरी आजोबा घेत असले तरी, आराम खुर्चीवर बसल्या बसल्या आत्या आज्जीला हाताने बोलवायचे व ती जवळ आली की निर्णय सांगून तिला विचारायचे "अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?" मग आत्या आतून खोलवर घळीतुन आलेल्या आवाजात म्हणायची " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!" ही अशी म्हणत असे खरी पण एकादा निर्णय तीला आजोबा सोडून दुसरीकडून समजला रे समजला की हिचा तोंडचा पट्टा चालू होत असे, "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी" इत्यादी इत्यादी. मग घरात जो कोणी येईल जाईल त्याला हे रडगाणे ऐकवायचे. कोणीच मिळाले नाही तर मला किंवा माझ्या बहिणीपैकी कोणाला तरी पकडून दिवसभर तेच तेच सांगत राहयचे हा तिचा स्वभाव. वर जर आजोबा, मामा समजवण्यासाठी गेले तर अगदी लहानपणापासून माझेच कसे वाईट घडले, दुष्काळात तीचे कसे हाल झाले, तीच्या वडिलांनी (आमचे पंजोबा) कसे विहीरीतील पाणी दिले नाही हे रडगाणे चालू होत असे. मध्येच कोणीतरी बाई नकटा आवाज काढून म्हणत असे की "अच्छा, म्हणजे त्याचा बदला म्हणून बाल्टी मोजून पाणी देतेस तर.." हा टोमणा नेहमी प्रमाणे लहान मावशीनेच दिला असायचा, पण आत्या आज्जी चवताळून उठे व मला थोडेफार कन्नड समजते ते कन्नड सोडून अत्यंत कर्शक आवाजात इतके काही बोलत राहयची की शेवटी आजोबा पुढे होऊन तीचे पाय धरायचे.
तिचा राग तिचा त्रागा हळू हळू निवळत असे व ती शेवटी आपल्या खोलीचे दार धाड करून बंद करत असे. थोडावेळ आत राहिल्यावर ती गुपचुपपणे दरवाजा उघडायची व तीचा खास कडी-कुलुप असलेला पितळी डब्बा घेऊन बाहेर येत असे व पहिली हाक मला मारे "राज्या बा इकडे" मी धावतच जात असे, कारण त्या पितळी डब्बात असलेला माझा आवडता तुपातील बेसनचा लाडू सगळ्यात आधी मलाच मिळणार हे मला माहीत असे. डब्ब्यातील दोन लाडू काढून आज्जी माझ्या हातात देत असे व लटक्या रागाने मला सांगायची " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"

>"अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?"
अक्का, हा विचार आहे, तुझे काय मत आहे?
>> " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!"
"आप्पा, तु विचार कर, चांगले वाईट बघ. म्हणजे निर्णय तुच घे, मी कोण नाही/होय म्हणायला? हे सगळे तुझेच आहे!"
>>> "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी"
"मी कोण, तुम्ही का याल मला विचारायला, मरु पर्यंत तरी विचारा, म्हणजे देवाला हात जोडते, मी घरात रहाते, जेवण करुन जेऊ घालता, उपकार करताय"
>> " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"
जा, आप्पाला एक दे, आणि तु एक घे.

Sunday, December 14, 2014

“पडणे” एक कला

दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी पडणे एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे,  तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की पडणे या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.
काही लोक केळाच्या सालीवरून घसरून पडतात व मी पडलो असे तोंड वर करून सांगतात, अहो पण हे पडणे नाही आहे, हे चुकून केळाच्या सालीने तुमच्या पायाखाली यावे व तुम्ही पडावे एवढी साधी घटना आहे. पडणे एक कला आहे, एक आर्ट आहे. अनेक जण तर उभ्या उभ्या पडतात, का म्हणे तर चक्कर आली. अहो, दिवसभर व्यवस्थीत पाणी ढोसले असते, पोटाला मुठभर अन्न दिले असते तर काय बिशाद तुम्ही चक्कर येऊन पडाल?

