Sunday, December 28, 2014

माझे महान प्रयोग - २

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.
सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !
माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध ! झाला चहा तयार.. पण माझ्या ह्या मताला लवकरच तडा गेला.. ! भाडं कुठलं घ्यावं ह्यावर दोन मिनिटे चिंतन झाले पण भाजपाच्या चिंतन शिबीराप्रमाणेच काही नक्की न झाल्या मुळे हातात जे आलं ते भांडे उचलले व गॅसवर ठेवले, एक कप शोधला व एक कप पाणी त्या भांड्यात ओतले, मस्त पैकी फ्रिज मधून दुध बाहेर काढले व एक कप प्रमाणे भांड्यात ओतले, थोडीशी शोधाशोध चालू केली साखरे साठी, वरच्या रॅक वरील डब्बा काडताना डब्ब्या बरोबर दोन-तीन ग्लास पण खाली आले, मी कॅच केले असे मला वाटले पण क्षणातच खनखणाट झाला व तीन्ही ग्लास भुईसपाट झाले... हातातला डब्बा किचन च्या ओट्यावर ठेऊन आधी झाडू शोधला व प्लॅस्टिकची सुपली घेऊन धारातिर्थ पडलेले ग्लास चे मोठे तुकडे गोळा केले व डस्टबीन मध्ये त्यांना समाधी दिली. परत माझा मोर्चा चहा कडे वळवला, चहा पुड माझ्या नशीबाने समोरच होती, पण आधी चहा पुड घालावी की आधी साखर ह्या बद्दल निर्णय होत नव्हता त्यामुळे एका हातात एक चमचा साखर व दुस-या हातात एक चमचा चहापुड असे सम प्रमाण त्या दुध-पाणी मध्ये टाकले पण जो कलर निर्माण झाला त्यानुसार मला असे वाटले की चहापुड कमी आहे त्यामुळे मी अजून एक चमचा चहा पावडर टाकली, तोच आठवले की चहापुड जास्त झाली की चहा कडू होतो त्यामुळे मी परत एक चमचा साखर घातली.
सर्व तयारी करुन मी एक कप व काही बिस्किटे काढून ट्रे मध्ये सजवली व विचार केला की अजून एक पाच मिनिटात चहा तयार होईल तो पर्यंत आपण डिश टिव्ही चालू करुन येऊ या. मी टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले, मी स्वतःच हसलो व नॉब फिरवून गॅस चालू केला व लायटर ने खॅट खॅट केले पण गॅस नाही पेटला, आता मात्र मी मला समजेणासे झाले की गॅस का पेटत नाही आहे, मी शेगडी पासून खाली जाणारी नळी पाहील तर मला रेग्युलेटर आठवला, मी सिलेंडर वर असलेला रेगुलेटर पाहिला तर तो सतबीर ने काढून ठेवला होता, मी त्याला मस्त पैकी शिव्या दिल्या दोन तीन.. व तो रेगुलेटर परत सिलेंडर वर जोडला व नॉब चालू करुन गॅस पेटवला.
तोच टिव्ही वर माझे आवडते गाणे, मस्स्ककली मटककली चालू झाले पण बाहेर आलो व टिव्ही वरी गाणे पाहू लागलो तो मला आठवल की चहा. मी पळत आत आलो तर अजून उकळी फुटली नव्हती, मी गॅस समोरच उभे रहावे ह्या निर्णयावर आलो व तेथेच उभा राहिलो चहा कडे बघत. तोच मला आठवलं की कुठे तरी हल्दीराम भुजीया आहे डब्यात, ती पण काढू म्हणून मी मागे वळुन डब्बा शोधू लागलो, डब्बा हाती लागताच मागे काही तरी सुं.. सुं... सुं.. झाले ! चहा ने बंड केला होते व काही चहा उकळी बरोबर भांड्यातून बाहेर शेगडी वर पसरला होता.. मी डोक्याला हात लावला व फटाफट गॅस बंद केला व ह्या गडबडीत ओट्यावर ठेवलेला चहापावडरचा डब्बा खाली कोसळला व मी त्याचे झाकण लावले नव्हते हे सांगण्याची काही गरज नसावीच Wink
७.२५ मिनिटे नंतर
मस्त पै़की स्वतः तयार केलेल्या चहाचा घोट घेत मी टिव्ही पाहत बसलो व काही वेळाने ताणून दिली परत....
९.२५ मिनिटे नंतर
मिपा उघडला, माझ्या व्यतिरिक्त नवीन लेखन इत्यादी शोधले काही सापडले नाही Wink सरळ पाककृती विभागात क्लिकलो वमटार-पालक पराठे हा जरा त्यातल्या त्यात सोपा प्रकार निवडा, जेवणासाठी. व कुणाची ही मदत घ्यायची नाही हे ठरवले.
सोपंच आहे, मटार २ वाट्या, पालक २ वाट्या,आल १ पेरा एवढं,लसुण ४ पाकळ्या, मिरची /तिखट आवडीनुसार,मीठ चविनुसार
कणिक अंदाजे, तांदुळाचे पिठ ४ चमचे, पिठ मळुन घेण्यासाठी तेल , पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. बस्स ! जास्त कटकट नाही.. की झंझट नाही.. हा विचार करुन मी हेच करायचं ठरवले.
आधी फ्रिज मध्ये / किचन मध्ये काय काय सामान आहे व नाही आहे ह्याची लिस्ट तयार केली.
मटार - हाजीर.
पालक - हाजीर.
आलं - गैर हाजीर.
लसुण - हाजीर
मीरच्या - हाजीर (लाल / हिरव्या / शिमल्या मिर्च वाल्या पण हाजीर)
तांदुळाचे पिठ - गैर हाजीर
तेल - हाजीर
प्लास्टीक पिशवी :? - सहा पिशव्या हाजीर ( हे कश्याला हा प्रश्न )
म्हणजे आलं व पिठ ह्यांची जुळणा करायला हवी, कॉलीनीतल्या दुकान वाल्याला फोन केला.
मी " आलं है ? "
तो " आलं ?"
मी " स्वारी, अदरक है ? "
तो " है"
मी " १०० गॅम "
तो " आगे "
मी " चावल का आटा है ?"
तो " क्या.. नही है."
मी " तो बस अदरक भेज दे, एफ-३१ में"
तो " क्या साब, मजाक कर रहे हो, १०० ग्रॅम अदरक के लिए किसे भेजू"
त्याच्या ह्या नख-यामुळे मला एका आल्याच्या तुकड्यासाठी दोन साबुण व शॅप्मु विनाकारण घ्यावा लागला.
१०.०५ मिनिटे नंतर
आलं झालं, पिठाचं काय करायचं ? शेवटी डोक्यात आयडीयाची कल्पनेने भरारी घेतली व किचन मध्ये जाऊन तांदळाचा शोध चालू केला, तांदुळ मिळाले पण माझा धक्का लागून चार अंडी ठेवलेला बाऊल खाली पडला व त्याच्या बरोबर अंडी पण.... ! झालं पुन्हा पुसणे साफ सफाई करुन मी, तांदुळ व मिक्सर समोरासमोर बसलो. तांदुळ मिक्सर मध्ये घातले व मिक्सर चालू केला... घर घर घर... चांगले दहा मिनिटे फिरवले व ढक्कण उघडून बघितले तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे झाले होते पण पिठ काय तयार झाले नाही, शेवटी मी मिक्सरचे मॅन्युअल शोधण्याचा प्रयत्न केला व ते बॉक्स मध्येच सापडले. त्यात लिहल्यानुसार मी त्याच्या ब्लेडस बदलल्या व पुन्हा मिक्सी चालू करुन तांदळाचे पिठ निर्माण केले. त्याला ३० % कोणी ही पिठ म्हनून शकेल येवढे ते बारिक जरुर झाले Wink
एक स्टेप पुर्ण केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर दिसू लागला होता.
आता बस तयारी चालू करायची व पराठे तयार !
पाणी उकळायला ठेवले व त्यात मटार + पालक घड्याळ लावून आठ मिनिटे उकळली, व नंतर मिक्सि मध्ये सर्व आयटम जे हाजीर होते त्यांना १० मिनिटे फिरवले.. मस्त पैकी त्याचे पण पिठासारखे बारिक बारिक तुकडे झाले... ब्लेड चेंज करायला विसरलो होतो. तरी हरकत नाही ह्यामुळे काही फरक पडणार नाही हा उच्च विचार करुन मी ते सर्व मिश्रण एका भांड्यात ओतले. व तयार मिश्रणात तांदळाचे पिठ घातले पण किती घालावे ह्यावर गाडी अडली पण मीच अंदाजे सर्व पिठ त्यात ओतले, आता कणिक हा काय आयटम आहे हे डोके खाजवले तरी शेवट पर्यंत मला उमजले नाही त्यामुळे तो आयटमी मी फालतू चा समजला व त्याला लिस्ट मधून बाहेर केला.
पाककृती लेखिकेने / लेखकाने सैलसर मळून घ्या असं लिहले आहे पण सैलसर मळणे म्हणजे काय हे मला उमजले नाही त्यामुळे मी सैलसर चा अर्थ पाणी जास्त पिठ कमी असा घेतला व त्यानुसार मळायला सुरवात केली माझ्या हिशोबाने पाणी जास्त होते पण हळू हळू मळताना पिठ जास्त मजबुत होऊ लागले व पाणी गायब, म्हणून परत पाणी घातले तर ह्यावेळी पाणी जरा जास्तच पडले म्हणून परत जरा पिठ घातले असे करत करत जे दळलेले पिठ होते ते सर्वं संपले.. पण थोडेसे सॉस सारखे पातळ पिठ मळून तयार झाले, ज्याचा रंग हिरवा दिसत होता.
आता प्लास्टिकच्या पिशवीची जुळणा करुन मी ते मिश्रण त्यावर थापले... (थापल्या पेक्षा पसरवले हे योग्य वाटत आहे) गॅस चालू केला, तवा त्यावर ठेवला व पाच एक मिनिटाने तवा गरम झाल्या वर मी ते मिश्रण तव्यावर ठेवले... तोच ती प्लॅस्टिकची फिशवी भसाभास आजूने जळू लागली व एक सहन न होऊ शकणारा दुर्गंध किचन मध्ये पसरला.. मला लक्ष्यात आले की आपण चुकलो आहोत.. मी लगेच गॅस बंद केला एक ग्लास पाणी तव्यावर ओतला, तव्याचा हाल पाहण्या लायक झाला होता, वरचे पराठा मिश्रण खाली पडले व प्लास्टिक सगळे तव्याला चिटकले... मी निराशेने तो तवा बाजूला ठेवला व दुसरा नवीन नॉन्स्टिकचा तवा परत गॅस वर ठेवला... आता मला तेल का हवे ते कळाले.
मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले व त्याला उचलून तव्यावर उलटा केला पण सर्व मिश्रण लोळागोळा होऊन एकाच जागी पडले... मी हळुच उलाथण्याने ते मिश्रण सर्व तव्याभर पसरवले व माझ्या डोक्यात आयडीया चमकली... की पुढील वेळी आपण सरळ तव्याला तेल लावू व त्यावर मिश्रण पसरवू !
मी माझा पहिला स्वनिर्मित पराठा तव्यातून बाहेर काढला व त्याला एका प्लेट मध्ये ठेवला, व दुस-याची तयारी करु लागलो, दुसरा सरळ तव्यावरच पसरवला व तो पकण्याची वाट पाहू लागलो तोच बाजूला प्लेट मध्ये असलेला पराठा मला खुणवत होता.. टेस्ट कर टेस्ट कर पण मी स्वतःला संयमीत करुन उभाच राहीलो पण काही क्षणात संयम सुटला व मी सरळ त्या पराठ्याचा एक
तुकडा तोडून तोंडात टाकला... अरे वा ! मस्त चव. पण जरा कच्चां राहिला असावा असे वाटले पराठा, मी जरा निरखुन पाहीले तर मी पराठा तव्यावर फिरवलाच नव्हता.
१०.४५ मिनिटे नंतर
दोन-तीन पराठे करपल्यामुळे... जळल्यामुळे.. खराब झाले पण त्यानंतरचे दहा-बारा पराठे एकदम व्यवस्थीत झाले, जरा टेस्ट विचित्र होता.. पण ठिक स्वतः तयार केलेल्या आयटम ला का नावे ठेवा.. काही नाही जरा मिठ घालायला विसरलो होतो.. हिरवी कि लाल मिर्च ह्या नादात दोन्ही मिर्च घातली होती त्यामुळे तिखट जाळ झाला होता पराठा पण टेस्टी होता बॉस ! मी जोर लावून दोन पराठे कसे बसे खल्ले ! व किचनचा दरवाजा बंद करुन मस्त पैकी दोन ग्लास मोसंबी ज्युस घेतला व गप्प संगणक चालू करुन मिपा-मिपा खेळू लागलो Wink
चार अंडी, दोन-तीन काचेचे फुटलेले ग्लास, मिक्सर + मिक्सरची सर्व भांडी व ब्लेड्स , सर्व किचन भर पसरलेले सामान, खाली काढून ठेवलेले डब्बे व डझनाने धुण्याची भांडी एक प्लास्टिक जळून चिटकलेला तवा व दहा एक मटार-पालक पराठे चे पराठे मी सतबीर साठी सोडून त्याच्या येण्याची वाट बघू लागलो !
संध्याकाळी ०५.१० मिनिटे नंतर
"हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " - एका पायावर नाचत सतबीर किचन मधून बाहेर येताना मला दिसला व मी लगेच मागच्या दाराने.... बागे कडे सटकलो !
रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर
पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !
***************************************************
* आता सध्या कानाला खडा लावला आहे.. नो प्रयोग @ किचन ! ना बाबा ना !