पडणे म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही २०-२५ च्या वेगाने धावत जिना उतरत आहात व पाच एक जिने उतरल्यावर तुम्ही एका मोक्याच्या क्षणी उडाण करता व पुढे जिन्यावर पायाचा स्पर्श न होऊ देता तुम्ही शरीराच्या मदतीने बरोबर तळ मजल्यावर येता व लगेच हात झटकत उभे राहून मला काय झाले नाही, असे नाकातून आलेले रक्त शर्टाच्या उजव्या बाहीने फुसत सांगू शकलात म्हणजे तुम्ही योग्य रीतीने पडलात. अनेकदा आपण पडलो हे इतरांना सांगता यावे म्हणून काही महाभाग ठेचकाळले असले तरी किती, जोरात मी पडलो! असे बिनधास्त खोटे बोलून जातात, पण अश्या लोकांच्या मुळे आमच्या सारख्या सतत अभ्यास करून पडणारया लोकांच्यावर मान खाली घालण्याची वेळ येते हे त्यांना कळत नाही. पडण्याचे दुसरे सुंदर उदाहरण म्हणजे वाहन चालवताना पडणे (या विषयावर मी माझा पिय-चडी प्रबंध सादर केला आहे) वाहन चालवताना पडण्याचे अनेक प्रकार आहेत पण नेहमी ज्याचा आनंद घ्यावा म्हणजे वाहन घसरणे!
वाहनावरून घसरून पडणे आणि वाहनासहित घसरून पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महाभाग आम्ही पाहिले आहेत जे वाहनावर बसतानाच पडले. मी त्यांच्याबद्दल लिहित नाही आहे, मी वाहनासहित जे पडतात अश्या थोर लोकांच्याबद्दल सांगत आहे.  तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) गाडी योग्य जागी आली म्हणजे काहीतरी गाढवपणा करावा, उदा. उगाच पुढील ब्रेक मारणे, समोर रस्तावर खडी दिसत असली तरी वेग वाढवणे, समोरचा खड्डा आपल्याकडे पाहून खदाखदा हसतो आहे व आपण त्याला टाळू शकत नाही हे माहिती असून देखील टाळण्याचा प्रयत्न करणे, एकादी सुंदरी बाजूने जात असेल तर तिचा चेहरा पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करणे, तीव्र उतार असेल तर झिगझ्याग पद्धतीने उगाच गाडीचा वेग वाढवत जाणे.. इत्यादी इत्यादी.  आता यातील कोणताही एक गाढवपणा केला कि तुम्ही सहजपणे पडू शकता. लगेच पडता येत नाही, थोडा अभ्यास करावा लागतो, पण जमेल. अजून एक वाहनाची दोन्ही चाके वर झाली व तुम्हाला कोणी थोबाडावर पाणी मारून उठवले म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पडला नाहीत हे समजून घ्या व पुढील वेळी दक्ष रहा.
जेव्हा आपण वाहनावरून पडत असू, तेव्हा शरीराचा धरणी सोबत होणारा प्रत्येक स्पर्श आणि स्पर्श तुम्हाला जाणवलाच पाहिले, जेव्हा धरणीमाते चरणी  तुमचे डोके तुम्ही ३-४ दा ठेवाल तर तो सुखद स्पर्श तुमच्या आंतरमनात नाहीतर किमान खोपडीवर कोरला जायलाच हवा. पडताना आपले पाय, आपले हात, आपली उरलेली सर्व हाडे कुठे कुठे आहेत याचा अंदाज तुम्हाला असायलाच हवा जेणे करून नंतर डॉक्टरने एखादे हाड गायब केले तर तुम्हाला समजू शकेल. याचे जिवंत उदा. मीच आहे, मी एक उच्च कोटीची पडण्याची कला दाखवली होती, पायातील हाड बाहेर आलेले मी याची देही-याची डोळे पाहिले होते पण नंतर डॉक्टरने बील दिले कि पायाचे हाड सापडले नाही म्हणून रॉड घातला. तर आपल्या सर्व हाडांची दक्षता घ्या आणि हो, तुम्ही पडलेले आहात, बरं तुम्ही एकटे पडलेले नाही आहात, तुमचे वाहन.. ह्या ह्या ह्या..  विसरला काय राव!!!!  तर ते वाहन एकतर तुमच्या पुढून घसरत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण ते मागू घसरत येत असेल तरी काळजी करू नका, जे घडणार ते घडणार.  मग थोड्यावेळाने सर्वकाही थांबेल,  म्हणजे तुम्ही, तुमचे वाहन, मागचे ट्राफिक! घाबरून जायचे नाही, सावकाश हसत हसत उठायचे, हसणे मस्ट आहे, कारण तुमचे नाक तुटले असेल, किंवा बत्तीस पैकी काही शिल्लेदार तोंड सोडून गेले असतील, गालावर कुठे लागले असेल तर लगेच जाणवते. मग हळूच पाय हालवून पहा, पाय घालला, म्हणे तुम्ही हालवल्यावर हालला तर ओके, पण आपोआप लुडकला असेल तर जयपूर फुट स्वस्त झाले आहेत काळजी नसावी. पाय सलामत असतील तर हात हालवून पहा, मग मान, मग पार्श्वभाग..  दुखत तर सर्वत्र असेल पण कळ येत असतील तर तुम्ही पुन्हा पडण्यास सज्ज आहात.. याची मी खात्री देतो.


·         नेहमी डोक्यावर हेल्मेटची सवय ठेवा, मी अनेक वेळा त्याचमुळे वाचलो आहे. आणि वाहन काळजीने, काळजीपूर्वक चालवा  (आता मीच ३ दिवसापूर्वी पडलो, लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच जागेवर अजून जोरात पडण्याचा पराक्रम केला आहे, शक्यतो हे विश्वरेकोर्ड माझ्या नावानेच लागेल. तरी घ्या मनावर आणि सुरक्षित रहा!)



Wednesday, December 3, 2014

मामाचे गाव - तात्या

लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे. सकाळची न्याहारी मी सोबत घेतली व शेताकडे निघालो.
आमच्या कोल्हापुर व हे गाव यात जमी-आस्मानचे अंतर होते, इकडे सर्वत्र, अगदी नजर जाईल तेथे पर्यंत शेती पसरली होती. वीतभर रुंद व शेताच्या शेवटपर्यत असलेला बांध म्हणजे शेताच्या या व त्या तुकड्याचा मालक कोण? याची साक्ष देण्यास सक्षम होता. पावलोपावली वडाची, अंब्याची, जांभळ्याची, आवळ्याची झाडे पसरलेली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला साथ देणारी बोरी-बाभळीची रांग! कुणाच्या शेतात सहस्त्र हस्त पसरून आकाशाकडे वरदान मागत असलेला वड व त्याच्या बुंध्याजवळ वाटसरूसाठी ठेवलेली पाण्याची मडकी. खावीशी वाटली म्हणून कोणाच्यातरी शेतातून एकादं वाळूक तोडलं तर समोरचा आवाज द्यायचा "ए, हुडगा, इकडे बा. इकडू त्वगा. आऊ स्वल्प संन ईदे." अशी आवभगत असे. पहिली पन्नास शेती ओळखीची होती.. आपलीच होती. त्यामूळे भय नव्हते, पण तसेही भिण्याचे कारण देखील नव्हते. गावातल्या इतर लोकांच्या शेतात जरी पाय ठेवला तरी कोणी नाही म्हणणार नक्की नव्हते. पण मावशी नेहमी सांगे, आपल्याच हद्दीत फिरत रहा, दुसऱ्यांच्या जमिनीला, पिकाला त्रास न होईल याची काळजी घे.