Monday, December 22, 2014

मामाचे गाव (आत्या आज्जी)

सुट्टीमध्ये आमच्या खूप गमती-जमती चालत असे. वाड्याच्या थोड्याच अंतरावर खाली एक ओढा वाहत असे, भर उन्हाळ्यात फक्त डबक्यात पाणी भरलेले असे व सवर्त्र वाळूचे साम्राज्य पसरलेले. दोन फुट खड्डा जरी हाताने खणला तरी ओलसर वाळू हाताला लागत असे. ओढ्याचा एक मोठा भाग आम्हाला दिसायचा पण जेथून ओढा सुरु होत असे तेथे घनदाट झाडी असल्यामुळे पाणी कोठून येथे हा प्रश्न आमच्या समोर नियमित असायचा. पावसाळ्यात तुडुंब भरलेला ओढा उन्हाळ्यात डबक्यात कसा मावतो याचे उत्तर शोधण्याचे आम्ही आमच्या परीने अनेक प्रयत्न करायचो. मावस बहीणी एकापेक्षा एक शक्कल लढवायच्या, कोणी म्हणायचे वरच्या बाजूला एक राक्षस राहतो तो सगळे पाणी पिऊन टाकतो, कोणी म्हणायचे देव रुसतो म्हणून पाणी बंद करतो. प्रत्येक बहिणीकडे एक ना एक कारण नक्की असायचे सांगण्यासारखे! पण एक दिवस संन्मती म्हणाली की आत्या आजीने पाणी बंद केले आहे, आमचा सर्वांचा एकजात विश्वास बसला व आम्ही सगळे एकसुरात म्हणालो हो हो! तीच असेल पाणी बंद करणारी. वाड्यातील विहीरीच्या मोटाजवळ उभे राहून कोणी किती बालटी पाणी अंघोळीसाठी घेतले व त्याचा हिशोब मांडणारी व्यक्तीच ओढ्याचे पाणी बंद करु शकते यावर आमचा पक्का विश्वास बसला.
ईसावअज्जा च्या तावडीत सापडणारी मुले भल्या पहाटे शेतातील विहीरीवर अंघोळीला जात व राहिलेल्या मुली व घरातील प्रत्येक व्यक्ती वाड्यावरील विहीरीतून पाणी घेऊन अंघोळ करे. पिण्याच्या पाण्याची विहीर असल्यामुळे त्या विहीरीत उतरण्यावर प्रत्येकालाच बंदी होती. आजोबा पण वयोमानानूसार शेतातील विहीर पोहायला जाणे बंद केल्यावर याच विहीरीतील एक-दोन बालटी पाणी घेऊन अंघोळ आवरायचे, कधीमधी आजोबानां जर तिसर्‍या बालटीचा मोह झालाच तर आत्या आज्जी त्यांना पण ओरडायची. आत्या आज्जी कोण ती पाणी घेतं हे पाहण्यासाठी जातीने त्या विहीरीवर पहाटे पासून उभी असायची, आई म्हणते ती उभी असते पण पाटीला आलेल्या वळणामुळे ती आम्हाला कायम वाकलेली दिसायची. उरल्या-सुरल्या पांढर्‍या शुभ्र केसांची जुडी मागे घेतलेली, पुढे असलेले उरलेले दोन दात कायम ती हसत असल्यासारखे दिसत असायचे. मोठा मामा नेहमी म्हणायचा " हीला पांढरी साडी घालून रस्तावर जर रात्री उभी केली तर किमान ३-४ लोक मयत होतील" व खदाखदा हसायचा. तो हसला की घरातले सगळे हसायचे. मग आजोबा हातातील काठी जोरात वाजवायचे व म्हणायचे " ती होती म्हणून तुम्ही सगळे आहात विसरु नका!"
आत्या आज्जीचे सगलेच काही वेगळे होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना आम्ही घाबरायचो ते आजोबा देखील तिला घाबरायचे. काही महत्त्वाचे निर्णय जरी आजोबा घेत असले तरी, आराम खुर्चीवर बसल्या बसल्या आत्या आज्जीला हाताने बोलवायचे व ती जवळ आली की निर्णय सांगून तिला विचारायचे "अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?" मग आत्या आतून खोलवर घळीतुन आलेल्या आवाजात म्हणायची " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!" ही अशी म्हणत असे खरी पण एकादा निर्णय तीला आजोबा सोडून दुसरीकडून समजला रे समजला की हिचा तोंडचा पट्टा चालू होत असे, "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी" इत्यादी इत्यादी. मग घरात जो कोणी येईल जाईल त्याला हे रडगाणे ऐकवायचे. कोणीच मिळाले नाही तर मला किंवा माझ्या बहिणीपैकी कोणाला तरी पकडून दिवसभर तेच तेच सांगत राहयचे हा तिचा स्वभाव. वर जर आजोबा, मामा समजवण्यासाठी गेले तर अगदी लहानपणापासून माझेच कसे वाईट घडले, दुष्काळात तीचे कसे हाल झाले, तीच्या वडिलांनी (आमचे पंजोबा) कसे विहीरीतील पाणी दिले नाही हे रडगाणे चालू होत असे. मध्येच कोणीतरी बाई नकटा आवाज काढून म्हणत असे की "अच्छा, म्हणजे त्याचा बदला म्हणून बाल्टी मोजून पाणी देतेस तर.." हा टोमणा नेहमी प्रमाणे लहान मावशीनेच दिला असायचा, पण आत्या आज्जी चवताळून उठे व मला थोडेफार कन्नड समजते ते कन्नड सोडून अत्यंत कर्शक आवाजात इतके काही बोलत राहयची की शेवटी आजोबा पुढे होऊन तीचे पाय धरायचे.
तिचा राग तिचा त्रागा हळू हळू निवळत असे व ती शेवटी आपल्या खोलीचे दार धाड करून बंद करत असे. थोडावेळ आत राहिल्यावर ती गुपचुपपणे दरवाजा उघडायची व तीचा खास कडी-कुलुप असलेला पितळी डब्बा घेऊन बाहेर येत असे व पहिली हाक मला मारे "राज्या बा इकडे" मी धावतच जात असे, कारण त्या पितळी डब्बात असलेला माझा आवडता तुपातील बेसनचा लाडू सगळ्यात आधी मलाच मिळणार हे मला माहीत असे. डब्ब्यातील दोन लाडू काढून आज्जी माझ्या हातात देत असे व लटक्या रागाने मला सांगायची " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"

>"अक्का, इ विचार इदे, निंद यान मता?"
अक्का, हा विचार आहे, तुझे काय मत आहे?
>> " आप्पा, नी विचार माड, छलु कट्टू नोडू. आंदर नी निर्णय माडिदरे, ना यारू ईल्ल/होंदू माताडाक? इदु यला निंदू!"
"आप्पा, तु विचार कर, चांगले वाईट बघ. म्हणजे निर्णय तुच घे, मी कोण नाही/होय म्हणायला? हे सगळे तुझेच आहे!"
>>> "ना यारू, निव्हरु याक बरतेरी नंग केळाक, सई ताका बरबरी केळाक अंदरे देव्रगि कै मुगित्यानू, ना मन्याग इदइ, रट्टी माड व्हट्याग हाकतेरी, उपकार माडकदेरी"
"मी कोण, तुम्ही का याल मला विचारायला, मरु पर्यंत तरी विचारा, म्हणजे देवाला हात जोडते, मी घरात रहाते, जेवण करुन जेऊ घालता, उपकार करताय"
>> " होगू, आप्पाग वंद कुडू, मत नी वंद त्वगा!"
जा, आप्पाला एक दे, आणि तु एक घे.

Sunday, December 14, 2014

“पडणे” एक कला

दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी पडणे एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे,  तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे. आता तुमच्या लक्षात आले असेच की पडणे या विषयावर बोलण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती या भूतलावर नाही आहे.
काही लोक केळाच्या सालीवरून घसरून पडतात व मी पडलो असे तोंड वर करून सांगतात, अहो पण हे पडणे नाही आहे, हे चुकून केळाच्या सालीने तुमच्या पायाखाली यावे व तुम्ही पडावे एवढी साधी घटना आहे. पडणे एक कला आहे, एक आर्ट आहे. अनेक जण तर उभ्या उभ्या पडतात, का म्हणे तर चक्कर आली. अहो, दिवसभर व्यवस्थीत पाणी ढोसले असते, पोटाला मुठभर अन्न दिले असते तर काय बिशाद तुम्ही चक्कर येऊन पडाल?