दूरवर ७-८ अंब्याच्या झाडांचा हिरवागार परिसर दिसला एखाद्या शेतात तर ते आपले शेत! माझ्या मावशीचे शेत. त्या झाडांच्या सावलीमध्ये एक लहानशी झोपडी आहे, अगदी मला हवी तशी. त्यात सिझन असेलतर भरपूर कच्चे आंबे रचून ठेवलेले असायचे की, त्याचा वास फर्लांगभर आधीच नाकात घमघमत असे. झोपडीवर भोपळ्याची हिरवीगार वेल पसरलेली आणि बाजूला उजवीकडे मावशीच्या आवडत्या म्हशी बांधलेल्या असत. मावशीच्या आवडत्या, कारण त्यांना फक्त मावशीने दुध काढलेले चालत असे, अगदी तात्याजरी गेला, तरी त्या उच्छाद मांडत. डावीकडे सरपण गोळाकरून रचून ठेवलेले. तेथेच तात्यांचा दुपारी झोप घेण्यासाठी ठेवलेला जुना लोखंडी कॉट, तो मस्त पैकी कर कर आवाज करायचा, त्याचा आवाज आला की म्हशी फेंद्ररायच्या!
तात्याला मी सकाळी घरी कधी पाहिलाच नाही, तो भल्यापहाटे उठून शेतात जात असे. आणि शेतात गेला नसेल तर गावात कोणाच्यातरी मदतीला गेला असे. तो घरात का नसतो या पेक्षा तो घरात कधी असतो हा प्रश्न मला पडत असे. आख्या गावात तात्या, मजलेअण्णा म्हणून प्रसिद्ध होता. आजोबांच्या सारखाच पांढरा सदरा, पांढरे धोतर, हातात त्या धोतराचे टोक. फरक होता तो मिश्यामध्ये. तात्यांच्या मिश्या भारदस्त! अगदी ते सतत दोन्ही टोकांना पीळ देत असत, अगदी काम करत असले तरी!
पण, शेतात काम करत असले की त्यांचा अवतार बघण्यासारखा असे. अंगावर बंडी, डोक्याला मुंडासे, धोतर गुडघ्यापर्यतवर घेऊन मागे खोचलेले. आपले पिळदार दंड दाखवत ते शेताला पाणी पाजत आणि मध्येच जोरजोरात ओरडत असत "हो....हो... हुर्ये.....हो... हुर्ये...हो" ते असे ओरडले की मला जाम मज्जा येत असे, कारण एक साथ कितीतरी पक्षी एकदम जमिनीवरून आकाशात झेप घेत. मी झोपडीजवळ पोचलो की, शिदोरी आत ठेवून देत असे, व ते जेथे काम करत असतील तिकडे जाण्यास निघत असे. ते तिकडूनच आवाज देत व मला म्हणत "राज्या, मग्ना! निंगू दौड बराक यान आते? यावंद हादी नोडते इदेऊन ना. बा मरी" मी आपला पाटातून वाहत असलेल्या पाण्यावर छप-छप आवाज येण्यासाठी उड्या मारत त्यांच्या जवळ पोचलो की, कुठून तरी आणलेला एखादा लाल पेरू, कधी चिंचा, इलायती चिंचा हातात देत व म्हणत "आईतू, नडी इष्ट नीर बिडत्यानू."
तात्यांचे शेताला पाणी पाजणे हे न संपणारे काम असे, तरी देखील कुठेतरी एक मोठा पाट सोडून ते त्याच वाहत्या पाण्यात आपले हात, पाय, तोंड धूत व कधी मस्तीत असले की झप करून पाटातील पाणी माझ्यावर उडवत. मी इकडे तिकडे पळू लागलो तर मात्र एकदम मला थांबवायचे, कारण आताच कुठे बियाणे शेतात पेरलेली असतं. मग माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्यासोबत झोपडीकडे चालू लागत. मग जाताना त्यांचा संवाद फक्त शेताबरोबर चालू असे. किती बियाणे घातले, किती पाट भिजले, किती राहिले, येणार कधी, देणार कधी. काही ना काही त्यांचे हिशोब चालू असतं. पण मी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता, पाटातील पाण्यातून चालण्याचा, पाणी उडवण्याचा आनंद घेत रमत-गमत चालत असे. झोपडीजवळ आल्यावर तात्या निवांतपणे आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसत व नेहमी बसताना दक्षता घेत असावेत की आपली पाठ शेताकडे नको, कारण मी जेव्हा पण पाहिले तेव्हा त्यांचे तोंड नेहमी शेताकडे व समोर मला बसवत.
न्याहारीमध्ये भाकरी, भाजी, तोंडी लावायला ठेचा आणि दही. हे हवेच हवे. यातील काही विसरले तर ते मला 100% परत पायपीट करायला लावतील एवढी खात्री होती. पण एकदा मन लावून न्याहारी चालू झाली की मग मात्र तात्या जग विसरत. पूर्ण लक्ष अन्नावर. खूपच इच्छा झाली तर मला झोपडीतून एखादा कच्चा अंबा घेऊन ये म्हणून सांगायचे पण न्याहारी मनासारखी जमलेली असेल तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर घासागणिक आनंद दिसत असे, आणि हा आनंद मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला होता, अगदी कारल्याची भाजी असताना देखील.
न्याहारी झाली की, तात्या आपल्या कॉटवर बसायचे व बंडीच्या भल्या मोठ्या खिश्यातून एक अडकित्ता बाहेर काढायचे, एक सुपारीचे खांड आणि करकर त्याचे बारीक तुकडे करून तोंडात टाकायचे, मग परत खिश्यात हात घालून एक पान बाहेर काढायचे, नंतर स्टीलची चुन्याची डब्बी.. अंगठ्याच्या नखाने थोडा चुना काढून त्या पानाला लावायचे व ते पान दुमडून खाऊन टाकायचे. मग परत खिश्यातून एक लहानशी पितळी डब्बी काढायचे त्यातील तंबाखू काढून आपल्या डाव्या हातात घेऊन, चांगले मळून आपल्या तोंडात टाकायचे. हा सगळा कार्यक्रम चांगला ५-१० मिनिटे चालायचा. पण ते असे पान फक्त येथे शेतावर खात असावेत, कारण आजोबांच्या समोर आजोबा हातात देतील तसे पान घेऊन गुपचूप तोंडात टाकत. आजोबांचे नाव जरी कोणी घेतले की ते उजव्या हाताने एकदा छातीवर हात ठेवत व डोळे मोठे करून म्हणत "देव रे!" यावरून मला हे समजले होते की ते आजोबांना जाम घाबरत. पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत.
क्रमश:
*राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि! - राज्या, जेवण कर, आणि एक काम कर बाळा!
*ए, हुडगा, इकडे बा. इकडू त्वगा. आऊ स्वल्प संन ईदे. - ए, मुला, इकडे ये, इकडून घे. ते अजून लहान/कच्चे आहेत.
*राज्या, मग्ना! निंगू दौड बराक यान आते? यावंद हादी नोडते इदेऊन ना. बा मरी - राज्या, लेका! तुला लवकर यायला काय झाले? केव्हा पासून वाट पाहतो आहे ना मी. ये मुला.
*आईतू, नडी इष्ट नीर बिडत्यानू - झाले, चाल, एवढे पाणी सोडतो.

Tuesday, December 2, 2014

मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२

इसावअज्जा मला शेतात घेऊन जेव्हा जात असे तेव्हा खरी मज्जा येत असे. मी विचारलेल्या एक आणि एक प्रश्नाला खरी-खोटी जशी समजतील तशी इसावअज्जा उत्तर देत असे. मग पेरु हिरवाच का? प्रश्नाचे उत्तर पानांचा रंग लागतो ना म्हणून हिरवा. विहीर गोल का? तांबे, पेले, वाट्या, घागरीची तोंड गोल असतात म्हणून विहीरीचे तोंड गोल. नाना प्रश्न ना ना उत्तरे.