पडणे म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही २०-२५ च्या वेगाने धावत जिना उतरत आहात व पाच एक जिने उतरल्यावर तुम्ही एका मोक्याच्या क्षणी उडाण करता व पुढे जिन्यावर पायाचा स्पर्श न होऊ देता तुम्ही शरीराच्या मदतीने बरोबर तळ मजल्यावर येता व लगेच हात झटकत उभे राहून मला काय झाले नाही, असे नाकातून आलेले रक्त शर्टाच्या उजव्या बाहीने फुसत सांगू शकलात म्हणजे तुम्ही योग्य रीतीने पडलात. अनेकदा आपण पडलो हे इतरांना सांगता यावे म्हणून काही महाभाग ठेचकाळले असले तरी किती, जोरात मी पडलो! असे बिनधास्त खोटे बोलून जातात, पण अश्या लोकांच्या मुळे आमच्या सारख्या सतत अभ्यास करून पडणारया लोकांच्यावर मान खाली घालण्याची वेळ येते हे त्यांना कळत नाही. पडण्याचे दुसरे सुंदर उदाहरण म्हणजे वाहन चालवताना पडणे (या विषयावर मी माझा पिय-चडी प्रबंध सादर केला आहे) वाहन चालवताना पडण्याचे अनेक प्रकार आहेत पण नेहमी ज्याचा आनंद घ्यावा म्हणजे वाहन घसरणे!
वाहनावरून घसरून पडणे आणि वाहनासहित घसरून पडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अनेक महाभाग आम्ही पाहिले आहेत जे वाहनावर बसतानाच पडले. मी त्यांच्याबद्दल लिहित नाही आहे, मी वाहनासहित जे पडतात अश्या थोर लोकांच्याबद्दल सांगत आहे.  तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) गाडी योग्य जागी आली म्हणजे काहीतरी गाढवपणा करावा, उदा. उगाच पुढील ब्रेक मारणे, समोर रस्तावर खडी दिसत असली तरी वेग वाढवणे, समोरचा खड्डा आपल्याकडे पाहून खदाखदा हसतो आहे व आपण त्याला टाळू शकत नाही हे माहिती असून देखील टाळण्याचा प्रयत्न करणे, एकादी सुंदरी बाजूने जात असेल तर तिचा चेहरा पाहण्याचा निरर्थक प्रयत्न करणे, तीव्र उतार असेल तर झिगझ्याग पद्धतीने उगाच गाडीचा वेग वाढवत जाणे.. इत्यादी इत्यादी.  आता यातील कोणताही एक गाढवपणा केला कि तुम्ही सहजपणे पडू शकता. लगेच पडता येत नाही, थोडा अभ्यास करावा लागतो, पण जमेल. अजून एक वाहनाची दोन्ही चाके वर झाली व तुम्हाला कोणी थोबाडावर पाणी मारून उठवले म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पडला नाहीत हे समजून घ्या व पुढील वेळी दक्ष रहा.
जेव्हा आपण वाहनावरून पडत असू, तेव्हा शरीराचा धरणी सोबत होणारा प्रत्येक स्पर्श आणि स्पर्श तुम्हाला जाणवलाच पाहिले, जेव्हा धरणीमाते चरणी  तुमचे डोके तुम्ही ३-४ दा ठेवाल तर तो सुखद स्पर्श तुमच्या आंतरमनात नाहीतर किमान खोपडीवर कोरला जायलाच हवा. पडताना आपले पाय, आपले हात, आपली उरलेली सर्व हाडे कुठे कुठे आहेत याचा अंदाज तुम्हाला असायलाच हवा जेणे करून नंतर डॉक्टरने एखादे हाड गायब केले तर तुम्हाला समजू शकेल. याचे जिवंत उदा. मीच आहे, मी एक उच्च कोटीची पडण्याची कला दाखवली होती, पायातील हाड बाहेर आलेले मी याची देही-याची डोळे पाहिले होते पण नंतर डॉक्टरने बील दिले कि पायाचे हाड सापडले नाही म्हणून रॉड घातला. तर आपल्या सर्व हाडांची दक्षता घ्या आणि हो, तुम्ही पडलेले आहात, बरं तुम्ही एकटे पडलेले नाही आहात, तुमचे वाहन.. ह्या ह्या ह्या..  विसरला काय राव!!!!  तर ते वाहन एकतर तुमच्या पुढून घसरत असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण ते मागू घसरत येत असेल तरी काळजी करू नका, जे घडणार ते घडणार.  मग थोड्यावेळाने सर्वकाही थांबेल,  म्हणजे तुम्ही, तुमचे वाहन, मागचे ट्राफिक! घाबरून जायचे नाही, सावकाश हसत हसत उठायचे, हसणे मस्ट आहे, कारण तुमचे नाक तुटले असेल, किंवा बत्तीस पैकी काही शिल्लेदार तोंड सोडून गेले असतील, गालावर कुठे लागले असेल तर लगेच जाणवते. मग हळूच पाय हालवून पहा, पाय घालला, म्हणे तुम्ही हालवल्यावर हालला तर ओके, पण आपोआप लुडकला असेल तर जयपूर फुट स्वस्त झाले आहेत काळजी नसावी. पाय सलामत असतील तर हात हालवून पहा, मग मान, मग पार्श्वभाग..  दुखत तर सर्वत्र असेल पण कळ येत असतील तर तुम्ही पुन्हा पडण्यास सज्ज आहात.. याची मी खात्री देतो.


·         नेहमी डोक्यावर हेल्मेटची सवय ठेवा, मी अनेक वेळा त्याचमुळे वाचलो आहे. आणि वाहन काळजीने, काळजीपूर्वक चालवा  (आता मीच ३ दिवसापूर्वी पडलो, लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच जागेवर अजून जोरात पडण्याचा पराक्रम केला आहे, शक्यतो हे विश्वरेकोर्ड माझ्या नावानेच लागेल. तरी घ्या मनावर आणि सुरक्षित रहा!)



Wednesday, December 3, 2014

मामाचे गाव - तात्या

लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे. सकाळची न्याहारी मी सोबत घेतली व शेताकडे निघालो.
आमच्या कोल्हापुर व हे गाव यात जमी-आस्मानचे अंतर होते, इकडे सर्वत्र, अगदी नजर जाईल तेथे पर्यंत शेती पसरली होती. वीतभर रुंद व शेताच्या शेवटपर्यत असलेला बांध म्हणजे शेताच्या या व त्या तुकड्याचा मालक कोण? याची साक्ष देण्यास सक्षम होता. पावलोपावली वडाची, अंब्याची, जांभळ्याची, आवळ्याची झाडे पसरलेली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला साथ देणारी बोरी-बाभळीची रांग! कुणाच्या शेतात सहस्त्र हस्त पसरून आकाशाकडे वरदान मागत असलेला वड व त्याच्या बुंध्याजवळ वाटसरूसाठी ठेवलेली पाण्याची मडकी. खावीशी वाटली म्हणून कोणाच्यातरी शेतातून एकादं वाळूक तोडलं तर समोरचा आवाज द्यायचा "ए, हुडगा, इकडे बा. इकडू त्वगा. आऊ स्वल्प संन ईदे." अशी आवभगत असे. पहिली पन्नास शेती ओळखीची होती.. आपलीच होती. त्यामूळे भय नव्हते, पण तसेही भिण्याचे कारण देखील नव्हते. गावातल्या इतर लोकांच्या शेतात जरी पाय ठेवला तरी कोणी नाही म्हणणार नक्की नव्हते. पण मावशी नेहमी सांगे, आपल्याच हद्दीत फिरत रहा, दुसऱ्यांच्या जमिनीला, पिकाला त्रास न होईल याची काळजी घे.
दूरवर ७-८ अंब्याच्या झाडांचा हिरवागार परिसर दिसला एखाद्या शेतात तर ते आपले शेत! माझ्या मावशीचे शेत. त्या झाडांच्या सावलीमध्ये एक लहानशी झोपडी आहे, अगदी मला हवी तशी. त्यात सिझन असेलतर भरपूर कच्चे आंबे रचून ठेवलेले असायचे की, त्याचा वास फर्लांगभर आधीच नाकात घमघमत असे. झोपडीवर भोपळ्याची हिरवीगार वेल पसरलेली आणि बाजूला उजवीकडे मावशीच्या आवडत्या म्हशी बांधलेल्या असत. मावशीच्या आवडत्या, कारण त्यांना फक्त मावशीने दुध काढलेले चालत असे, अगदी तात्याजरी गेला, तरी त्या उच्छाद मांडत. डावीकडे सरपण गोळाकरून रचून ठेवलेले. तेथेच तात्यांचा दुपारी झोप घेण्यासाठी ठेवलेला जुना लोखंडी कॉट, तो मस्त पैकी कर कर आवाज करायचा, त्याचा आवाज आला की म्हशी फेंद्ररायच्या!
तात्याला मी सकाळी घरी कधी पाहिलाच नाही, तो भल्यापहाटे उठून शेतात जात असे. आणि शेतात गेला नसेल तर गावात कोणाच्यातरी मदतीला गेला असे. तो घरात का नसतो या पेक्षा तो घरात कधी असतो हा प्रश्न मला पडत असे. आख्या गावात तात्या, मजलेअण्णा म्हणून प्रसिद्ध होता. आजोबांच्या सारखाच पांढरा सदरा, पांढरे धोतर, हातात त्या धोतराचे टोक. फरक होता तो मिश्यामध्ये. तात्यांच्या मिश्या भारदस्त! अगदी ते सतत दोन्ही टोकांना पीळ देत असत, अगदी काम करत असले तरी!
पण, शेतात काम करत असले की त्यांचा अवतार बघण्यासारखा असे. अंगावर बंडी, डोक्याला मुंडासे, धोतर गुडघ्यापर्यतवर घेऊन मागे खोचलेले. आपले पिळदार दंड दाखवत ते शेताला पाणी पाजत आणि मध्येच जोरजोरात ओरडत असत "हो....हो... हुर्ये.....हो... हुर्ये...हो" ते असे ओरडले की मला जाम मज्जा येत असे, कारण एक साथ कितीतरी पक्षी एकदम जमिनीवरून आकाशात झेप घेत. मी झोपडीजवळ पोचलो की, शिदोरी आत ठेवून देत असे, व ते जेथे काम करत असतील तिकडे जाण्यास निघत असे. ते तिकडूनच आवाज देत व मला म्हणत "राज्या, मग्ना! निंगू दौड बराक यान आते? यावंद हादी नोडते इदेऊन ना. बा मरी" मी आपला पाटातून वाहत असलेल्या पाण्यावर छप-छप आवाज येण्यासाठी उड्या मारत त्यांच्या जवळ पोचलो की, कुठून तरी आणलेला एखादा लाल पेरू, कधी चिंचा, इलायती चिंचा हातात देत व म्हणत "आईतू, नडी इष्ट नीर बिडत्यानू."
तात्यांचे शेताला पाणी पाजणे हे न संपणारे काम असे, तरी देखील कुठेतरी एक मोठा पाट सोडून ते त्याच वाहत्या पाण्यात आपले हात, पाय, तोंड धूत व कधी मस्तीत असले की झप करून पाटातील पाणी माझ्यावर उडवत. मी इकडे तिकडे पळू लागलो तर मात्र एकदम मला थांबवायचे, कारण आताच कुठे बियाणे शेतात पेरलेली असतं. मग माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्यासोबत झोपडीकडे चालू लागत. मग जाताना त्यांचा संवाद फक्त शेताबरोबर चालू असे. किती बियाणे घातले, किती पाट भिजले, किती राहिले, येणार कधी, देणार कधी. काही ना काही त्यांचे हिशोब चालू असतं. पण मी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता, पाटातील पाण्यातून चालण्याचा, पाणी उडवण्याचा आनंद घेत रमत-गमत चालत असे. झोपडीजवळ आल्यावर तात्या निवांतपणे आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसत व नेहमी बसताना दक्षता घेत असावेत की आपली पाठ शेताकडे नको, कारण मी जेव्हा पण पाहिले तेव्हा त्यांचे तोंड नेहमी शेताकडे व समोर मला बसवत.
न्याहारीमध्ये भाकरी, भाजी, तोंडी लावायला ठेचा आणि दही. हे हवेच हवे. यातील काही विसरले तर ते मला 100% परत पायपीट करायला लावतील एवढी खात्री होती. पण एकदा मन लावून न्याहारी चालू झाली की मग मात्र तात्या जग विसरत. पूर्ण लक्ष अन्नावर. खूपच इच्छा झाली तर मला झोपडीतून एखादा कच्चा अंबा घेऊन ये म्हणून सांगायचे पण न्याहारी मनासारखी जमलेली असेल तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर घासागणिक आनंद दिसत असे, आणि हा आनंद मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला होता, अगदी कारल्याची भाजी असताना देखील.
न्याहारी झाली की, तात्या आपल्या कॉटवर बसायचे व बंडीच्या भल्या मोठ्या खिश्यातून एक अडकित्ता बाहेर काढायचे, एक सुपारीचे खांड आणि करकर त्याचे बारीक तुकडे करून तोंडात टाकायचे, मग परत खिश्यात हात घालून एक पान बाहेर काढायचे, नंतर स्टीलची चुन्याची डब्बी.. अंगठ्याच्या नखाने थोडा चुना काढून त्या पानाला लावायचे व ते पान दुमडून खाऊन टाकायचे. मग परत खिश्यातून एक लहानशी पितळी डब्बी काढायचे त्यातील तंबाखू काढून आपल्या डाव्या हातात घेऊन, चांगले मळून आपल्या तोंडात टाकायचे. हा सगळा कार्यक्रम चांगला ५-१० मिनिटे चालायचा. पण ते असे पान फक्त येथे शेतावर खात असावेत, कारण आजोबांच्या समोर आजोबा हातात देतील तसे पान घेऊन गुपचूप तोंडात टाकत. आजोबांचे नाव जरी कोणी घेतले की ते उजव्या हाताने एकदा छातीवर हात ठेवत व डोळे मोठे करून म्हणत "देव रे!" यावरून मला हे समजले होते की ते आजोबांना जाम घाबरत. पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत.
क्रमश:
*राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि! - राज्या, जेवण कर, आणि एक काम कर बाळा!
*ए, हुडगा, इकडे बा. इकडू त्वगा. आऊ स्वल्प संन ईदे. - ए, मुला, इकडे ये, इकडून घे. ते अजून लहान/कच्चे आहेत.
*राज्या, मग्ना! निंगू दौड बराक यान आते? यावंद हादी नोडते इदेऊन ना. बा मरी - राज्या, लेका! तुला लवकर यायला काय झाले? केव्हा पासून वाट पाहतो आहे ना मी. ये मुला.
*आईतू, नडी इष्ट नीर बिडत्यानू - झाले, चाल, एवढे पाणी सोडतो.

Tuesday, December 2, 2014

मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२

इसावअज्जा मला शेतात घेऊन जेव्हा जात असे तेव्हा खरी मज्जा येत असे. मी विचारलेल्या एक आणि एक प्रश्नाला खरी-खोटी जशी समजतील तशी इसावअज्जा उत्तर देत असे. मग पेरु हिरवाच का? प्रश्नाचे उत्तर पानांचा रंग लागतो ना म्हणून हिरवा. विहीर गोल का? तांबे, पेले, वाट्या, घागरीची तोंड गोल असतात म्हणून विहीरीचे तोंड गोल. नाना प्रश्न ना ना उत्तरे.
आजोबांच्या दुरवर परसलेल्या उसाच्या वाडीत एका कोपर्‍यात एक कौलारु बैठ घर. मातीच्या भिंती, दोन खोल्या. त्यावेळी लाईट नसायची आमच्याकडे. लाईट फक्त शेताला पाणी द्यायचे असायचे तेव्हाच येते असं इसावअज्जा सांगायचा. आतल्या खोलीत काहीबाही सामान भरुन ठेवलेले असायचे. मला त्या खोलीची खुप उत्सुकता लागून राहलेली असे, कारण आत हजारो गोष्टी भरुन ठेवलेल्या होत्या व त्या सगळ्या मला हव्या होत्या. त्यात जूने पणतीचे दिवे होते, कंदिल होते, वेगवेगळी अवजारे होती व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वरच्या मोठ्या तुळईवरच्या खिळ्यावर काही पतंग लटकलेले होते. इसावअज्जा माझे भले किती लाड करत असे पण त्या खोलीकडे मला जाऊ देत नसे. मी मागे ते देत असे पण ते पतंग देत नसे. तरी मी खुष होतो, इसावअज्जा माझा फुगलेला चेहरा व मला ती खोली का पाहू देत नाही या रागामुळे लाल झालेला नाकाचा शेंडा पाहून लगेच खास लपवून ठेवलेले लाल पेरु विळत्यावर कापून माझ्या समोर धरत असे. त्याला माहीती होते एकवेळ मी आंबा नको म्हणेन रागात पण लाल पेरुला कधीच नाही म्हणणार नाही.
त्या घराच्या बाहेरच्या खोलीत मात्र मला मनसोक्त दंगा घालण्याचा मुभा होता, ज्वारीची पोती आणि पोती भरलेल्या त्या खोलीत काय नव्हते? पोत्यांची घसरगुंडी होती, दगडी दोन दोन जाती होती, भली मोठी वजन तांगडी होती व सगळ्यात महत्वाचे तेथे मोठा, खूप मोठा म्हणजे मी व माझ्या सगळया बहिणी त्यात बसतील असा एक मोठा लाकडी झोपाळा होता. मी त्यावर पुर्ण झोपलो तरी दोन्ही बाजुला व उजवीकडे डावीकडे खूप म्हणजे खूप जागा राहत असे. मी माझे दोन्ही हात, दोन्ही पाय फैलावून त्यावर झोपलो तरी त्यावर तरीही खूप जागा राहत असे.
इसावअज्जा समोर लाकडी आराम खुर्चीवर बसून कडदोर्‍याला बांधलेली चंची काढून, त्यातून पान, चूना, तंबाखु व कात काढून माझा चाललेला दंगा बघत, गालातल्या गालात हसत पान तयार करून घेत. जर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले की मी पानासाठी हट्ट धरणार हे त्यांना माहीती असायचे मग ते हळून एक कोवळे इटुकले पानं काढत व पान करण्याची सगळी साग्रसंगीत अवलंबून ते चुन्याच्या जागी पाणी लावलेले, तंबाखुच्या जागी चार बडिसोफाच्या गोळ्या घातलेले पान मला देत. मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघू, मी बाहेर पडण्यासाठी पुढे झालो की इसावअज्जा प्रत्येक भिंतीवर प्रदक्षिणा घालताना जसा हात भिंतीवर ठेऊन चालतात तसे चालत घराच्या चारी कोपर्‍यातून दरवाजाकडे येत असे. तो पर्यंत मी समोर असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावर हुडदंग चालू केलेला असे व इसावअज्जा माझ्यावर डाफरत म्हणे "कन्नगं मन्न होईत नोडू (डोळ्यात माती गेली बघ!)" असे म्हणून डोळे धोतराने पुसत असे. मग ते न बोलता पुढे पुढे निघत व मी त्यांच्या मागे मागे.
तुळतुळीत डोक्याचे, खुप उंच असलेले, नेहमी धोतर नेसणारे, सदरा न घालता फक्त पंचा खांद्यावर बाळगणारे हे इसावअज्जा म्हणे गांधीजींचे भक्त होते पण ते असे पुढे पुढे चालत असले की त्यांच्या हलणार्‍या सावलीतून त्यांच्या मागे मागे जाण्यात मला खूप आनंद मिळत असे. ते जरा खुषीत असले की स्तोत्र इत्यादी म्हणत रमत-गमत चालायचे व मी ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी त्यांच्या मागे-पुढे पळापळ करायचो. आमची ही दांडीयात्रा घरी पोहचू पर्यंत संध्याकाळ झालेली असायची. अंधार पडायच्या आत इसावअज्जा पडवीतील दिवे लावण्याच्या कामी लागायचा व मी आज काय मज्जा केली हे सांगायला माजघराकडे पळायचो.
असेच एकदा आम्ही शेतातून परत आल्यावर कट्यावरील आपल्या वेताच्या आराम खुर्चीत डुलत बसलेल्या आजोबांनी इसावअज्जाला आपल्याकडे बोलवले. इसावअज्जा व आजोबा खूप वेळ बोलत बसले, मी खाऊ खाऊन आलो तरी ते बोलत होते, मी वर जाऊन आक्काशी भांडून आलो तरी बोलत होते, जेवणासाठी पंगत बसली तरी ते बोलत होते. रोज पंगतीत होणारा थोडाफार हास्य विनोद थांबला होता, सगळे मोठे गंभीर चेहर्‍याने जेवत होते व आम्ही लहान मंडळी बावरुन गप्प मऊ भात गिळत होतो. अचानक फुटलेल्या एका हुंदक्यामुळे मी बावरुन इकडे तिकडे पाहिले मोठी मामी, सन्न मामी, सदलगा मामी, लहान माऊशी, मोठी माऊशी, बेळगावची काकी व एकोंडीची काकी तोंडात पदर घेऊन रडत होत्या व सोबत जेवत होत्या. शेजारी बसलेली आई हुंदके देत होती व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होती. मोठी लोक भुतकाळात गेली होती व लहान मंडळी मोठ्यांचा हा वेगळाच अवतार पाहून डोळ्यात आलेले पाणी थोपवून एकमेकांच्याकडे पाहत आधी कोण रडण्याची सुरवात करतो हे पहात होती.
"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल." आजोबा थोडे जोरातच बोलले. भरल्या ताटात हात धूऊन माझ्याकडे भरल्या डोळ्याने बघत इसावअज्जा पंगतीतून उठले. पंगत संपली. काय झाले? हा प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर घेऊन बालचूम अंगणात जेथे झोपायचे होते त्या त्या जागेवर जाऊन बसले. दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीमध्ये आजोबा दोन्ही हात मागे बांधून करारी चेहर्‍याने शतपावली करत होते, स्वयंपाक घरातून भांड्याच्या आवाजासोबतच खुसफुस चाललेली कळत होती पण समजत मात्र काहीच नव्हते. मात्र रात्री झोपण्याच्या वेळेस उलगडा झाला.. तो मोठे मामा व एकोंडीच्या काकीच्या बोलण्यातून.
चुलीत भडकलेली आग, त्यात इसावअज्जा च्या बायकोने घेतलेला पेट व त्या गोंधळात आपल्याच तान्हा मुलाला पाळण्यातून काढण्याच्या तीचा प्रयत्न.. सगळेच संपलेले होते. शेतावर असलेले इसावअज्जा व कामगार तेथे पोहचू पर्यंत कोळसा झालेला होता दोघांचा.. पेटल्या घराची आग सगळ्यांनी मिळून विजवली पण इसावअज्जा चे ते पेटलेले घर काय त्यांच्या मनातून विजले नाही. माजघराच्या दोन पाऊले समोर असलेल्या विहीरीत जर पेटलेल्या बायकोने उडी मारली असती तर सगळे नीट झाले असते असे इसावअज्जाला नेहमी वाटतं असे. पण त्यांच्या बायकोला पोहता येत नव्हतं!
या गोष्टीला अनेक वर्ष झाली, जखमावर खपली चढली, शेतातलं घर सोडून आमच्या आजोबांच्या घरी इसावअज्जा राहण्यासाठी आला कायमचा, त्या वर्षी जन्मलेल्या मुलीच्या पोटी अनेक वर्षानी मुलगा झाला. दोन्ही आजोळ मुलींनी फुलले असताना कोणाच्या ध्यानीमनी नसतात ना! सगळेच आनंदले पण सर्वात जास्त आनंद कोणाला झाला तर इसावअज्जाला कारण त्याच्या त्या तान्हामुलाच्या उजव्या ओठावर पण म्हणे तीळ होता...
क्रमशः

Sunday, November 30, 2014

मामाचं गाव (इसावअज्जा)