आजोबांच्या दुरवर परसलेल्या उसाच्या वाडीत एका कोपर्‍यात एक कौलारु बैठ घर. मातीच्या भिंती, दोन खोल्या. त्यावेळी लाईट नसायची आमच्याकडे. लाईट फक्त शेताला पाणी द्यायचे असायचे तेव्हाच येते असं इसावअज्जा सांगायचा. आतल्या खोलीत काहीबाही सामान भरुन ठेवलेले असायचे. मला त्या खोलीची खुप उत्सुकता लागून राहलेली असे, कारण आत हजारो गोष्टी भरुन ठेवलेल्या होत्या व त्या सगळ्या मला हव्या होत्या. त्यात जूने पणतीचे दिवे होते, कंदिल होते, वेगवेगळी अवजारे होती व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वरच्या मोठ्या तुळईवरच्या खिळ्यावर काही पतंग लटकलेले होते. इसावअज्जा माझे भले किती लाड करत असे पण त्या खोलीकडे मला जाऊ देत नसे. मी मागे ते देत असे पण ते पतंग देत नसे. तरी मी खुष होतो, इसावअज्जा माझा फुगलेला चेहरा व मला ती खोली का पाहू देत नाही या रागामुळे लाल झालेला नाकाचा शेंडा पाहून लगेच खास लपवून ठेवलेले लाल पेरु विळत्यावर कापून माझ्या समोर धरत असे. त्याला माहीती होते एकवेळ मी आंबा नको म्हणेन रागात पण लाल पेरुला कधीच नाही म्हणणार नाही.
त्या घराच्या बाहेरच्या खोलीत मात्र मला मनसोक्त दंगा घालण्याचा मुभा होता, ज्वारीची पोती आणि पोती भरलेल्या त्या खोलीत काय नव्हते? पोत्यांची घसरगुंडी होती, दगडी दोन दोन जाती होती, भली मोठी वजन तांगडी होती व सगळ्यात महत्वाचे तेथे मोठा, खूप मोठा म्हणजे मी व माझ्या सगळया बहिणी त्यात बसतील असा एक मोठा लाकडी झोपाळा होता. मी त्यावर पुर्ण झोपलो तरी दोन्ही बाजुला व उजवीकडे डावीकडे खूप म्हणजे खूप जागा राहत असे. मी माझे दोन्ही हात, दोन्ही पाय फैलावून त्यावर झोपलो तरी त्यावर तरीही खूप जागा राहत असे.
इसावअज्जा समोर लाकडी आराम खुर्चीवर बसून कडदोर्‍याला बांधलेली चंची काढून, त्यातून पान, चूना, तंबाखु व कात काढून माझा चाललेला दंगा बघत, गालातल्या गालात हसत पान तयार करून घेत. जर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले की मी पानासाठी हट्ट धरणार हे त्यांना माहीती असायचे मग ते हळून एक कोवळे इटुकले पानं काढत व पान करण्याची सगळी साग्रसंगीत अवलंबून ते चुन्याच्या जागी पाणी लावलेले, तंबाखुच्या जागी चार बडिसोफाच्या गोळ्या घातलेले पान मला देत. मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघू, मी बाहेर पडण्यासाठी पुढे झालो की इसावअज्जा प्रत्येक भिंतीवर प्रदक्षिणा घालताना जसा हात भिंतीवर ठेऊन चालतात तसे चालत घराच्या चारी कोपर्‍यातून दरवाजाकडे येत असे. तो पर्यंत मी समोर असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावर हुडदंग चालू केलेला असे व इसावअज्जा माझ्यावर डाफरत म्हणे "कन्नगं मन्न होईत नोडू (डोळ्यात माती गेली बघ!)" असे म्हणून डोळे धोतराने पुसत असे. मग ते न बोलता पुढे पुढे निघत व मी त्यांच्या मागे मागे.
तुळतुळीत डोक्याचे, खुप उंच असलेले, नेहमी धोतर नेसणारे, सदरा न घालता फक्त पंचा खांद्यावर बाळगणारे हे इसावअज्जा म्हणे गांधीजींचे भक्त होते पण ते असे पुढे पुढे चालत असले की त्यांच्या हलणार्‍या सावलीतून त्यांच्या मागे मागे जाण्यात मला खूप आनंद मिळत असे. ते जरा खुषीत असले की स्तोत्र इत्यादी म्हणत रमत-गमत चालायचे व मी ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी त्यांच्या मागे-पुढे पळापळ करायचो. आमची ही दांडीयात्रा घरी पोहचू पर्यंत संध्याकाळ झालेली असायची. अंधार पडायच्या आत इसावअज्जा पडवीतील दिवे लावण्याच्या कामी लागायचा व मी आज काय मज्जा केली हे सांगायला माजघराकडे पळायचो.