"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे."
मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते.. चला मामाच्या गावी!
मामाच्या गावाला जायचे,
आंब्याच्या झाडावर घर बांधायचे..
विहीरीवर अंघोळीला जायचे,
तेव्हा थोडे पेरु चोरायचे...
असली अफाट कल्पना घेऊन पोहचलेला आपला भाचा पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न काय तर "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." अरे कसा आहेस विचार, गाल-गुच्चा घे, मामासाठी काय आणलं आमच्या राज्यानं असे बोबड्या भाषेत विचार! पण नाही "राखुंड्या" मास्तरासारखा पहिला प्रश्न अभ्यास नाही तर मार्काचा... पहिले काही दिवस बोंबलून सांगावे असे वाटत असेल मला की लेको.... तुमच्या कर्नाटकात आमच्या पेक्षा आधी २०-२५ दिवस निकाल लागतो रे.. आम्ही घरी गेल्यावर माझा निकाल कळेल.. पण कोण ऐकून घेईल तर शपथ!
तर गावच्या सुट्टीची सुरवात! त्यात मी नवसाचा.. एकुलता एक मुलगा जवळपास २०-२५ घरात (पाहुण्यांच्यात) कोणाच्या पण घरी गेला की पहिला प्रश्न ठरलेला "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मी घरातून का पळून गेलो या प्रश्नाचे हे उत्तर नसेल ही पण कुठल्या पाहूण्याच्या घरी कधीच न जाण्याचा संकल्प करण्याचे हेच नक्की कारण होते.
या लोकांना काय असुरी आनंद मिळत असावा असले प्रश्न पोरांना विचारून देवाकं ठावूक!
मामाचा वाडा त्यावेळी खूपच मोठा असल्यामुळे व आजोबा वृद्ध असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात त्यांना भेटायला व सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेच आजोळी यायचे, १६-१७ बहिणी (मावस, आत्ते इ. + सक्की एक) व त्यांच्या आया-बाबा आणि अनेक लांबचे पाहुणे एकावेळी त्या वाड्यावर हजर असतं! खाण्यात रेलचेल असे, पहाटे पहाटे पेटलेली चुल, आम्ही सर्व अंगणात झोपल्यावर रात्री कधी तरी चर्र असा आवाज करीत शांत होत असे. पहाटे पहाटे जाग यायची ती आजोबाच्या हाकेने. माझे दुदैव येवढे की एकुलता एक मुलगा असल्यामुळे सकाळचा शंख माझ्या नावानेच होत असे.. आजोबा मुलींना चुकून ही काही बोलत नसतं, हा त्यांना प्रेमाने खाऊ घाल, सगळ्यांना गोळा करून गोष्टी सांग, स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव आंदोलनात कशी इंग्रजाची पळतीभूई केली व नंतर कसा मार खल्ला या प्रामुख्याने गोष्टी.
मी आपला बापुडा त्या गोष्टी ऐकण्यासाठी तेथे जाऊन बसावे तोच शेतातील काम संपवून आलेला मामा कडाडत असे "राज्या! लेका बायकांच्यात काय बसला आहेस, बायल्या कुठला!, जा गोठ्यात रम्याला मदत कर" झाले सगळ्या मुली फिदीफिदी हसणार व माझा रंग उडणार हे ठरलेले. रडत आईकडे तक्रार घेऊन स्वयंपाक घरात जावे तर कोणीतरी माउशी, मामी, आत्या, काकी म्हणायची "या राज्याला आईविना करमत नाही, यामुळेच बायकांमध्ये लुडबुड करायची सवय." व तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत. मोठ्याने हसल्या की बाहेरून आजोबांच्या काठीचा आवाज येणार हे नक्की.
बरं या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणात यावे तोच लहान मामा "राज्या! घराबाहेर पाय टाकलस तर बघ. तंगडे तोडेन." बर त्याचे ऐकून गप्प परसबागेकडे जावे तर लगेच सन्नतात्या (लहान आजोबा आमचे) लगेच "राज्या! आकडे नी काल इड, निंद काल तगद् निंन कयागं उडत्यान नोड!" बोंबललं, मायला पुढून घरातून बाहेर पडायचे तर लहान मामा पाय तोडायला तयार व परसबागेत जावे तर ज्याने बाग (बाग कसली, रोजच्या भाज्या लावलेल्या) लावली तो पाय तोडून हातात देण्याची भाषा करतो. काय करावे काय करावे असले प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर मिरवत मी इकडे तिकडे भटकत असलो तर एखादी ताई-आक्का हमखास म्हणायची.."नोड.. हुंब ईदे इद" (बघ, वेंधळाच आहे हा) असे म्हणून परत फिदीफिदी हसायच्या.
शेवटी मी वैताग वैताग करुन इसावअज्जा च्या रुमकडे वळत असे.
इसावअज्जा= पोहायला शिकवणारे आजोबा, हेच नाव त्यांचे गावभर नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, या आजोबांनी एका आणि एक पोराला/मुलीला पोहायला आलेच पाहिजे असा चंग बांधला होता. हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी. पोरांना पोहायला शिकवले तर घरचे गहू-तांदुळ द्यायचे, कोणी फारच उदार असेल कधी कधी पैसे देखील. मला आज देखील ते आठवतात ते त्यांच्या दंतपंगतीहिन हास्यामुळे. त्यांचे नक्की वय किती आहे याची चर्चा रात्री अंगणात घरचे सगळे झाडून जेव्हा झोपायला गोळा होत तेव्हा वडीलधारी मंडळी करत म्हणजे पहा किती वय असेल त्यांचे. अज्जा-इसावअज्जा असे सगळेच म्हणत त्यामुळे त्यांचे नाव काय असावे याची चर्चा आम्हां लहान मंडळीमध्ये होत असे, त्याचे कारण म्हणजे मोठा मामा लहान होता तेव्हा त्याने धाडस करुन त्यांना नाव विचारले होते म्हणे व त्यांनी मामाला उचलून २०-२५ फुट खोल असलेल्या विहरीमध्ये फेकलं होते.. अश्या अनेक दंतकथा त्यांच्या बद्दल होत्या. पण मामाला त्यांनी उचलून विहीरीत फेकले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला असलाच पाहीजे.
इसावअज्जा व माझे जरा बरं जुळत होते (परवा परवा माझी मोठी मामेबहीण मला सांगत होती, ते जेव्हा आजारी पडले व त्यांचे शेवटचे काही क्षण राहीले होते तेव्हा त्यांनी जुन्याकाळात जमणार्‍या गोतावळ्याची आठवण काढली होती व तु हरवला आहेस हे ऐकून ढसाढसा रडले होते.) इसावअज्जा मला त्याच्याकडे असलेल्या ठेवणीतील गोष्टी दाखवत असे. त्याच्या पत्र्याच्या पेटीत खूप काही अमुल्य असे दडलेले होते, त्या पेटीला एक सोडून दोन दोन कुलपे होती व त्याच्या चाव्या इसावअज्जा नेहमी जानव्यात अडकवून ठेवी. जेव्हा जवळपास कोणी नसेल तेव्हा तो ती पेटी उघडून बसलेला असे. त्या पेटीमध्ये काय आहे याची जेवढी उत्सुकता त्याबालसुलभ वयात मला होती तेवढीच थोरामोठ्यांना देखील होती हे आता-आता कळले. त्यांनी ते विश्व इतरांच्यापासून जरा जास्तच लपवून ठेवले होते.
इसावअज्जा माझ्यावर न जाणे का पण खूप प्रेम करायचा, अनेकवेळा इतरांपासून लपवून खाऊ देण्यापासून, प्रसंगी आजोबांचा रोष अंगावर घेऊन मला शेतात मनसोक्त दंगा घालण्यासाठी घेऊन जात असे. पोहणे शिवण्याच्यावेळी प्रसंगी मुलींना देखील उचलुन विहीरीत फेकणारा हा आजोबा मला मात्र पत्र्याचा (डालड्याचा डब्बा) किंवा लाकडाची मोळ बांधल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकू देत नसे किंवा त्यांनी मला कधीच आधाराविना पाण्यात जाऊच दिले नाही.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!
क्रमशः

Friday, November 28, 2014

मामाचं गाव (आजोबा)

वाड्याबाहेरील जग सुट्टीमध्ये फक्त कोणी मोठं सोबत असेल तरच पाहता यायचे एवढे कडक निर्बंध लहान मुलांच्यावर होते. रोज संध्याकाळी व्हासा झाल्यावर आजोबा आपली छडी घेऊन बाहेर पडत. ती छडी म्हणे त्यांनी पार्श्वनाथजीला* जाऊन ११ वेळा भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले म्हणून तेथील महाराजांनी भेट दिली होती. आजोबा वाड्यातून बाहेर पडायला लागले की जे कोणी लहान जवळ असेल, मग अक्का असो, सन्मती असो, सरु असो की मी असो. त्यातील एकाला सोबत घेऊन जात. त्यांचा हा रिवाज माहीत असल्यामुळे ते व्हासा करायला बसले की मी त्यावेळे पासून ते बाहेर पडण्यासाठी मोठ्या दरवाजाजवळ येवू पर्यंत मी त्या दरवाज्या जवळच घुटमळत असे. त्यामुळे ९९% मीच त्यांच्या सोबत बाहेर पडत असे.
डोक्यावर गांधी टोपी, डोळ्यावर काळी फ्रेम असलेला चष्मा, पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच स्वच्छ पांढरे धोतर, हातात छडी, सदर्‍याच्या डाव्या खिश्यात साखळीवाले घड्याळ व एका हातात धोतराचे टोक. आजोबा जरी म्हातारे असले तरी त्यांनी गावातील व्यायामशाळेत दणकून व्यायाम करुन व जेवणानंतर शतपावली वर्षानू वर्ष करून आपले शरीर पिळदार ठेवले होते. मामा सांगायचा जेव्हा तो लहान होता तेव्हा आजोबा जोर मारायचे व हा मोजायचा. दंडबैठका मध्ये तर आजोबाचा हाथ धरणारा कोणी नव्हता त्या व्यायाम शाळेत. आजोबा जर आनंदात असले तर दर्शनमात्रे मधील श्लोक गुणगुणत जायचे व मध्येच मला कधीतरी नमोकार मंत्र म्हण रे, नाही तर चल २४ तिर्थंकरांची नावे सांग पाहू ते पण क्रमाने. असाले प्रश्न विचारून मला कोंडीत पकडायचे. अश्यावेळी काय करायचे हे माझं ठरलेले असायचे, गपचूप नमोकार मंत्र म्हणायचे व तीन वेळा म्हणून गप्प बसायचे, कारण आजोबा बाहेर पडले आहेत म्हणजे गावातील जाणकार व मोठी लोक त्याच वेळी घरातून बाहेर पडलेली असायचीच. त्यामुळे कोणी ना कोणी भेटायचे व मुळ मुद्दा बाजूला पडायचा.
गावातील मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर ही सगळी म्हातारी लोक जमा होत व गप्पा मारत, सगळा विषय शेती, पाणी, पाऊस व गुरे यावर फिरत असे. पाराच्या समोर गुलाबमामाचे पानाचे दुकान होते, त्याच्या दुकानात काचेच्या बरण्यामध्ये लाल गोळ्या ठेवलेल्या मला लांबून पण दिसायच्या व मी आजोबांना फक्त एवढेच विचारायचो "आप्प्पा, गुलाबमामा!" डोक्यावर टपली मारुन आजोबा हसायचे व जा असे मानेने सांगायचे. गुलाबमामा मुसलमान, आमच्या वाड्याच्या गल्लीत एका टोकाला त्यांचे घर होते, ते रोज वाड्या समोरुन येता जाता दोन्ही हात वर जोडून "नमस्कार री" असे जोराने म्हणून पुढे निघून जायचे. त्यांचा तो नमस्कार कोणाला असे हे मला कधी कळले नाही, कारण दरवाज्यावर कोणी असले नसले, दरवाजा उघडा असला नसला तरी त्या नमस्कारात खंड असलेला मला तरी आठवत नाही. गुलाबमामाच्या दुकाना समोर गेल्या गेल्या गुलाबमामा हसून स्वागत करायचा व म्हणायचा "बररी सावकार! लाल गुळगी बेकू?" मी हसून हात पुढे केला की पटापट २-३ गोळ्या हात ठेवायचा व मी लगेच धूम ठोकून आजोबांच्याकडे पळायचो.
मी पारावर पोचू पर्यंत आजोबा निघायच्या तयारीत उभे राहायचे, डोक्यावरील टोपी नीट करायचे, खिश्यातील घड्याळ काढून वेळ बघायचे, धोतराचे टोक एका हातात व छडी जमीनीवर दोनदा आपटून "नडीर, बरतेव!" म्हणायचे व सरळ चालायला सुरवात करायचे, मागू बाकीचे "बररी सावकार" म्हणायचे पण आजोबा तिकडे लक्ष न देता सरळ बस्तीकडे चालु लागायचे. बस्तीत पोचल्या पोचल्या आतून पुजारी जवळ जवळ धावत यायचे, बाजूच्या विहीरीतून एक बादली पाणी मोटीने काढून तेथे उभे रहायचे. मग आजोबा त्यातील पाण्याने पाय धुवायचे, चेहर्‍यावर थोडे पाणी शिंपडायचे व मानस्तंभाकडे चालू लागायचे. मी पटापट आजोबानी जे जे केले ते सगळे करायचो व धावत पळत त्यांच्या मागे जाउन उभा राहत असे. मानस्तंभाचा पहिला भाग जो जमिनीकडून वर जातो तो माझ्या उंच पेक्षा पण उंच होता व ते मला माहीती होते तरी त्या भागावर चढण्याची माझी नेहमी धडपड असे, कारण येणारा प्रत्येक भाविक तेथे मनूके, बदाम व तांदूळ वाहत असे, तांदूळ मध्ये मला रस नव्हता पण मनूके व बदाम हवे असायचे. आजोबा माझी धडपड बघायचे व छडीने पार्श्वभावर हलकासा मार देऊन मुख्य मंदिराकडे जायचे. मागू आलेले पुजारी पटकन मला उचलायचे व मी हातात येतील तेवढे मनुके व बदाम गोळा करत असे, तोच आतून आजोबा बोलवायचे.
बस्तीमध्ये असे धीरगंभीर होऊन बसलेले आजोबा, समोर पार्श्वनाथ स्वामी तसेच पद्मासनात स्मित करत बसलेले, उजवीकडे कोपर्‍यात पदमावतीदेवी व डावीकडे कोणीतरी गंधर्व सगळेच चूप! थोड्यावेळाने माझी चुळबुक वाढत असे, मग समोरील पाठावर असलेल्या तांदूळामध्ये स्वस्तिक काढ, झाड काढ असले खेळ चालु होत असे किंवा कोणी कुठे कुठे मनुके, बदाम ठेवले आहेत त्याचा शोध चालू होत असे. आजोबांचे ध्यान/पुजा संपत आली की ते थोडे मोठ्याने नमोकार मंत्र म्हणायचे व मी आपल्या जागेवर येऊन बसायचो. मी एवढ्यावेळात काय केले हे आजोबाना माहीती नसेल असे मला नेहमी वाटायचे पण ते जाताना मला जवळ खेचत म्हणायचे जा दो-तीन मनुके व बदाम पार्श्वनाथांना देऊन ये. मी आपला कसाबसा सगळयात छोटा मनूका व बदाम देवासमोर अगदी अनिच्छेने ठेऊन येत असे व नमोकार मंत्र म्हणून आजोबाच्या मागे मागे बाहेर पडत असे.
आजोबांची अजून गोष्टी होती ज्यांचे आम्हा सगळ्या लहानग्यांना अप्रुप होते, आजोबा झोपताना आपले दात काढून ठेवायचे. तसे आम्हाला का काढता येत नाहीत हे सगळ्या लहानग्यांनी कधी ना कधी आपल्या आईकडे तक्रार केलेली असेलच. मी आजोबा कवळी काढले की मी त्यांच्या जवळ जाऊन बसत असे व त्या काचेच्या ग्लास मध्ये ठेवलेली कवळी निरखत बसत असे. रॉकेलचे मोठे मोठे दिवे घरात सगळीकडे लावलेले असले तरी आजोबांच्या गादी जवळ एक मोठी पितळेची समई लावलेली असे. त्या समईच्या उजेडामध्ये आजोबा कधी कधी खाते वही घेऊन हिशोब करत बसलेले असायचे. अश्यावेळी त्यांच्या जवळ जाण्यास लहानांनाच काय मोठ्यांना देखील परवानगी नसावी. एकदा का त्यांनी वही बंद केली की शांत झालेले घर परत बोलू लागत असे. मग गोष्टी काय, गप्पा काय यायला उधान यायचे. मग खाली अंगणात हंतरुणे टाकली जायची, मोठा मामा कट्टावर आजोबांच्या खुर्ची शेजारी बसून, अडकित्याने सुपारी फोडत त्यातील छोटे छोटे तुकडे तोंडात टाकत शेतातील गप्पा आजोबाना सांगत बसे व आजोबा आराम खुर्चीवर डोलत फक्त ह्म्म हम्म्म करत रहायचे.
रात्री कधी तरी आम्हाला झोप लागायची पण त्यावेळी देखील ही मोठी मंडळी काहीतरी बोलत बसलेली असायचीच. मध्येच कधीतरी राज्या, कोल्हापूर असे शब्द कानावर आले की डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न अतीव झोपेमुळे राहुन जायचा. असेच एकदा रात्री जाग आली म्हणून उठलो तर सगळीकडे गुडुप्प अंधार व जवळपास सगळे झोपलेले व स्वयंपाक घरात मामी व आज्जी शेवटची आवरा आवर करत असलेला आवाज हळूहळू येत होता, इकडे तिकडे पाहिल्यावर आजोबा सगळ्या लहान मुलांच्या अंगावरील चादरी ठीक करत माझ्याजवळ येत होते. जेव्हा ते माझ्याजवळ आले तेव्हा मी डोळे मिटून गप्प पडून होतो. माझी चादर नीट करून ते तेथेच उश्याशी बसले व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले " सुसा, निदं हुडग अंदरे नंद जिवा. नंग यानू आइतू अनंद्रे तगंद बा अप्पी." मग माझी आई म्हणाली "आप्पा, गुरुत इदे मलकोरी.. इने राजान मदवी आगले." आजोबा दिलखुलास हसले व आई व आजोबामध्ये गप्पा चालू झाल्या. अनेक विषय झाले असतील, पण तो पर्यंत मला झोप लागली असेल किंवा मला त्यातील काही आठवत नसेल.
क्रमशः
* पार्श्वनाथजी - बिहार मध्ये असलेले जैन समाजाचे एक मोठे तिर्थक्षेत्र.
* व्हासा - रात्र पडण्याआधी केलेले जेवण
* "सुसा, निदं हुडग अंदरे नंद जिवा. नंग यानू आइतू अनंद्रे तगंद बा अप्पी." - आईला आजोबा सुसा व प्रेमाने मुलींना अप्पी म्हणायचे. तुझ्या मुलावर माझा खूप जीव आहे. मला काही झाले तर आधी याला माझ्याजवळ घेऊन ये.
* "आप्पा, गुरुत इदे मलकोरी.. इने राजान मदवी आगले." - आप्पा (आजोबा) माहीती आहे, झोपा आता. अजून राजाचं लग्न व्हायचे आहे.