असेच एकदा आम्ही शेतातून परत आल्यावर कट्यावरील आपल्या वेताच्या आराम खुर्चीत डुलत बसलेल्या आजोबांनी इसावअज्जाला आपल्याकडे बोलवले. इसावअज्जा व आजोबा खूप वेळ बोलत बसले, मी खाऊ खाऊन आलो तरी ते बोलत होते, मी वर जाऊन आक्काशी भांडून आलो तरी बोलत होते, जेवणासाठी पंगत बसली तरी ते बोलत होते. रोज पंगतीत होणारा थोडाफार हास्य विनोद थांबला होता, सगळे मोठे गंभीर चेहर्‍याने जेवत होते व आम्ही लहान मंडळी बावरुन गप्प मऊ भात गिळत होतो. अचानक फुटलेल्या एका हुंदक्यामुळे मी बावरुन इकडे तिकडे पाहिले मोठी मामी, सन्न मामी, सदलगा मामी, लहान माऊशी, मोठी माऊशी, बेळगावची काकी व एकोंडीची काकी तोंडात पदर घेऊन रडत होत्या व सोबत जेवत होत्या. शेजारी बसलेली आई हुंदके देत होती व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होती. मोठी लोक भुतकाळात गेली होती व लहान मंडळी मोठ्यांचा हा वेगळाच अवतार पाहून डोळ्यात आलेले पाणी थोपवून एकमेकांच्याकडे पाहत आधी कोण रडण्याची सुरवात करतो हे पहात होती.
"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल." आजोबा थोडे जोरातच बोलले. भरल्या ताटात हात धूऊन माझ्याकडे भरल्या डोळ्याने बघत इसावअज्जा पंगतीतून उठले. पंगत संपली. काय झाले? हा प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर घेऊन बालचूम अंगणात जेथे झोपायचे होते त्या त्या जागेवर जाऊन बसले. दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीमध्ये आजोबा दोन्ही हात मागे बांधून करारी चेहर्‍याने शतपावली करत होते, स्वयंपाक घरातून भांड्याच्या आवाजासोबतच खुसफुस चाललेली कळत होती पण समजत मात्र काहीच नव्हते. मात्र रात्री झोपण्याच्या वेळेस उलगडा झाला.. तो मोठे मामा व एकोंडीच्या काकीच्या बोलण्यातून.
चुलीत भडकलेली आग, त्यात इसावअज्जा च्या बायकोने घेतलेला पेट व त्या गोंधळात आपल्याच तान्हा मुलाला पाळण्यातून काढण्याच्या तीचा प्रयत्न.. सगळेच संपलेले होते. शेतावर असलेले इसावअज्जा व कामगार तेथे पोहचू पर्यंत कोळसा झालेला होता दोघांचा.. पेटल्या घराची आग सगळ्यांनी मिळून विजवली पण इसावअज्जा चे ते पेटलेले घर काय त्यांच्या मनातून विजले नाही. माजघराच्या दोन पाऊले समोर असलेल्या विहीरीत जर पेटलेल्या बायकोने उडी मारली असती तर सगळे नीट झाले असते असे इसावअज्जाला नेहमी वाटतं असे. पण त्यांच्या बायकोला पोहता येत नव्हतं!
या गोष्टीला अनेक वर्ष झाली, जखमावर खपली चढली, शेतातलं घर सोडून आमच्या आजोबांच्या घरी इसावअज्जा राहण्यासाठी आला कायमचा, त्या वर्षी जन्मलेल्या मुलीच्या पोटी अनेक वर्षानी मुलगा झाला. दोन्ही आजोळ मुलींनी फुलले असताना कोणाच्या ध्यानीमनी नसतात ना! सगळेच आनंदले पण सर्वात जास्त आनंद कोणाला झाला तर इसावअज्जाला कारण त्याच्या त्या तान्हामुलाच्या उजव्या ओठावर पण म्हणे तीळ होता...
क्रमशः