Monday, November 24, 2014

V for Vendetta

एखाद्या चित्रपटातील एखादं वाक्य, संवाद आपल्या मनात घरं करून राहतं. काही केल्या ते मनातून हटत नाही व जेथे जेथे वाक्या संदर्भातील परिस्थिती असते तेव्हा आपल्याला हमखास ते वाक्य तो संवाद आठवतो. मग आपण हलकेच स्मित करतो व पुढील कामाला लागतो. तसेच काहीसे सध्या माझे होत आहे. मागील अनेक दिवस माझ्या सहीमध्ये, गुगल/फेसबुकच्या स्टेट्स मॅसेजमध्ये "remember remember the fifth of november" हे वाक्य होते. अनेकांनी विचारले या वाक्याचा संदर्भ काय आहे तर, आता सांगतो काय संदर्भ आहे ते.
२००५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका चित्रपटातील नायकाच्या तोंडी असलेले ते वाक्य आहे. चित्रपटाचे नाव आहे V for Vendetta. चित्रपटाची सुरवातच या वाक्याने होते "remember remember the fifth of november" आधी तुम्हाला दोन गोष्टी कळायला हव्यात, एक Vendetta म्हणजे काय ? वेंडेटा म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध आघाडी उघडणे अथवा निर्णायक लढाईचा बिगुल वाजवणे. व व्ही म्हणजे ? व्ही म्हणजे चित्रपटाचा नायक. जो स्वतःला व्ही म्हणून घेतो, चित्रपटात त्याचे नावच व्ही आहे.मी नायक म्हणालो का? व्ही खरंच नायक आहे का चित्रपटाचा ? रुढ अर्थाने तो नायक नाही. त्याला चेहरा नाही आहे. तो पुर्ण चित्रपटभर मुखवटा घालून वावरतो. त्याला स्वतःचे असे नाव नाही ना त्याला ते सांगायची इच्छा. का असावा चेहरा? का असावे नाव? नाव चेहरा आला की वर्ण येतो, जात नाव?, देश येतो, या सर्वाच्या पलिकडे असलेला हा नायक.
चित्रपटामध्ये सुरवातीला ४०० वर्षापुर्वी घडलेली एक छोटी घटना दाखवली आहे, ज्याचा संदर्भ पार्श्वभुमीवर पुढील वाक्य येत जातात "Remember, remember the 5th of November. The gunpowder, treason, and plot. I know of no reason why the gunpowder treason should ever be forgot." एका दुष्ट राजशक्ती विरुद्ध बंड करू पाहणार्‍या क्रांतिवीराला राज शक्तीचे प्रतिक विस्फोटाद्वारे उडवून देण्याच्या प्रयत्न केला म्हणून फाशीची शिक्षा दिली जाते व दिवस असतो......5th of November.
आता चित्रपट ज्या काळामध्ये आपल्याला घेऊन जातो तो काळ म्हणजे ४ नोव्हेंबर २०३०, परिस्थिती अशी आहे की इंग्लंडमध्ये सत्तापालट होऊन फॅसिस्ट पक्षाचा नेता हुकुमशहा म्हणून उदयास आला आहे. जसे एका हुकुमशहा च्या देशात चालायला हवे तसे सगळे तेथे चालत आहे. सामान्य जनतेला घराबाहेर राहण्याचे वेळापत्रक आहे, कला संगीत यावर बंदी आहे, हुकुमशहा विरुद्ध बोलायला विरोध आहे. बेबंदशाही माजलेली आहे. शक्ती व भिती या जोरावर जनतेवर अत्याचार नियमित चालू आहेत. मिडियापासून सर्व सुरक्षा यंत्रणादेखील त्या हुकुमशहाच्या पुर्णतः ताब्यात आहे. विरुद्ध आवाज दाबण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा त्यांने उभी करून ठेवली आहे. ज्यावेळी घरातून बाहेर पडणे गुन्हा आहे, अशावेळी बाहेर पडलेल्या एका स्त्रीला (Evey Hammond) गुप्त पोलिस त्रास देत असताना व्ही तेथे येऊन तिला वाचवतो, व तिला व सर्व शहराला एक आश्चर्याचा धक्का देतो.
जनतेला संदेश, चेतावनी देता यावी म्हणून शहरात सर्वत्र मोठ मोठे स्पिकर लावले आहेत, ज्यातून रुक्ष आवाजात संदेश व चेतावनी ऐकण्याची सवय जनतेला आहे व व्ही त्यातून स्वातंत्र्य गीत वाजवता वाजवता राजशक्तीचे प्रतिक म्हणता येईल अशी एक इमारत विस्फोटाद्वारे नष्ट करतो, ती इमारत असते "Old Bailey" मुख्य क्रिमनल कोर्ट. "Remember, remember the 5th of November. The gunpowder, treason, and plot. I know of no reason why the gunpowder treason should ever be forgot." एका युद्धाची सुरवात. एक व्यक्ती विरुद्ध एक पुर्ण व्यवस्था, सिस्टम! दुषीत, दुष्ट अशी सिस्टम!!!
हादरा! एका बलदंड राजसत्तेला आव्हान देण्यात व्ही यशस्वी होतो. लढाईची सुरवात होते हुकूमशाही विरुद्ध व्हीची लढाई!!! Old Bailey सारखी एखादी पुरातन इमारत कोणीतरी हल्ला करून उडवली तर त्यात हुकूमशाहीला घाबरण्यासारखं काय आहे? हा प्रश्न मला पडला. चित्रपट तेथेच थांबवून विचार करताना एक गोष्टी लक्ष्यात आली. एखादा हुकूमशहा जनतेवर वर्षानुवर्ष आपला दरारा कश्याच्या जीवावर ठेऊ शकतो ? तर त्याची शक्ती त्याचे सैनिक, त्याची स्वतःची पोलिस व न्याय व्यवस्था हे आहेत. व्ही पहिला हल्लाच त्याच्या या शक्तीवर करतो. मुख्य क्रिमनल कोर्टाची इमारत तो विस्फोटाच्या द्वारे नष्ट करतो. चेतनाहीन जनतेत थोडेफार का होई ना नवचेतना जागृत होते. हुकूमशहा म्हणजे काही देव नाही आहे, यांना पण धक्का देतो येतो हे जनतेला हलकसं कळून येतं.
सर्वात प्रथम प्रश्न समोर येतो तो एकच हा व्ही कोण? कोणालाच माहिती नाही, हुकूमशहा गोंधळून गेला आहे, हा अचानक नवा शत्रु कोण निर्माण झाला हे शोधण्यासाठी तो आपली सर्व शक्ती लावतो. येथे थोडी वेगळी खेळी हुकूमशाही कडून खेळली जाते. तत्काळ हुकुमशाहीकडून सांगितले जाते की इमारत धोकादायक झाली होती म्हणून आम्हीच ती पाडली, व टिव्हीवर ते या संबधीत बातमी प्रसारित करून संभाव्य विद्रोहाचा धोकाला टाळण्याचा प्रयत्न करतात, पण तोच व्ही जनतेच्या समोर येतो. हुकुमशाहाच्या ताब्यात असलेल्या एका प्रसिद्ध टिव्ही चॅनलवर हल्ला करून ते ताब्यात घेऊन टिव्हीवर सर्व जनतेसमोर तो पहिली घोषणा करतो " Old Bailey इमारत मी उडवली, ही मदमस्त सत्तेत चूर असलेल्यांना माझी चेतावनी आहे. आज, पाच नोव्हेंबर मी पुढील वर्षी याच दिवशी पाच नोव्हेंबर ला ही सत्ता नष्ट करून हुकुमशहाला ठार मारेन.... remember remember the fifth of november!"
तो काय म्हणतो टिव्हीवर हे पुर्ण वाचणेच इष्ट ठरेल.
"Good evening, London. Allow me first to apologize for this interruption. I do, like many of you, appreciate the comforts of every day routine- the security of the familiar, the tranquility of repetition. I enjoy them as much as any bloke. But in the spirit of commemoration, thereby those important events of the past usually associated with someone's death or the end of some awful bloody struggle, a celebration of a nice holiday, I thought we could mark this November the 5th, a day that is sadly no longer remembered, by taking some time out of our daily lives to sit down and have a little chat. There are of course those who do not want us to speak. I suspect even now, orders are being shouted into telephones, and men with guns will soon be on their way. Why? Because while the truncheon may be used in lieu of conversation, words will always retain their power. Words offer the means to meaning, and for those who will listen, the enunciation of truth. And the truth is, there is something terribly wrong with this country, isn't there? Cruelty and injustice, intolerance and oppression. And where once you had the freedom to object, to think and speak as you saw fit, you now have censors and systems of surveillance coercing your conformity and soliciting your submission. How did this happen? Who's to blame? Well certainly there are those more responsible than others, and they will be held accountable, but again truth be told, if you're looking for the guilty, you need only look into a mirror. I know why you did it. I know you were afraid. Who wouldn't be? War, terror, disease. There were a myriad of problems which conspired to corrupt your reason and rob you of your common sense. Fear got the best of you, and in your panic you turned to the now high chancellor, Adam Sutler. He promised you order, he promised you peace, and all he demanded in return was your silent, obedient consent. Last night I sought to end that silence. Last night I destroyed the Old Bailey, to remind this country of what it has forgotten. More than four hundred years ago a great citizen wished to embed the fifth of November forever in our memory. His hope was to remind the world that fairness, justice, and freedom are more than words, they are perspectives. So if you've seen nothing, if the crimes of this government remain unknown to you then I would suggest you allow the fifth of November to pass unmarked. But if you see what I see, if you feel as I feel, and if you would seek as I seek, then I ask you to stand beside me one year from tonight, outside the gates of Parliament, and together we shall give them a fifth of November that shall never, ever be forgot."
ज्या स्त्रीला, म्हणजे (Evey Hammond) इव्हला व्हीने सुरवातीला वाचवले असते ती त्याच टिव्ही चॅनल मध्ये काम करत असते, ती स्वतःचा जीव धोक्यात घालून व्हीचा जीव पोलिसांपासून वाचवते व या प्रयत्नात ती बेशुद्ध पडते, व्ही तेथून निसटण्यात यशस्वी ठरतो.
व्ही ला आतंकवादी म्हणून जाहीर केले जाते. त्याने केलेले कृत्य हे आतंकवादी कृत्य आहे हे जनतेच्या मनावर बिंबवले जाते. व व्ही मारला गेला आहे अशी ब्रेकिंग न्युज दाखवली जाते. सत्तेवर झालेल्या पहिल्या हल्लामुळे, व्हीच्या भाषणामुळे निर्माण होऊ शकणारी चेतना, स्वातंत्र्याची ललक तेथेच शांत होईल या आशेपोटी.. काही अंशी ती खरी देखील ठरते.
आपला जीव वाचवण्याच्या नादात बेशुद्ध पडलेल्या इव्ह ला व्ही आपल्या घरी घेऊन येतो. इव्हचे आई-वडिल देखील हुकुमशाहीचा अहिंसमार्गाने विरोध करता करता गेले असतात. आता व्ही हुकुमशहा बरोबर तन, मन धन लावून त्याच्यासाठी काम करणार्‍या त्याच्या टिमच्या सदस्यांना मारण्यास सुरवात करतो.
इकडे इव्हला व्हीची भिती देखील वाटत आहे व एक प्रकारचा आदर देखील. व्ही क्रुरपणे माणसांना मारतो आहे व त्याचे तो समर्थन या वाक्यात करतो "Violence can be used for good." त्यामुळे नेमकं काय करावे हे तिला कळत नाही आहे, अपर्हायपणे तीला व्ही सोबत रहावे लागत आहे व पण त्यामुळे तीला हळू हळू व्हीचा मानवी चेहरा दिसू लागतो. तो कोण आहे हे जाणून घ्याची उत्सुकता तिला आहे व ती त्याला विचारते " तु मुस्लिम आहेस?" व्ही उत्तर देतो "No. I'm in television."
खरं पाहीले तर या चित्रपटाचे तीन भाग आहेत.
एक> व्ही, जो हुकुमशहा विरुद्ध लढतो आहे, एकटा.
दोन> व्ही, जो इव्हला (म्हणजेच सर्वसामान्य जनतेला) अन्याया विरुद्ध उभे राहण्यास प्रवृत्त करतो आहे.
तीन > व्ही, स्वतः.
हा चित्रपट तुम्हाला अतिरंजित पासून ते काहीतरी काय.. कसे कसे घडेल असे काही वाटायला लावू शकतो. पण तुम्ही हा चित्रपट पाहताना एक ही व्हीची फ्रेम चुकवू नका. कारण प्रत्येक व्हीची फ्रेम हा एक संदेश, एक अर्थ देतो असतो तुमच्या पहाण्याला. व्हीला चेहरा नाही आहे त्यामुळे तो आपल्या भावना, आपले विचार तुमच्या पर्यंत हाताद्वारे, कृतीद्वारे पोहचवतो. नेमका हा चित्रपट काय आहे? एका क्रांतीवीराची गाथा, एक तिरसट व्यक्तीचा वेडा प्रयत्न की अजून काही हे प्रश्न तुम्हाला येथे पर्यंत पडतातच.
व्हीला समांतर सरकार उभे करायचे नाही आहे, तर त्याला असलेले सरकार, व्यवस्था, सिस्टम उखडून टाकायची आहे. हा वेडपट कल्पना उराशी बाळगून हे युद्ध लढत नाही आहे. व्ही हा समंजस, आपल्या विचारांशी निष्ठांवंत व प्रामाणिक आहेच. त्याच बरोबर त्याला युद्धकलेची जाण, संगीताची, वाचनाची आवड देखील आहे. त्याचा मार्ग त्याने व्यवस्थीत आखून घेतला आहे व त्या बरहुकुम तो कार्य करत आहे. इव्हा मध्ये येणे यांने व्हीला फरक पडत नाही, पण इव्ह च्या जीवनात फारमोठा बदल घडून येतो. एकतर ती व्ही बरोबर आहे, ती व्हीची समर्थक आहे असा ग्रह गुप्त पोलिसांचा झालेला असतो व काही अंशी तो खरा देखील असतो. आई-वडिलांच्या हत्येचा बदला कोणीतरी घेत आहे हे पाहून ती आतून सुखावत असतेच पण व्ही मध्ये ती हळू हळू तिच्या वडिलांना पाहू लागली आहे की काय इतपत ती व्ही मध्ये गुंतते.
चित्रपट मध्यंतरी एक मोठा वळणावर येऊ थांबतो जेव्हा इव्हाला हुकुमशहाचे समर्थ गुप्त पोलिस इव्हला पकडतात व तीची रवानगी यातना गृहात केली जाते. व्हीच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी तीच्यावर वेगवेगळ्या प्रकारे शारिरीक व मानसिक अत्याचार केले जातात व तीच्या काळकोठडीत एका उंदराच्या बीळात टॉयलेट पेपर वर एका स्त्री कैद्याने लिहलेली आत्मगाथा तिच्या हाती पडते, सिस्टमने माणसाच्यावर केले अत्याचार व एकून जनतेला तुच्छ किंमत देऊन. त्यांचे जीवन मातीमोल करणारा हुकुमशहा बद्दल जस जसे तिला कळत जातात, एका प्रयोगाची किंमत, स्वातंत्र्य मागण्याची किंमत तीला समजत जाते, तस तसे तिच्यातील कुमकुवत इव्ह, सिस्टमला घाबरणारी इव्ह मरून जाते व एक कणखर इव्ह जन्मते. सिस्टमला सहकार्य अथवा मृत्यु यातील एक निवडण्याची वेळ येते तेव्हा खणखर इव्ह स्मिस्टमला सहकार्य करण्याचे नाकारते. अचानक तीला सोडलं जातं. काहीच कारण न देता, जिवंत. थोड्या वेळानं इव्हला कळतं ही हा सगळा व्ही ने केलेला बनाव आहे.
इव्हला व्ही सत्यकथन करतो, व सांगतो कश्या प्रकारे हुकुमशाही सरकारने अणूशक्तीचा वापर आपल्याच जनतेवर गुप्तपणे करणार्‍या एका प्रयोग शाळेत ८००००० हून अधिक कैद्यांचा बळी जातो. त्या प्रयोगशाळेत आग लागल्याने तो प्रयोग विधंसक रूप घेतो त्या आगीतून एकच कैदी वाचतो तो व्ही. व तीला कैदेच्या काळात जी पत्रे वाचायला मिळालेली असतात ती खरीखुरी पत्रे असतात जी व्हीच्या शेजारच्या कोठडीत असलेल्या मुलीने लिहलेली असतात. इव्ह ला स्वातंत्र्याची किंमत कळावी व त्याची ललक निर्माण व्हावी आपल्यासारखंच कोणीतरी दुसरे देखील असावे या भावनेतून व्ही इव्ह ला सशक्त करतो.
****** चित्रपट परिक्षण समाप्त ******
तसे पाहता चित्रपटात पुढे तीच स्टोरी आहे, खलनायकाचा खातमा, क्रांतीकारकाचे बलिदान व जनतेचा विजय.
हे लिहणार नाही आहे मी. हे तुम्ही चित्रपट पाहताना पहालचं. मी तुम्हाला चित्रपट पहा असे का सांगतो आहे त्या विषयी लिहतो.
चित्रपटाचे कथानक पाहिले तर एखादी बॉलिहुड चित्रपटाची कथा शोभेल अशी आहे. पण खरचं तशी आहे का?
चित्रपटातून काय घेण्यासारखं आहे, त्यात मनोरंजन मुल्य आहे का? हे प्रश्न थोडे बाजूला ठेऊन हा चित्रपट आहे हे विसरून आपण जर कथानक पाहिले तर...?
अनेकदा नकळत आपण देशातील सिस्टम विषयी बोलताना बोलून जातो, हिटलरशाही हवी होती, हुकुमशाही हवी होती, एका माणसाच्या हातात देश द्या कसा सुधारत नाही ते पहा. पण खरचं असे झाले तर?
जगातील कुठल्याही सुखाची किंमत ही जनतेचे स्वातंत्र्य असू शकत नाही. कोणी जर उद्या मी स्थिरता देतो, वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावतो, बेबंदशाही मिटवतो, तुमच्या सगळ्या अडचणी दुर करतो फक्त एकहाती सत्ता द्या असे म्हणाले तर मी छातीवर हात ठेऊन सांगतो मी नकार देईन. माझे स्वातंत्र्य गमावून मला ही सिस्टम सुधरणे कदापी मंजूर नाही. कारण एकहाती सत्ता म्हणजे हुकुमशाही व कसलीही हुकुमशाही एक अधिकारशाही ही वाईटच. ती जनतेचे कधीच भले करू शकणार नाही. ती फक्त आपल्याला हुकुम देणार्‍या व्यक्तीच्याच भल्याचे विचार करेल ती सिस्टम आपण स्वतः मागणे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडणे.
ज्यांना ज्यांना आपल्या देशात हुकुमशाही हवे असे वाटते त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा व व्ही च्या तोंडी असलेल्या प्रत्येक वाक्याला समजून घ्यावे. हा योगायोग नव्हता की २००६ नंतर जगभरात अनेकजागी जनतेच्या आंदोलनात व्हीचा मुखवटा दिसत होता. there is something terribly wrong with this country. हे जाणवणं खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी सिस्टमच्या आपण एवढे एकरूप होऊन जातो की चूक का बरोबर काय याकडे लक्ष आपले जात देखील नाही. आपल्या अधिकारांची, आपल्या स्वातंत्र्याची किंमत ही क्षणिक सुखासोबत होऊ शकत नाही. स्वातंत्र्य ही आपली शक्ती आहे. येथे, आपल्या घरी, ऑफिसमध्ये, नाक्या नाक्यावर, मैदानात आपल्याला हवे तेथे आपण आपल्या सरकारला शिव्या घालू शकतो, त्याच्या विरोधात बोलू शकतो. विरोध प्रकट करू शकतो हे स्वातंत्र्य आहे व याची किंमत तुम्ही पारतंत्रात गेल्यावर समजून घेणार आहात का?
V for Vendetta हा फक्त एक चित्रपट आहे, पण आपल्याकडे तर दिवसला एक या पेक्षा जास्त वेगाने चित्रपट बाहेर पडतात. चित्रपटाने काय फरक पडतो. पण आखून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडणे व त्याची सशक्त मांडणे करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे एका चित्रपटाने काय मनोरंजन दिले या पलिकडे बघण्यास भाग पाडण्यास V for Vendetta यशस्वी होतो.
सिस्टम विरुद्धचा लढा हा एकांगी कधीच नसतो. खलनायकाला मारले म्हणजे यश नाही. तर जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भूक निर्माण करणे व त्या पेक्षा सर्वात महत्त्वाचे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे जनतेला समजावणे व ते एकदा कळाले की सिस्टम हरते. स्वातंत्र्य तेथे आहे, नायक व खलनायक दुय्यम होतात, स्वातंत्र्य व स्वातंत्र्य लढा हे नायक होतात. आपण सर्वजण शक्यतो ९९% ( मीमराठीचे सदस्य व हे वाचन करणारे सर्वजण ) आपल्या यशस्वी स्वातंत्र्यलढ्या लढ्या नंतर जन्मलो आहोत. १५ ऑगस्ट १९४७ पुर्वीचा भारत व त्या नंतरचा भारत जमीन-आस्मानचा फरक आहे. काही प्रमाणात V for Vendetta हा फरक दर्शवतो. सरकार विरूद्ध बोलणे, आपल्या अधिकाराच्या गप्पा मारणे हा द्रोह होता १९४७ पुर्वी. तुम्ही एक लेख जरी सरकार विरुद्ध लिहलात तर तुम्हाला सरळ यातनागृहात पाठवलं जात असे. त्यावेळची सिस्टम त्यांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केली होती, सिस्टमच्या मदतीने भिती निर्माण करून स्वातंत्र्याची भावना समुळ नष्ट करणे हा उद्देश होता.
पण, चित्रपटात व्ही म्हणतो तसे And where once you had the freedom to object, to think and speak as you saw fit, you now have censors and systems of surveillance coercing your conformity and soliciting your submission. How did this happen? Who's to blame? Well certainly there are those more responsible than others, and they will be held accountable, but again truth be told, if you're looking for the guilty, you need only look into a mirror. हे सगळे आपण लादून घेतो स्वतःवर, कारण आपण आपल्या स्वातंत्र्याची खूपच कमी किंमत करतो व त्याचा गैरफायदा सिस्टम घेत.
व्ही चा उद्देश फक्त खलनायकाला संपवणे असते तर हा चित्रपटच उभा राहीला नसता. व्हीचा उद्देश हा स्वातंत्र्याची जाणीव करून देणे हा आहे, तो वेगाने हुकुमशहाच्या प्रत्येक प्रतिकावर, शक्तीस्थानावर हल्ले करून त्याला दुर्बळ बनवतो.
सरकार कोणाचे आहे याचा मला काय फरक पडतो हा जो कोणी विचार करतो त्यांने एकदा परत आत्मपरिक्षण करावे, व्ही म्हणतो तसे की सिस्टमला दोष देताना खरा गुन्हेगार कोण हे पहायचे असेल तर सर्वात आधी आरसा पहा. खरं आहे ते. आपली, आपल्यासाठी योग्य सिस्टम निवडण्याचा अधिकार असताना देखील तो अधिकार वापरला नाही तर आपल्याला नको असलेली, आपल्याला त्रासदायक सिस्टम तुमच्यावर अधिकार गाजवते हा दोष सर्वात जास्त तुमचा आहे, त्या सिस्टमला क्षणिक फायदासाठी निवडणार्‍यांचा आहे. ज्यांनी कधी सिस्टम निवडण्याचा अधिकार वापरलाच नाही त्यांनी तर भोगत असलेल्या प्रत्येक क्षणासाठी स्वतःला दोष द्यावा.
जेथे जेथे प्रस्थापितांच्या विरुद्ध आंदोलने होतील व लोक तळमळतेने आपल्या स्वातंत्र्याविषयी, अधिकारांच्या विषयी बोलताना दिसतील तेथे मला व्ही दिसेल कारण सरळ आहे, ज्यांने पारतंत्र म्हणजे काय, हुकुमशाही म्हणजे काय हे भोगले आहे त्याला आपल्या अधिकारांची व स्वातंत्र्याची किंमत समजते असा माझा समज आहे. पारतंत्र म्हणजे फक्त विदेशी शक्तीकडून येत नाही, ते आपल्या माणसांच्यामुळे देखील येऊ शकते. जगातील सगळेच हुकुमशहा हे त्याच मातीत जन्मलेले असतील, पण एकदा सिस्टमची ताकत हाती लागली त्याची शक्ती कळू लागते व एकदा शक्ती कळाली की हुकुमशहा निर्माण होण्यास वेळ लागत नाही.
हा पुर्ण चित्रपट मी एकटक पाहिला आहे, कारण भारत सुधारण्यासाठी काही काळासाठी का होईना हुकुमशाही हवी असे माझे देखील कधीकाळी मत होते, पण कालांतराने अनुभवातून, वाचनातून ते बदलत गेले व त्यावर शेवटचा हात या चित्रपटाने फिरवला. आपण आपले लोकशाहीने दिलेले अधिकार जेव्हा जेव्हा नाकारतो तेव्हा तेव्हा आपण हुकुमशाहीला इंचा इंचाने जवळ करत आहोत याची जाणीव पुन्हा जागृत करून देण्याचे काम या चित्रपटाने केले.
फक्त मनोरंजन करायचे, म्हणून का होईना हा चित्रपट पहा असा सल्ला मी माझ्या अनेक मित्रांना हा चित्रपट पाहिल्यानंतर दिला होता, व आता ही तोच देतो आहे, एकदा का होईना हा चित्रपट पहाच. अनेक चॅनेलवर हा लागतो कधी कधी, जर आधी कळले तर मी येथे कळवेन सर्वांना पण हा टोरंट, डिव्हीडी अश्या अनेक माध्यमातून उपलब्ध आहे थोडा शोध घेतला तर नक्की मिळेल. मी हे सर्वकाही पणे विस्कळीत लिहले आहे, मांडले आहे, १००% मान्य पण या मनातील भावना आहेत. वाचक समजून घेतील ही आशा. एकदा पहा हा चित्रपट शक्यतो माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने दुसरा कोणीतर भावना व्यक्त करेल ही इच्छा.

Monday, November 17, 2014

... देवाचं घर !

माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं. त्यावेळेस शेजारच्या चरणकर आजींनी सांगितलेलं एकच वाक्य राहूनराहून आठवायचं...”देव सगळीकडे असतो”
’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं...जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात.
कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता. तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र, देखण्या, रेखीव मूर्ती काय, तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात...कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी!
आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर...(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे? लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर...पेशवेकालीन शैलीचा प्रभाव...समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर.
जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर...त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके...सर्व काही सफेद, निष्कलंक...देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील तसंच थंड, शांत वाटतं.
दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे, त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर...एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते...कालाच्या पटासारखीच निरंतर...गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन...विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो...हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द...निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.
भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे...जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण.
उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर...शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही.
आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां?
बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत...मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.
मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.
सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.

*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर क्षमस्व.